सकाळ झाली. साडेसहा वाजले आणि गणूने चिंतूला मिसकॉल दिला. चिंतूचाही गणूला मिसकॉल आला आणि गणू बाहेर पडला. मदानावर पोहोचला, तोवर चिंतूही आला होता. दोघांनी राऊंड सुरू केले. भरपूर चालून दोघेही पुरते घामाघूम झाले, आणि ते मदानाबाहेर पडले. बाजूच्या ज्यूसवाल्याने चिंतू-गणूला पाहताच गाजरे निवडून रस काढायला घेतला, आणि ग्लास भरले. गाजराच्या रसाचे ग्लास घेऊन दोघेही बाकडय़ावर बसले आणि गप्पा सुरू झाल्या. ‘रात्री पाहिलेले स्वप्न’ हा दोघांच्या गप्पांचा नेहमीचाच विषय असायचा. चिंतूला फारशी स्वप्ने पडत नसत. म्हणजे, अलीकडे आपण स्वप्ने पाहणे बंद केले आहे असे तो सांगायचा. आजही गणूने गाजराचा रस संपविला, उलटय़ा मनगटाने ओठ पुसले आणि त्याने आपले स्वप्न सांगण्यास सुरुवात केली. जवळपास अडीच वर्षांपूर्वी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणेने भारावून आपणही कारखानदार होण्याचे स्वप्न पाहिले  होते,  ‘स्टार्टअप’साठी सरकारच्या ‘सिंगल विंडो’वर किती हेलपाटे मारले, सारा जुनाच पाढा वाचण्यास गणूने सुरुवात केली, आणि नेहमीप्रमाणे जांभई देत चिंतूने उघडय़ा तोंडासमोर दोनचार चुटक्याही वाजविल्या. तो इशारा ओळखून गणू ओशाळला. पण चिंतूने त्याला ‘पुढे सांग’ असे खुणेनेच सांगितले. चिंतूचा ‘मेक इन इंडिया’ स्वप्नातील ‘स्टार्टअप’ सुरू होईपर्यंत त्याला मानसिक आधार द्यायचा असे चिंतूने ठरविलेलेच होते. त्या दिवशी पंतप्रधानांच्या देखत आपल्या उद्योगाचा प्रस्ताव गणूने सरकारला सादर केला. कागदपत्रांवर सह्या झाल्या, आणि आता गणू लवकरच नवभारताच्या निर्मितीचा भागीदार  होणार या भावनेने चिंतू भारावून गेला. तेव्हापासून रोज रात्री, आपण उद्योजक झालो असून हाताखाली अनेक तरुणांचा ताफा काम करीत आहे, असे स्वप्न गणूला पडायचे. स्वराष्ट्रास परमवैभवाप्रत नेण्यासाठी जो जो त्याग करावा लागेल त्यासाठी आता सिद्ध झालो आहोत असे तो अभिमानाने सांगत असे. गणूच्या तोंडून असे काही ऐकले की चिंतूलाही आनंद व्हायचा. गणू कारखानदार बनेल तेव्हा त्याच्याकडे नोकरी करायची, असे चिंतूचे स्वप्न होते. ‘तू कारखानदार होशील तेव्हा मी मागणारा असेन आणि तू देणारा असशील’ असे चिंतू गणूला म्हणायचा, आणि गणूच्या डोळ्यातील स्वप्नाला बळ द्यायचा.. आजही गणूने स्वप्नाचा तोच पाढा वाचला, आणि न कंटाळता तो ऐकून चिंतू वाचनालयाकडे वळला. त्याने एक वर्तमानपत्र उघडले. समोरच्याच पानावर तीच बातमी होती. ‘नोकऱ्या मागणारे नव्हे, देणारे व्हा!’ ही जणू आपली ‘मन की बात’ आहे, असे समजून चिंतूने गणूला ती बातमी दाखविली. आपल्या स्वप्नालाच कुणी तरी हळुवारपणे कुरवाळते आहे, असा भास गणूला झाला. त्याने आधाशासारखी ती बातमी वाचून काढली. खुद्द राष्ट्रपतींचाच उपदेश वाचून गणू क्षणभर गंभीर झाला. त्याने पुन्हा घडय़ाळ पाहिले, आणि तो स्वतशीच पुटपुटला, ‘तीन वर्षेहोऊन गेली!’ ..तरीही त्याचे डोळे चमकले. आता आपण जागेपणी स्वप्न पाहत आहोत, या जाणिवेने तो हरखून गेला.. चिंतू गणूकडे पाहतच होता!