News Flash

पाऊसगाणे..

तसाच असतो, तसाच दडतो, तसाच तो पडतो

प्रातिनिधिक छायाचित्र

तसाच असतो, तसाच दडतो, तसाच तो पडतो, आभाळाच्या पुढेमागे तसाच तो गडगडतो. वळिवाचा म्हणा, मोसमी म्हणा, पाऊस शेवटी पाऊस असतो, डोईवर असूनही छत्री, आपण ज्यात भिजतो. चुकतात अंदाज, चुकते भविष्य आणि चुकतो वेध, अडूनच बसतात हट्टी, काळेसावळे मेघ. अंदाजांवर टाकत पाणी, अवचित मग तो अवतरतो, हव्याहव्याशा सरींतून मनसोक्त झरझरतो. काय असते वेगळे, आदल्या वर्षीपेक्षा? काय असते आगळे मागल्या सरींपेक्षा? तसेच असतात ढग आणि तसेच असते पाणी, आपण मात्र गातो नित्य, नव्याने त्याची गाणी. पाऊसही नवा आणि आनंदही नवा, चिंब भिजल्या डहाळीवरती, पक्ष्यांचा नवा थवा. भुईवरती नवे बीज, आणि पेरणी नवी, पेरत्या ऐशा हातांमध्ये सृजनभूल नवी. उद्यासाठी आज, फुटतात कोंभ हिरवे, वाऱ्यासोबत धरणीवरती, सरसर नवे शिरवे. कुणाला आठवतात कविता, आणि कुणाला मग भजी! पिकनिकचे नाव काढताच सारे, एका पायावर राजी. घ्यावा पेला हाती, नामी ऐशी वेळ, (नको गैरसमज..) गरमागरम चहाचा, नाही कशाला मेळ! ऐसा हवासा, जिवाभावाचा, कधी मांडतो दंगा, कैसा घ्यावा मित्राशी ऐशा मग पंगा? पडतो असा दणकून, उसंत मुळी नाही, इतक्या जोरात बरसण्याची, काय असते घाई? मग सारे तेच होते, मागील पावसाळ्यावरून पुढे, मोसमामागून मोसम, तेच तेच रडे. तळे साचते रस्त्यांमध्ये, पाणी शिरते घरांत, उसळता पूर जणू, ठाण मांडून दारात. पडतो वेढा पाण्याचा, जगण्याची लय मंद, सारेच कसे घरांमध्ये, होतात ठाणबंद. रुसते चालती आगीनगाडी, रुसतो तसाच रस्ता, पाऊलभर प्रवासासाठी खाव्या लागतात खस्ता. रिक्षा काय, टॅक्सी काय, होते पुरती लूट, खिशावरचा भार मग, सोसावा लागतो निमूट. वृत्तपत्रांत तसेच फोटो, जणू जुनेच साल, दरवर्षी हुबेहूब, तेच तसेच हाल. वाहिन्यांवर वाहते पाणी, तेच तेच रंग, आधीच्याच वर्षांचा तसाच सारा ढंग. नाले तुंबतात तसेच पुन्हा, तसेच असते चित्र, सुरू तसेच वर्षांचे जुनेपुराणे सत्र. येतो पूर, बुडतात गावे, घरे जातात वाहून, हवाईमार्गे मोठी माणसे, जातात सारे पाहून. हातचे पीक वाया जाते, डोळ्यांत दाटते पाणी, नोटा नाही घरात, किरकोळ उरली नाणी. माना टाकतात इमारती जुन्या, आवाज करीत (अखेरचा) मोठा, भरवसा अशा वेळी, साराच वाटतो खोटा. तशीच होते मग चौकशी, दाखल होतो गुन्हा, बातम्या येतात पेपरांमध्ये तशाच त्याच पुन्हा. छत्र्यांमधून काळ्या ऐशा, पुढारी येतात धावत, गाडय़ा आणि रुबाब आपला, आब तसाच सावरत. चौकश्यांचे सुटते फर्मान, तसेच नेहमीचे चोख, भिजत राहतो, थिजून जातो, साराच पुढे रोख. कॅलेंडर हे नित्य असते, असेच हे पावसाळी, पडो तो वेळी किंवा बरसो मग अवकाळी. तशीच आम्ही उलटतो पाने, दरवर्षी चार, पावसाचे आमुच्यासाठी हेच असे सार.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:19 am

Web Title: marathi articles on rain poems
Next Stories
1 बळीराजाचा अंत्योदय
2 वहाणेच्या बहाण्याने..
3 ट्रम्प यांची ‘खरी मैत्री’
Just Now!
X