डोनाल्ड ट्रम्प फार म्हणजे फार अस्वस्थ आहेत. गेल्या चोवीस तासांपासून त्यांनी एक ट्वीट केले नाही की कोणाला कामावरून काढलेले नाही. स्वतला कोंडून घेतलेय म्हणे त्यांनी ओव्हल रूममध्ये. एक बातमी तर अशीही आहे, की व्हाइट हाऊसमधील त्या खोलीतून हुंदके फुटल्याचे आवाज येतात. त्यांच्या प्रशासनाने लगेचच ही फेक न्यूज असल्याचे जाहीर केले, ते एक बरे झाले. नाही तर लोक ती बातमी खोटीच समजून चालले असते. पण काहीही म्हणा, ट्रम्प हे काही मुळुमुळु रडणाऱ्यांतले नाहीत. लढणाऱ्यांतले आहेत ते. आपण पाहिलेच आहे ते. एखाद्या व्यक्तीचा राग आला ना, तर पहाटे तीन वाजतासुद्धा उठून गालीप्रदान ट्वीट करणारी ही महाशक्तिमान व्यक्ती. ती हुंदके देत बसलीय म्हटल्यावर काहीतरी भीषणच घडले असणार. नक्कीच. पण काय घडले असेल? मेलेनियाबाईंनी पुन्हा एकदा त्यांना झिडकारले असेल का? एकदा एका परदेश दौऱ्यात चारचौघांत त्यांनी त्यांचा हात झिडकारला होता. केवढा पचका झाला होता तेव्हा ट्रम्प यांचा. तसा पुन्हा झाला असेल का? शक्यता आहे. परंतु अशा गोष्टी काही ते फारशा मनावर घेत नाहीत. आता अमेरिकेच्या जनतेने त्यांना नाही दिले पॉप्युलर व्होट. हिलरींपेक्षा ही मते त्यांना कमीच पडली. पण त्यांना आहे का त्याचे काही? ते आपले यश किती ग्रेट ग्रेट आहे हेच सांगत असतात. मग या हुंदक्यांचे रहस्य काय बरे असावे?  पुतिन बोलले, ते लागले का त्यांच्या मनाला? कदाचित तेच खरे.  पुतिनपण असे फटकळ! कोणा पत्रकाराने त्यांना विचारले की, ट्रम्प यांच्याबद्दल त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे का? तर म्हणाले, ‘ट्रम्प काही माझी नवरी नाही, की मी त्यांचा नवरा नाही.’ इतके का तोडून बोलायचे असते तिकडच्या स्वारीने? समजा, तुमच्यामुळे ट्रम्प यांचा व्यवसाय रशियात वाढला, पुढे ट्रम्प यांचा विजयही सुकर झाला. पण म्हणून काय लगेच आर्य नारीप्रमाणे त्यांच्यावर अधिकार गाजवायचा? समजून घ्यायला हवे ना, की ट्रम्प यांनाही कर्तबगारी दाखवायची आहे. म्हणून ते रशियावर करतात टीका. लोकांना हवे असते ना ते. करू द्यावे. हवे तर खासगीत दमात घ्यावे. पण पुतिनअगदी एकेरीवरच आले. संबंधच तोडू लागले. ट्रम्प हे आधीच धार्मिक हळवे. त्या हळवेपणात ना गर्भपात बसतो, ना समलिंगी बसतात, ना घटस्फोट. पुतिन यांना समजायला हवे होते ना ते. आता झाले ना नाराज ते. ते पाहा, ओव्हल रूमच्या कोपागारातून ते मन विदीर्ण करणारे सूर ऐकू येत आहेत.. रणरुचिरा रीती, ना शोभे प्रेमा ती.. विनयवति मी कांताऽ.. नाही मी बोलत नाथाऽ..