12 December 2017

News Flash

बावरलेली बाकडी..

एकएका बाकडय़ाचा गुण असतो. माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा प्रभाव पडतो.

लोकसत्ता टीम | Updated: August 4, 2017 4:12 AM

एकएका बाकडय़ाचा गुण असतो. माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा प्रभाव पडतो. माणूस कितीही प्रभावशाली, प्रतिभावंत असला, तरी तो ज्या बाकडय़ावर बसतो, त्या बाकडय़ाचा गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला चिकटतो आणि आपोआपच माणसाचे गुण बदलतात. राजकारणात मुरलेल्या सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या बाकांनी आता त्यांच्या भूमिका पुरेपूर ओळखल्या आहेत. निवडणुका झाल्यावर त्या बाकांवरची माणसे बदलली, पण त्याआधी सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्यांचा तोरा आठवून बघा.. त्यांना ‘समोरच्या बाकांवर’ बसायची वेळ आली आणि विरोधकाच्या भूमिकेत शिरण्याची कसरत करता करता तीन वर्षे संपली. अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली की तोऱ्याची झूल आपोआप उतरते आणि आधीचे विरोधक सत्तेच्या बाकांवर बसले की, ती झूल त्यांच्या अंगावर चढते. पण बाकडय़ांचा गुणधर्म पचविण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी पडली, की भूमिकांचा गोंधळ होतो. आघाडीची सत्ता गेली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि तोलामोलाचे मंत्री असलेल्यांना विरोधी बाकडय़ांवर बसल्यानंतर त्या बाकडय़ांचा गुण लागला, पण विरोधी पक्षांची भूमिका भिनविण्यासाठी तीन वर्षांची कसरत करावी लागली. अशातच अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला, आपापल्या भूमिका वठविण्यासाठी सभागृहांतील दोन्ही बाजूंची बाकडी सज्ज झाली. कारण त्या बाकडय़ांना आपल्या भूमिकेचे भान होते. सत्ताधारी बाजूची बाकडी तर बहुमताचा आणि सत्तेचा तोरा मिरवतच होती. विरोधी बाजूच्या बाकडय़ाने सत्ताधारी बाजूच्या बाकडय़ाचा तोरा मिरवायचा नसतो, कारण त्या बाकडय़ांनी सत्ताधारी बाकडय़ांच्या संख्याबळापुढे झुकायचेच असते हे त्या बाकडय़ांनाच ठाऊक होते. मग ‘खालच्या’ सभागृहातील सत्ताधारी बाकडय़ांनी तोऱ्याची झूल चढविली, समोरच्या बाकडय़ांनी विरोधकाची भूमिका स्वीकारली. ‘वरच्या’ सभागृहात मात्र, विरोधकांची बाकडीच तोरा मिरवत होती. इथे आपल्या बाजूचे संख्याबळ अधिक आहे, याचे भान विरोधी बाजूच्या बाकडय़ांना आले आणि त्यांनी आपली मान वर काढली. वरमून वागायचा आपला गुण विसरून त्यांनी बहुमताचा तोरा मिरविण्यास सुरुवात केली आणि सत्ताधारी बाकडी तोऱ्याची भूमिका विसरून वरमून गेली. अगोदरच, अनेक वर्षांपासून विरोधकाची भूमिका भिनलेल्यांना सत्ताबळ लाभल्याने आपले गुण त्यांच्या गळी उतरविण्यासाठी सत्ताधारी बाकांनाच कसरत करावी लागत होती, त्यात विरोधी बाकांचा तोरा वाढला.. मग सत्ताधारी बाजूची बाकडी गोंधळली. असे झाले की भूमिका वठविणाऱ्यांचाही गोंधळ होणारच! तसेच झाले आणि सत्ताधारी बाजूच्या बाकडय़ांना आपल्या गुणाचा विसरच पडला. सत्ताधाऱ्यांनाच भूमिका वठविताना कसरत करावी लागत असेल तर बाकडी बिचारी काय करणार?.. सत्ताधाऱ्यांच्याच सभात्यागामुळे रिकामी झालेली ती बाकडी माणसांच्या प्रभावभयाने मुकी झाली आहेत. आपल्या अंगाखांद्यावर वावरणाऱ्यांनाच भूमिकांचे भान आलेले नाही, या भावनेने वरच्या सभागृहातील बाकडी बावरून गेली आहेत, असे म्हणतात!

First Published on August 4, 2017 4:12 am

Web Title: marathi articles on maharashtra legislative assembly