बारा मावळापासून अपरान्तापर्यंत, वरदातटापासून गोदातटापर्यंत अवघा मऱ्हाटी माणूस ज्या एका क्षणाची युगानुयुगे वाट पाहात होता, तो क्षण अस्सा अस्सा दृष्टिक्षेपात आला आहे..

अहो विद्यापीठात ऑनलाइन झुंजणाऱ्या गुरुजनांनो, पटपूर्तीसाठी रानोमाळ हिंडणाऱ्या समायोजित मास्तरांनो, दिवाळी अंकाच्या मानकरी लेखकांनो, साहित्य संमेलनाच्या मांडवात रांगा लावलावून कवितेच्या विजा धरणाऱ्या महाकवींनो, झालेच तर मराठीच्या पालख्या उचलून त्यात आपणच बसणाऱ्या मराठीच्या उद्धारकांनो.. हत्तीवरून साखर वाटा, राजाबाई टॉवरवरून बताशे उधळा, मंत्रालयावर गुढय़ा उभारा, मोडकळीस आलेल्या ग्रंथालयांवर तोरणे लावा.

कां की – कोल्हापूरच्या अंबाबाईने, जेजुरीच्या खंडोबाने, पंढरीच्या विठोबाने अखेर आपल्या आर्त हाकेला ओ दिली आहे.. मंत्रालयाच्या दारात फाटके लुगडे नेसून उभ्या असलेल्या आपल्या मायमराठीच्या उद्धाराची घटिका आता समीप आली आहे. नाही मित्रहो, नाही.. याचा अर्थ आता लगेच महादुकानांतल्या, बाजारातल्या सगळ्या पाटय़ा मराठीत होणार असे नाही. नाही, नाही. न्यायालयांनी मराठीतून निकाल देण्यासाठी आपल्या संगणकाचे कळफलक बदलून घेतले आहेत असेही नाही किंवा आमच्या मुलांना मराठी माध्यमातूनच प्रवेश हवा म्हणून शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर कोणी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे असेही नाही. मंडळी, जे झाले आहे, ते गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाले नव्हते असे नाही. पाहा, पाहा. राजधानी दिल्लीतून ते वृत्त येताच पुण्याच्या एबीसी चौकापासून वांद्रय़ाच्या साहित्य सहवासापर्यंत कशी हर्षोल्हासाची रिमझिम बरसात होत आहे. मराठी साहित्यशुंडांच्या मनातून तर जणू प्रकाशकाने पुढच्या तीन महिन्यांच्या रॉयल्टीचा धनादेशच पाठविल्यासारखे आनंदोत्साहाचे धुंदगंधित समशीतोष्ण वारे वाहात आहेत. पाहा अवघी मराठी कायनात.. आनंदी आनंद गडे हे लतागीत गात आहे. या झिम्मडखुशीचे कारणही तसेच आहे मित्रहो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री रा. रा. महेशजी शर्मा यांनीच जाहीर केले आहे. एवढेच नव्हे, तर नव्या क्रियाशीलतेने    त्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचेही शर्माजींनी सांगितले आहे. समजलें ना मराठीजनहो? मराठी भाषेला आता छानसे व सुंदरसे दिवस येणार आहेत. आजवर अभिजातचा शिक्का नसल्यानेच ना झाली मराठीची आबाळ, पडल्या ना ओसाड मराठी शाळा आणि झाली ना दुर्दशा ग्रंथालयांची? आजवर अभिजात नव्हती म्हणूनच ना ती पडली बाजाराच्या सांदीकोपऱ्यात? पण आता तिला मिळणार आहे अभिजाततेची मनसबदारी पाचशे कोटींची. बस्स, ती वेळ आलीच आहे. जर्रा कळ सोसा मित्रहो. फक्त निवडणुका तेवढय़ा जाहीर होऊ द्या.. तोवर मनातल्या मनात मांडे खा मराठीजनहो अभिजातसे..