12 July 2020

News Flash

विनिमय केंद्रांचं ‘चांगभलं’!

चमत्कार ही अंधश्रद्धा आहे, पण राजकारणात मात्र चमत्काराचे साक्षात्कार ठायी ठायी घडत असतात.

चमत्कार ही अंधश्रद्धा आहे, पण राजकारणात मात्र चमत्काराचे साक्षात्कार ठायी ठायी घडत असतात. चमत्कार म्हणजे अघटित. ते विज्ञानाच्या कोणत्याच कसोटीला उतरत नाही, तरीही असे एखादे अघटित घडून जाते, अचंबित व्हायला भाग पाडते. अलीकडे लोकशिक्षणाची साधने घरोघर वाढू लागल्याने आपण सारे अशा अंधश्रद्धांना आव्हाने देऊ लागलो असून सर्वसामान्यांच्या जगातून चमत्कार नावाचा प्रकार हळूहळू हद्दपार व्हायला लागला असला, तरी राजकारण मात्र चमत्काराच्या भरवशावरच चालते. काल कुणीच नसलेला अचानक अतिमहत्त्वाचा नेता होऊन जातो, तर कालपर्यंतचा महत्त्वाचा नेता अचानक शून्य महत्त्वाचा ठरून जातो. असाच एक चमत्कार राजकारणाच्या पटलावर एका भौतिक घटनेबाबत घडलेला आपण अनुभवतोय. ‘मनरेगा’ -म्हणजे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- हे संपुआ सरकारच्या अपयशाचे स्मारक म्हणून आपण जतन करणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाहीर करताच त्यानंतर या योजनेला बघता बघता जिवंतपणाचे धुमारे फुटावेत, त्यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढत जावी हेही एक अघटितच! स्मारक म्हणून अडगळीत टाकलेली योजना टवटवीतपणे जिवंत व्हावी, हा जसा एक चमत्कार, तसाच एखाद्या योजनेस जिवंतपणी स्मारकाची अवकळा लाभणे हादेखील एक चमत्कारच! अलीकडे हा चमत्कार सरकारी रोजगार विनिमय केंद्रांच्या वाटणीस आला आहे. जिवंतपणी अवकळा आलेली रोजगार विनिमय केंद्रे म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना वेळ घालविण्याकरिता आणि काहीच काम नसल्याने दात कोरीत खुच्र्या उबविण्याकरिता निर्माण केली गेलेली अधिकृत सोय असल्याचे स्पष्ट दिसूनही, या केंद्रांचे दरवाजे दररोज उघडतात आणि केवळ केंद्रे बंद होत नाहीत म्हणून त्यांची धुगधुगी कायम राहते, या चमत्काराचे श्रेयदेखील सरकारला द्यायला हवे. रोजगार विनिमय केंद्रांच्या माध्यमातून सरकारी किंवा खासगी नोकरी मिळेल या आशेने बेरोजगारांनी आपली नावे तेथे नोंदवावीत आणि ठरावीक काळानंतर त्याच आशेने नोंदणीचे पुनरुज्जीवन करीत राहावे ही खरे म्हणजे अंधश्रद्धा होय.. अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात असतानाही, ही अंधश्रद्धा सरकारी मेहेरबानीवर जोपासली जाणे, हा चमत्काराचा भाग झाला! एकीकडे स्मारक म्हणून जपलेली एखादी योजना पुन्हा जिवंत होऊन भरभराटीला येते, तर दुसरीकडे एखादी जिवंत योजना स्मारकासारखी मरगळून जाते, असा चमत्कार सरकारदरबारी सुरूच राहतो, हादेखील एक चमत्कारच.. रोजगार विनिमय केंद्रांमधून नोकरी मिळालेला बेरोजगार देशात कुठे तरी शोधावाच लागतो, तरीही ही केंद्रे बंद केली जात नाहीत, या अघटिताच्या श्रेयाचेही कुणी तरी मानकरी असतीलच, तर त्यांच्या त्यामागच्या हेतूचा शोध घेऊन त्यांचा सत्कार तरी व्हायला हवा. समाजात जागरूकता निर्माण होत असल्याने अंधश्रद्धेची दुकाने हळूहळू बंद होत आहेत. ही दुकानेही पुढेमागे बंद पडली, तर त्याचे श्रेय समाजातील समंजसपणालाच मिळेल यात शंका नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 3:33 am

Web Title: mahatma gandhi national rural employment guarantee scheme
टॅग Mahatma Gandhi
Next Stories
1 चालकानुवर्ती!
2 ‘अध्ययन सुट्टी’ आवडे सर्वांना..
3 पुरे आता ते जुने परोचे..
Just Now!
X