भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांतील गोडव्याला उधाण येईल, अशा भाकिताचा उल्लेख नॉस्ट्राडेमसच्या भविष्यपोथ्यांमध्ये आहे किंवा कसे, याची कल्पना नाही. पण या भविष्यपोथ्यांचा गाढा अभ्यास असणाऱ्यांनी त्यात लक्ष घालावे. कदाचित त्यात काही सांकेतिक भाषा वापरली असेल. मनातील गुहेत राहणारा व त्या गुहेविषयी मौलिक गप्पा मारणारा एक बलवान पुरुष ज्या भूमीचे भवितव्य घडविणार आहे, असा उल्लेख त्यात असेल. घरांवर घरे बांधणारा एक दणकट पुरुष जी भूमी उचलून धरणार आहे, असा उल्लेख कदाचित त्यात असेल. त्यावरून खुशाल समजून जावे की त्यातील पहिली भूमी भारत आणि दुसरी भूमी अमेरिकाच. या दोन देशांतील गोडव्याला उधाण येणार याचे संकेतही नॉस्ट्राडेमसने दिले असणार. एकमेकांपासून हजारो फर्लाग दूर असणाऱ्या या दोन भूमींच्या दरम्यान एकच वृक्ष उगवेल व त्याची मधुर फळे दोन्ही देश चाखतील, अशी काहीशी भाषा त्यात नक्की असणार. हा असा वृक्ष उगवताना आज समोर दिसतो आहे. त्याची मधुर फळेही हाती लागतील, अशी खात्री वाटते आहे ती नव्या घडामोडींमुळे. आजवर उभय देशांमध्ये संवादासाठीचा जो ढाचा होता, तो आता मोडीत काढण्यात येईल. सारे जुने ढाचे मोडून नवनिर्माण केलेच पाहिजे, अशा प्रागतिक विचाराचे राष्ट्रप्रमुख दोन्हीकडे आहेत. उभय देशांतील संवादाच्या सध्याच्या ढाच्यात राजनैतिक व व्यूहात्मक अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांना आवश्यक महत्त्व मिळत नाही. ते मिळावे यासाठी संवादाची ‘टू बाय टू’ ही नवी रीत अमलात येईल. आपल्याकडे याआधीच्या कुठल्याही काँग्रेसी सरकारांना असा उपाय सुचला नव्हता. तेवढी प्रतिभाच नव्हती. ही पद्धत म्हणजे एका वेळी इथले दोन, तिथले दोन. या संवादरीतीत दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांना महत्त्वाचे स्थान असेल. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान आदी मुद्दे दोन्ही देशांसाठी सारखेच महत्त्वाचे. त्याबाबत टू बाय टू रीत नक्की उपयोगी पडेल. त्यासाठी खरे तर अ‍ॅपची निर्मिती करता येईल. माननीय मोदीजींचा त्यातील अनुभव दांडगा आहे. मोदीजी व ट्रम्पजी आपापल्या मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेतील व त्या अ‍ॅपच्या आधारे एकमेकांशी चर्चा करतील. आता खरे तर दोघांतच चर्चा करायची तर मोबाइल संदेश वा व्हॉट्सअ‍ॅपही पुरेसे असते. पण ते राष्ट्रप्रमुखांच्या इभ्रतीला शोभत नाही, म्हणून अ‍ॅप हवेच. या संवादढाच्यात परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांना महत्त्वाचे स्थान असणे अपेक्षित आहे. पण या दोन्ही खात्यांची आपल्याकडे मोदी यांना आणि तिकडे ट्रम्प यांना जेवढी जाण आहे तेवढी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य. त्यामुळे या दोघांमध्ये जरी संवाद झाला तरी पुरेसा आहे. मग चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान आदी मुद्दय़ांवर तोडगा निघालाच म्हणून समजा. या दोघांची ताकदच आहे तेवढी. या नव्या संवादढाच्याचे नावही समर्पक आहे त्यासाठी. टू बाय टू. कुणी तेवढी नॉस्ट्राडेमसची भविष्यपोथी उलगडून बघेल का..