विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत त्याने खांद्यावर घेतले आणि तो सावधपणे पावले टाकू लागला. प्रेतातल्या वेताळाला आता हसू येत होते. तो राजाला म्हणाला, ‘विक्रमा, सोड हा हट्ट आता. किती वष्रे एकच ध्येय घेऊन भटकत राहणार आहेस?’ विक्रमादित्य काहीच बोलत नाही हे पाहून वेताळाने पुन्हा त्याला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ‘मध्येच प्रश्न विचारलास तर मी पुन्हा खांद्यावरून उडून झाडावर लटकेन, तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील,’ अशी धमकीही दिली. याआधी कधीच डोक्याची शकले झालेली नसल्याने वेताळाच्या धमकीत दम नाही, हे माहीत असलेल्या विक्रमाने मान हलविली आणि प्रेताच्या मुखातून वेताळ बोलू लागला. ‘पावणेतीन वर्षांपूर्वी त्यानेही आपल्या तमाम कर्मचाऱ्यांना असाच सज्जड इशारा दिला होता. परफॉर्म ऑर पेरिश – कामगिरी दाखवा, नाही तर परिणाम भोगा- अशी गर्जना लाल किल्ल्यावरून घुमली, तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती. न खाऊंगा, न खाने दूंगा, असा इशाराही दिला होता. त्यामुळेच, सरकारी नोकरी आता पहिल्यासारखी सुखाची आणि कमाईची राहिली नाही, अशा भयाचे सावट दाटले होते. त्याला आता बराच काळ लोटला. सरकारी कारभाराच्या परंपरेला सरावलेले सारे पुन्हा पूर्वपदावर आल्यासारखे वाटू लागले. परफॉर्म ऑर पेरिश या इशाऱ्याचा आपल्या आपल्या परीने अर्थ लावून कामगिरीत चमक आणण्याचे नवे उपायही शोधले जाऊ लागले आणि वर्षांगणिक तयार होणारा गोपनीय अहवाल हाच परफॉर्मन्स दाखविण्याचा एकमेव मार्ग असल्याचा शोध लागला. झपाटय़ाने ही वार्ता सर्वत्र पसरली आणि ‘सीआर खराब होणार नाही’ याची काळजी घेतली की परिणाम भोगण्याची वेळच येणार नाही, हा मंत्र पसरला. नवी कार्यसंस्कृती सुरू झाली. ‘सीआर’ जपण्यासाठी साहेबाची मर्जी सांभाळणे सुरू झाले. ‘खालपासून वपर्यंत’ सारे आपला आपला ‘सीआर’ सजविण्यासाठी सज्ज झाले आणि परफॉर्मन्सचा प्रश्नच सुटून गेला. गेल्या अडीच पावणेतीन वर्षांत, कुणाला परिणाम भोगावा लागलेला तुला पाहायला मिळाला का? एक दीर्घ नि:श्वास सोडून वेताळ बोलायचा थांबला. पण गोष्ट संपल्याचे त्याने विक्रमाला सांगितले नव्हते. खांद्यावरचे प्रेत पुन्हा निर्जीवपणे लोंबकळू लागले. विक्रमाने मान वळवून एकदा त्याच्याकडे पाहिले, आणि त्याला हसू आवरेना झाले. वेताळ मनातल्या मनात खूश होत होता. आता विक्रमादित्याला बोलण्याचा मोह आवरणार नाही, हे वेताळास माहीत होते.. ‘अरे वेताळा, त्याला कुणी बधले नाही, म्हणून तर आता महाराष्ट्रात नवा फतवा काढलाय. सरकारी बाबूच्या हातून कुणाचाच सीआर खराब होणार नाही हे लक्षात आल्यानेच आता जनतेच्या हाती सीआरचा शेरा सरकारने दिलाय. आता जनता काय करते ते पाहायचे’.. विक्रमादित्य म्हणाला आणि वेताळाने प्रेतासह पुन्हा झाडाकडे झेप घेतली..