विश्वास असो वा नसो, मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांत शिकणारे तमाम विद्यार्थी चांगलेच नशीबवान. मस्तपैकी पावसाळ्याचा मोसम आहे. आषाढ संपून श्रावण सुरू झालाय. अशा वेळी महाविद्यालयांत तासांना बसायचं म्हणजे शुद्ध अन्याय. वर्गाच्या खिडकीतून बाहेर छान पावसाच्या धारा बरसताना दिसतायत आणि आपण (सुलटे) चष्मेवाल्या प्राध्यापकांकडून बुककीपिंगची तत्त्वं समजून घेत राहायची? पावसाची श्रावणधून कानांवर पडतेय आणि आपण कुठल्या अ‍ॅसिडमध्ये कुठलं अ‍ॅसिड मिसळलं की काय अभिक्रिया होते ते शिकत राहायचं? पावसानं भिजलेल्या मातीचा दरवळ एकीकडे मन सैल करतोय आणि दुसरीकडे आपण दाढीवाल्या प्राध्यापकांकडून सम्यकआकलन दर्शन समीक्षेची मूलतत्त्वं ऐकत राहायचं..? किती वाईट, किती अरसिक प्रकार हा. विद्यार्थ्यांवर किती अन्याय करायचा तो. त्यांच्या मनाची जरा तरी काळजी असावी की नाही? पण इतर कुठल्या विद्यापीठाला नसली तरी मुंबई विद्यापीठाला आहे विद्यार्थ्यांच्या मनाची काळजी. म्हणूनच चार दिवसांची सुट्टी देऊन टाकलीये विद्यापीठाने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना. कालचा सोमवार ते परवाचा गुरुवार सुट्टी. तसेही शुक्रवारपासून आठवडासमारोपाचे वेध लागलेले असतातच विद्यार्थ्यांना. त्यामुळे पावसाचा आनंद लुटण्यासाठी जवळपास एक आठवडाभर मिळणार आहे त्यांना. ही अशी संधी मिळाल्याबद्दल या विद्यार्थ्यांनी ऋणी राहायला हवं ते विद्यापीठाचे कार्यतत्पर व कल्पक कुलगुरू संजय देशमुख यांचे. आता वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्यांत थोडं वेगळं म्हटलंय ते सोडा. त्यांनी या छानशा सुट्टीला ‘अध्ययन सुट्टी’ असलं बोजड नाव दिलंय. ‘विद्यापीठाचा निकाल रखडला असल्याने मध्यंतरी कुलपती म्हणजेच राज्यपालांनी देशमुख व इतरांची झाडाझडती घेतली आणि ३१ जुलैपर्यंत निकाल लावाच, असे निक्षून सांगितलं. या निकालासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत व्हायला हवे म्हणून प्राध्यापकांना चार दिवस तेच काम असेल. म्हणूनच महाविद्यालयांत चार दिवस नेहमीचे तास होणार नाहीत..’ असं वृत्तपत्रवाल्यांचं म्हणणं. ते जाऊ दे. त्यांचं काही फारसं मनावर घ्यायचं कारण नाही. माणसानं कसं सगळ्यातलं चांगलंच शोधायला हवं. कारण काही का असेना, या सुट्टीनं विद्यार्थ्यांच्या पावसाळी सहलीची केली की नाही उत्तम सोय. त्यांच्या रूक्ष आयुष्यात तेवढीच हिरवाई. ही बातमी इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या कानावर गेल्यानं ठिकठिकाणी अशाच सुट्टीची मागणी करण्यात येत असल्याचं कानी येतंय. इतकंच काय, इतके कल्पक, कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि तरीही स्वप्रसिद्धीचा मुळीच सोस नसलेले कुलगुरू आपल्यालाही लाभावेत, अशी इच्छा ऐन पावसाळ्यात राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मनात उगवून आलीये. आता हे परीक्षांमधील घोळ, निकालविलंब या गोष्टी म्हणजे आयुष्याचे अविभाज्य अंगच. त्याचा उगाच किती बाऊ करून घ्यायचा? त्या गोष्टी किती चिवडत बसायच्या? सोडून द्यायच्या झालं. आणि त्यामुळेच तर अशी अध्ययन सुट्टी मिळते, हे ध्यानात ठेवून पावसात चिंब भिजायला जायचं. ही अशी सुट्टी मिळायलाही नशीब लागतं. मुंबईच्या विद्यार्थ्यांना विचारा वाटल्यास..