अरेरे! काय ही अवस्था मुंबईनामक महानगराच्या माननीय महापौरांची. छानसा बंगला मिळू नये त्यांना? तसे पाहायला गेले तर मुंबईचे महापौर म्हणजे एका छोटय़ाशा देशाचे पंतप्रधानच जणू.. गेला बाजार छोटय़ा राज्याचे मुख्यमंत्री तरी. बरे जाऊ दे.. तुलना राहिली; पण निदान मुंबईच्या महापौरांची शान म्हणून काही गोष्ट आहे की नाही? ती तर राखलीच गेली पाहिजे ना. असे असताना काय हे चालले आहे. चांगला छान शिवाजी पार्कात बंगला होता महापौरांचा. एकदम इतिहासाचा पाया असलेला. बिकानेरच्या महाराजांनी राजस्थानी पद्धतीने बांधलेली प्रशस्त दुमजली वास्तू. भवताली नारळ, आंबा, फणस, गुलमोहर वगैरेची गर्द गर्दी. संध्याकाळी समुद्रात विसावणारा सूर्य फार छान दिसतो या बंगल्यातून. सन १९६४च्या सुमारास हा बंगला मुंबईच्या महाराजांसाठी.. म्हणजे महापौरांसाठी निवडला गेला. मुंबईच्या महापौरांचा पत्ता निश्चित झाला. पुढे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक या बंगल्यात करायचे निश्चित झाले आणि नव्या महापौर निवासासाठी जागा मुक्रर झाली ती एकदम राणीच्या बागेतली. आता महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेचे. त्यामुळे व्याघ्रकूळ त्यांच्या अगदी निकटच्या परिचयाचे. घरचेच म्हणा ना. शिवाय त्यांच्या पक्षाच्या रानाचे राजे श्रीमान उद्धवजी ठाकरे यांना वन्यछायाचित्रणाची खूप आवड. त्यांची कित्येक छायाचित्रे महाडेश्वर यांनी निरखली असणार; पण पक्षातील वाघोबा बघणे, छायाचित्रांतील वाघ, सिंह, अस्वल बघणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्राण्यांच्या संगतीत राहणे वेगळे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगराच्या महापौरांना जनवनातून एकदम खऱ्या वनात नेऊन ठेवायचे म्हणजे फारच झाले. एक तर सध्याचे राजकारण म्हणजे कोण कटकटीचे. त्यातून रात्रीच्या प्रहरी चार घटका शांत निद्रा घ्यायची म्हटले तर त्यात कुठून तरी कोल्हेकुई कानावर येऊन निद्राभंग होण्याची भीती. निदान रात्री तरी कुठल्याही प्राणिप्रवृत्तीच्या संगतीपासून महापौरांना दूरच ठेवायला हवे की नको? शिवाय राणीचा बाग परिसर शांतता क्षेत्रातला. तेथे आव्वाज कुणाचा..? तर माणसांचा मुळीच नाही.. फक्त प्राणिपक्ष्यांचाच. त्यामुळे महापौरांकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा त्रास बागेतील प्राणिपक्ष्यांना होण्याची शक्यता खूपच. इतके सगळे असल्याने महापौरांना राणीच्या बागेत नव्हे, इतरत्र कुठे तरी, त्यांच्या मानमरातबास साजेसा बंगला मिळायला हवा. डोईवरचा लाल दिवा प्रधानसेवक मोदीसाहेबांनी एका फटक्यात विझवून टाकला, निदान डोईवरचे छप्पर तरी नीटसपणे शाबूत राहायला हवे ना. आता मलबार हिलवरील अतिरिक्त आयुक्तांचा शानदार बंगला मिळावा, यासाठी महापौर प्रयत्नशील आहेत. हा बंगला मुंबईच्या महापौरपदाची शान राखणारा आहे. ती राखलीच गेली पाहिजे. हा बंगला मिळाला तर महापौर समुद्रसपाटीवरून एकदम डोंगरावर येतील. माणसाच्या आयुष्याचा आलेख हा असाच चढा हवा. आता मुंबईकरांनीही या बंगल्यासाठी महापौरांच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी, कारण प्रश्न इभ्रतीचा आहे.. त्यांच्याही.. मुंबईच्याही.