सन २०१७ च्या डिसेंबर महिन्यातील एका दिवशी, काँग्रेसचे एक प्रसिद्ध आणि बहुपयोगी नेते मणिशंकर अय्यर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नीच माणूस’ अशी संभावना केल्याने अय्यर यांना तातडीने काँग्रेसने निलंबित केले, तेव्हा राजकारणात नैतिकतेची उदात्त परंपरा पुनस्र्थापित होत असल्याच्या भावनेने भारतीय जनमानस भारावूनही गेले होते. तसेही, काँग्रेसकडे अशा बाबीसाठी अय्यर हाच काही एकमेव हुकमाचा एक्का नव्हता. दिग्विजय सिंह यांनादेखील उभा देश अशा गुणांमुळेच ओळखू लागला. अशा अवमानजनक शेरेबाजीला पक्षात थारा नाही, अशा शब्दांत खुद्द राहुल गांधींनीच अय्यर यांना फटकारले, तेव्हा राहुलजींच्या राजकीय सुसंस्कृततेचे मनोज्ञ दर्शनही काँग्रेसच्या सहानुभूतीदारांना झाले होते. भाजपसारख्या, स्वत:स नैतिकतेचा व सुसंस्कृततेचा स्वघोषित मापदंड मानणाऱ्या पक्षातही वाचाळवीरांची पिके फोफावल्याने भविष्यात राजकारणातून नैतिकता व सुसंस्कृतता गायब होणार की काय या काळजीने ग्रासलेल्या असंख्य सामान्यजनांना राहुलजींच्या या तातडीच्या कारवाईमुळे केवढा दिलासा वाटला होता. पण सुसंस्कृतपणालाही मर्यादा असते. रविवारी राहुलजींनीच मणिशंकर अय्यर यांचे निलंबन उठविले आणि त्यांना पक्षात परत घेतले. गेल्या पावणेदोन वर्षांतील या घटनाक्रमावरून एक गोष्ट ध्यानात घ्यावयास हवी. ती म्हणजे, जनतेची स्मरणशक्ती अल्प असते, जनतेला एखादी गोष्ट फार काळ लक्षात राहात नाही, त्यामुळे काही गोष्टींचे जनतेला विस्मरण झाले की पुन्हा सारे काही सुरळीत करता येते हा राजकारणातील एक ठाम नियम ठरू शकतो. मणिशंकर अय्यर यांचे ते विधान, त्यांचे निलंबन आणि त्यांची पुनस्र्थापना या घडामोडींमधील कालावधी वीस महिन्यांचा असल्याने, लोकांच्या स्मरणशक्तीचा कालावधी राजकारणाच्या संदर्भात वीस महिन्यांचाच असावा, असे मानावयास हरकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे, अय्यर यांनी पंतप्रधानांस उद्देशून केलेली नीच माणूस ही शेरेबाजी चार महिन्यांनंतर जनतेच्या स्मरणात राहणार नाही, अशी एक तर काँग्रेसला खात्री असावी किंवा सद्य:स्थितीत सर्वच पक्षांत सुरू असलेल्या जिव्हालालित्य प्रदर्शनाच्या स्पर्धेत रंग भरू लागलेला असताना या स्पर्धेत टिकाव धरू शकेल असा माणूस आपल्याकडे असूनही आपण त्याला दडवून ठेवणे योग्य नाही याची जाणीव काँग्रेसला झाली असावी. आता निवडणुका जवळ येऊ  लागल्या आहेत. प्रतिस्पध्र्यावर जिभेचे मोकाट वार करून वाद माजविण्याचे कौशल्य अंगी असलेले अनेक मोहरे सत्ताधारी पक्षाकडे असल्याने, त्यांना पुरून उरण्याकरिता एकटे दिग्विजय सिंह पुरेसे ठरणार नाहीत, याची जाणीव काँग्रेसला झाली असावी. भाजपसारख्या पक्षात स्वत:स नेते समजणारे किती तरी लोक प्रतिस्पध्र्याना शाब्दिक नामोहरम करण्यासाठी सरसावत असताना अय्यरसारख्या याच खेळात निष्णात असणाऱ्या नेत्यास मैदानात उतरविणे ही कदाचित काँग्रेसची अपरिहार्यतादेखील असू शकते. आता मणिशंकर पुन्हा पक्षात दाखल झाल्याने या स्पर्धेत माघार घेण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवणार नाही.. आता पुढे काय काय होते हे पाहणे तुम्हा आम्हा सामान्यजनांसाठी औत्सुक्याचे ठरणार, हे आता वेगळे सांगायला नकोच!