X

पहिले ते आत्मकल्याण..

जगाच्या पाठीवर भारत हा बहुधा एकमेव असा भाग्यवान देश आहे.

जगाच्या पाठीवर भारत हा बहुधा एकमेव असा भाग्यवान देश आहे, की जेव्हा जेव्हा भगवंतास अवतार घ्यावा असे वाटू लागते, तेव्हा तेव्हा तो फक्त भारतभूमीचीच निवड करतो. सांप्रतकाळी तर निर्दालन कराव्या अशा असंख्य गोष्टींचा भारतातच एवढा सुळसुळाट माजला आहे की, कुणा एकाच भगवंतास कोणी एकच अवतार घेऊन हे कार्य पूर्ण करणे हे काहीसे आवाक्याबाहेरचेच असल्याने, पाहावे तिथे अशा वेगवेगळ्या अवतारांचे पीक आलेले दिसू लागले आहे. दुसरे असे की, राजसत्तेस हाताशी धरल्याखेरीज आपले अवतारकार्य पूर्ण होणार नाही याची जाणीव असल्याने धर्मसत्तेस राजसत्तेच्या हातात हात घालून चालवावेच लागते, हे उभय सत्तांना चांगलेच ठाऊक असल्याने, या दोघांनीही याचे तंतोतंत पालन केले आहे. म्हणूनच, सरकारी कामकाज बाजूला सारून केंद्रीय मंत्री मेनका गांधी गुरू प्रेमासाईंच्या दिव्य दर्शनासाठी नागपुरातून यवतमाळात रवाना झाल्या ही बातमी काही फार धक्कादायक नाही. समाजाचे कल्याण करावयाचे असेल तर आधी आत्मकल्याण प्राप्त करून घ्यावे लागते आणि आत्मकल्याणासाठी अध्यात्माएवढा अन्य चांगला मार्ग नाही, हे राजकारणात वावरणाऱ्यांना सांगावे लागत नाही. समाज ज्यांच्या भजनी लागतो, त्याचा अनुग्रह आपल्या माथ्यावर असणे ही राजकारणातील वैयक्तिक स्थैर्याची गरज असल्याने, अशा आध्यात्मिक गुरूंच्या कृपेसाठी राजकीय नेत्यांना काही वेळा सरकारी काम बाजूला ठेवावे लागले, तर त्यात समाजालाही वावगे वाटावे अशी परिस्थिती कधीच नव्हती. तसेही, सरकारी काम हे कायमच सर्वासाठी दुय्यम महत्त्वाचे असल्याने, त्या कामास विलंब होणे हे साहजिकच असते, हे आपण सामान्य माणसेदेखील जाणतो.  त्यामुळे, एक सरकारी काम बाजूस सारून मेनकाजी आत्मकल्याणासाठी प्रेमासाईंच्या आश्रमात गेल्या, ही खरे तर बातमीच नाही. त्यांनी वेगळे काहीच केलेले नाही.  लाखोंच्या सभा गाजविणारे, जनतेवर आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीची छाप पाडून त्यांना मानसिक भुरळ घालणारे नेतेदेखील जाहीरपणे किंवा खासगीत, एखाद्या बाबा-बुवाच्या चरणी मान झुकविताना दिसतात, आपली सारी बुद्धिमत्ता, तडफ त्यांच्या पायाशी विनम्रपणे गहाण ठेवतात, ही या देशाची जगावेगळी परंपराच आहे. या परंपरेतून देशातील अनेक अवतारी बाबांसमोर राजसत्तेने वेळोवेळी गुडघे टेकलेले जगाने पाहिलेलेच आहे. धीरेंद्र ब्रह्मचारी, महर्षी महेश योगी, पुट्टपर्थीचे सत्यसाईबाबा, तांत्रिक चंद्रास्वामी यांच्यापासून अगदी नाणीजच्या नरेंद्र महाराजांपर्यंत साऱ्या गुरूंच्या धर्मसत्तांनी बघता बघता राजसत्तांच्या हातात हात घालून आपले अवतारकार्य कसे सहज आणि सुलभ केले आहे, हेही उभ्या देशास माहीत आहे. इंदौरच्या गुरुमहाराजांचा अनुग्रह घेण्यासाठी राजकीय नेत्यांची अहमहमिका चालायची, तेही आपण सर्वानीच अनुभवलेले आहे. या गुरुमहाराजांनी स्वत:स आत्महत्येच्या मार्गाने आपले अवतारकार्य संपवून या नश्वर जगातून नष्ट करून घेतल्याने, राजकीय जगतात निर्माण झालेली पोकळी किती वादळी ठरली होती, हेही देशाने अनुभवलेले आहे. मेनकाजींनी हीच परंपरा पाळली आहे. शेवटी ज्याला त्याला आत्मकल्याणासाठी गुरूचा अनुग्रह लागतोच. कारण आधी आत्मकल्याण साधणे ही राजकारणाची परंपराच आहे.