देशाचे संरक्षणमंत्री मनोहरपंत पर्रिकर यांनी भारतीय फौजेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यामागे रा. स्व. संघांचे संस्कार असल्याचे जे विधान केले, त्यावरून त्यांच्यावर टीकेच्या तोफा डागण्यात येत आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. मुळात केंद्रातील कोणत्याही मंत्र्यावर टीका करणे हे चूक. पंतप्रधानांवर टीका करणे हे महापाप. आणि संरक्षणमंत्रिपदावरील व्यक्तीवर टीका म्हणजे तर थेट लष्करावरील चिखलफेक. विरोधकांचे नशीब की या देशाचे नाव इंडिया दॅट इज भारत असे आहे. ते उत्तर कोरिया वगैरे असते, तर अशी चिखलफेक करणारांस देहान्त प्रायश्चित्ताशिवाय अन्य दंडविधान नसते. मनोहरपंत मुळात अत्यंत मवाळ, दयाळू, क्षमाशील. म्हणून त्यांनी टीकाकारांकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी कशी गप्प बसणार? आणि त्यांनी गप्प तरी का बसावे? मनोहरपंतांचे चुकले तरी काय? काँग्रेस काळातील भारतीय फौजेची तुलना त्यांनी बजरंगाच्या वानरसेनेशी केली हे चुकले? मुळीच नाही. ही फौज आजही लढत आहे ती द्वितीय मर्यादापुरुषोत्तम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी. यापूर्वी असे काही या भरतभूमीमध्ये पाहावयास तरी मिळाले होते का? तेव्हाही सेना होतीच. पण तिने सर्जिकल वगैरे काही केलेच नव्हते. पाकिस्तानचा तुकडा पाडणे वगैरे चाळिसेक वर्षांपूर्वीच्या कारवाया तर कोणतेही लष्कर करू शकले असतेच. पण लक्ष्यभेदी हल्ला म्हणजे थेट रावणाच्या लंकेत घुसून आग लावण्यासारखे. आता लष्कर हे करू शकले, याचे कारण – अन्य कोण असणार? – मोदी आणि मनोहरपंतच. आज भारतीय लष्कर आहे ते त्यांच्यामुळेच. आता हे नेमके मनोहरांनाच कसे काय जमले? मनमोहनांना का बरे जमले नाही? उत्तर सोपे आहे. कारण मनोहरपंत शाखेत जायचे. लाठीकाठी फिरवायचे. नमस्तेसदावत्सले म्हणायचे. योगायोग असा की नेमके हेच मोदीजीही करायचे. संघातील ही जी पौरुषत्व वाढविणारी शिकवण आहे तिच्यामुळेच लष्कराला बळ लाभले आणि त्याने मग तो लक्ष्यभेदी हल्ला केला. समजा त्या ठिकाणी कोणी असंघीय संरक्षणमंत्री असता तर त्याला हे जमले असते का? कदापि नाही. याआधी कुठे कोणाला तसे काही जमले होते? आणि पाकिस्तानचे तुकडे वगैरेंची काँग्रेसी कौतुके ही मुळात पाकिस्तान हाच तुकडा कोणी पाडला असे विचारून गप्प करता येतातच की नाही? खरे तर कुरुक्षेत्रानंतरचे एकमेव खरे युद्ध म्हणजे सर्जिकलच. आता त्याबद्दल मनोहरपंतांनी घेतली थोडी पाठ थोपटून तर त्यात काय बिघडले? अखेर समोर उत्तर प्रदेशचे कुरुक्षेत्र आहे. तेथे संघ आणि सर्जिकल असे काही सर्जनशील बोलले तर विरोधकांच्या पाश्र्वभागी का फटाके फुटावेत? मनोहरपंतांनी यापुढेही याची पर्वा न करता असेच बोलत राहावे. संघ नावाची सांस्कृतिक संघटना काय काय प्रशिक्षण देते हे लोकांस सांगावे. यामुळे लोकांना संघाचा खरा चेहरा लोकांस कळेल व लोक संघाकडे आकृष्ट होतील. शेवटी संरक्षणमंत्री झाले तरी त्यांचे अंतिम काम – कृण्वन्तो विश्वसंघम् – हेच तर असले पाहिजे. मनोहरपंतांना त्या संघकार्याकरिता अनेकानेक शुभेच्छा!