News Flash

संध्याछाया..

सकाळ असो वा दुपार वा रात्र.. सगळे काही आता संध्याकाळसारखेच.

Senior-Citizen
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सकाळ असो वा दुपार वा रात्र.. सगळे काही आता संध्याकाळसारखेच. तोच करडेपणा, तोच रूक्षपणा, तोच झाकोळ. माणसेही तशीच. सरत्या उन्हासारखी दूर दूर जाणारी.. अंगावरची शाल अधिक घट्ट लपेटून घेत अडवाणीजी बाहेरच्या उगवत्या सूर्याकडे पाहात होते.. सूर्य. तेजाने तळपणारा. पाहता पाहता सहजच त्यांच्या मनात एक जुनी कव्वाली तरळून गेली. चढता सूरज ढलता है अशीच काहीशी होती ती.. बहुतेक. तेव्हा तिच्याकडे ध्यान नव्हते दिले आपण. आता तर शब्दही आठवेनात. एके काळी हेच शब्द आपल्या जिभेवर कसे तांडव करायचे. आता राहिली ती मनातलीच बात.. त्यांनी बाजूलाच आढय़ाकडे पाहात बसलेल्या मुलायमजींना विचारले, नेताजी, कोणती हो ती कव्वाली.. चढता सूरजवाली? मुलायमजी काहीतरी म्हणाले. अडवाणीजींना कळेनाच ते. हे या नेताजींचे नेहमीचेच. काय बोलतात तोंडातल्या तोंडात ते कोणाला कळाले तर रामलल्लाची शप्पथ! पण सूर्य चढता असला, की त्या तशा बोलण्यातही लोकांना गीतासार दिसते. आणि.. असो. त्यांनी एक सुस्कारा टाकला. लांब तिकडे मायावती स्तब्ध बसल्या होत्या. पुतळ्यासारख्या. त्यांनी विचारले, ‘मायावतीजी, कोणती हो ती कव्वाली?’ अडवाणीजींच्या पृच्छेने पुतळ्याची समाधी भंगली. त्यांनी घाईने हातातील पर्स उघडली. कसलेसे कागद होते आत- जुने.. भाषणाचे. त्यात या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मग बोलणार तरी काय? आणि आता बोलून उपयोग तरी काय? त्यांना तो जुना काळ आठवला. अहाहा! आपली ती वाचीव भाषणे.. लोक तल्लीन होऊन ऐकायचे. पण.. छे! घर फिरले की घराचे वासेही फिरतात ही सामाजिक अभियांत्रिकी आपल्या लक्षातच आली नाही.. हलकेच एक सामाजिक सुस्कारा सोडत त्यांनी मुलायमजींकडे नजर टाकली. ते अजूनही आढय़ाकडेच पाहात होते. तेही फिरलेल्या वाशांचाच विचार करीत असतील काय? त्या विचार करीत होत्या, तेवढय़ात त्यांना दाराशी कसलीशी हालचाल दिसली. की भ्रमच होता तो? कसली हालचाल नि काय? हालचालीचे केंद्र बदलले आता.. पण नाही. दरवाजात कोणीतरी उभे होते. आत यावे की न यावे, अशा मन:स्थितीत. येते. प्रत्येकावर ही वेळ येते. वाटते, आपण अजूनही बाहेरचे आहोत. अजूनही आपल्या आयुष्यात सकाळ आहे. माणूस धडपडतो बाहेरच प्रकाशात राहण्यासाठी. मायावतीजी हातातील पर्स घट्ट धरून उठल्या. अडवाणीजी आणि मुलायमजी दोघेही त्या व्यक्तीच्या स्वागतासाठी पुढे गेले होते. वृद्ध-उत्साहाने बोलावत होते, यावे यावे, शरदजी. बाहेर हवा खूप बदललीय हो. शरद यादव यांनी बाहेर पाहिले. बाहेर, सूर्यानेही घर बदलले होते. संध्याछाया दाटून येत होत्या..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 3:18 am

Web Title: marathi articles on senior citizen
Next Stories
1 पण लक्षात कोण घेतो?
2 बुलडोझरसूत्र
3 बाळकृष्णलीला!
Just Now!
X