मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचेच नेते आहेत यावर आता आमचा पक्काच विश्वास बसला आहे. पक्का म्हणजे किती पक्का, तर निश्चलनीकरणामुळे जगातील दु:ख, दैन्य, लालसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, महागाई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याहीपेक्षा पक्का. त्यात काही शंकाच नाही. उद्या समजा मनीषभाईंचे आणि अरविंदरावांचे तुटले, फाटले, पटेनासे झाले – ते आम आदमीचे सहसा होतच असते ना! इतिहासाचा दाखलाच तसा आहे – तरी मनीषभाई हे आमच्याकरिता आम आदमीच राहणार हे नक्की. याचे कारण त्यांना आम आदमीचे बोलणे कैसे, चालणे कैसे, सलगी देणे कैसे आणि त्याहूनही महत्त्वाचे विचार करणे कैसे हे काटेकोर माहीत आहे. या देशातील सामान्य माणूस हा जन्माला येतो तोच मुळी समजून चालण्याची समज घेऊन. समजून चालणे हा त्याचा जीवनमार्ग असतो. तेच त्याचे अध्यात्म असते. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वसंतराव सबनीसांचे मोठे बहारदार लोकनाटय़. त्यातला त्यांचा हवालदार एके ठिकाणी चिडून म्हणतो – ‘च्यायचे मध्यमवर्गीय. नुसता समजण्या-समजण्यात तुमचा जन्म गेला.’ आम्हांस ही काही चिडण्याची बाब वाटत नाही. हा खरे तर मध्यमवर्गीयाच्या जीवनधारणेचा सबनीसांनी केलेला गौरवच आहे. मनीषभाऊंनीही तोच कित्ता गिरविला. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत असे समजून मतदान करा, असे जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांना सामान्य माणसाच्या विचारांची नाडी बरोबर कळाली आहे असेच म्हणावे लागते. त्यांना हे बरोबर समजले आहे, की सामान्य माणूस हा अशाच प्रकारे काहीही समजत जगत असतो. सर्वात प्रथम म्हणजे तो स्वत:ला सामान्य माणूस समजून चालतो. ही सोपी बाब नसते. ही सामान्यपणाची समजूत प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. आपण कसे अहोरात्र काम करतो, साधे राहतो, आपण कसे ‘कॅशलेस’ आहोत, याची ‘पीआर’गिरी करावी लागते. तेव्हा कुठे लोकांबरोबर आपलाही समज होतो की, आपण सामान्य आहोत आणि एकदा का सामान्य माणूस असे समजू लागला की, मग तो कशाला काहीही समजून चालू लागतो. आपल्या आजूबाजूची आपल्यासारखीच सामान्य माणसे पाहा, कालपर्यंत नाकावर हात ठेवून फिरणारे आज मात्र सारे प्रदूषण एका रात्रीतून दूर झाल्याचे समजून चालत आहेत. अनेक जण तर हल्ली रात्रीचा काळोखही पांढरा झाल्याचे समजून चालले आहेत. काही सामान्य लोक तर भारत नावाचा देश गेल्या अडीच वर्षांत स्वतंत्र झाला असे समजून चालले आहेत. हे समजण्या-समजण्यात मोठीच गंमत असते. जगणे सुखी होते त्याने. मनीषभाईंनी आपणां साऱ्या आम आदमींचा हा समज-दारपणा जाहीर सभेतून आव्हानित करून अधोरेखित केला. खरे आम आदमी ते!