News Flash

तसबिरीचा घोटाळा

लेखक-नाटककार यांनी द्रष्टे असावे म्हणजे किती द्रष्टे असावे?

लेखक-नाटककार यांनी द्रष्टे असावे म्हणजे किती द्रष्टे असावे? त्याला काही सुमार? आपले नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे उदाहरण घ्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात त्यांनी ‘तसबिरीचा घोटाळा’ हे नाटक लिहिले. एका तसबिरीमुळे किती आणि काय घोळ होतात, ते त्यांनी नाटकातून मांडले. पुढे आपल्या देशात असे तसबिरींचे अनेक घोटाळे होतील, हे त्यांच्या द्रष्टय़ा नजरेला दिसले असणार नक्कीच. आपल्या देशाचा प्रांत भलतीकडेच दाखवणे, एखाद्या नकाशात नदीचे पात्र वेगळ्याच दिशेला दाखवणे हे झाले भौगोलिक तसबिरीचे घोटाळे. इमारतींच्या प्रकल्पाच्या जाहिरातींत थेट मुख्यमंत्र्यांची छबी वापरणे, एखाद्या कॅलेंडरात बाजूंना हटवून माननीय पंतप्रधानांना न विचारता त्यांचे चरखामग्न छायाचित्र वापरणे हे झाले वैयक्तिक तसबिरीचे घोटाळे. या धर्तीवर, केंद्रीय गृहखात्याच्या अहवालात भारत-पाकिस्तान सीमेवरील दिवेलागणीच्या छायाचित्राऐवजी पार तिकडच्या स्पेन-मोरोक्कोच्या सीमेचे छायाचित्र छापले जाणे याची गणनादेखील अनेकांनी ‘तसबिरीचा घोटाळा’ अशी केली असणार हे नक्की. ‘गृहखात्याकडून ही अशी चूक व्हावी.. शेम शेम..’ अशा प्रतिक्रियाही उमटल्या. समाजमाध्यमांवर त्याची चेष्टाही झाली भरपूर. मध्यंतरी काँग्रेसच्या एका पुस्तिकेत जम्मू-काश्मीरचा उल्लेख ‘भारतव्याप्त काश्मीर’ असा झाल्यानंतर आपल्याकडील जाज्ज्वल्य राष्ट्रवादी विचारांची मंडळी पेटून उठली होती. ‘हा तर राष्ट्रद्रोह’ अशी सार्थ प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली होती. पण हाच तर फरक आहे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात. काँग्रेसने आपल्याच देशातील एका भागाचे भलतेच बारसे करून टाकले, उलट मोदींच्या सरकारने स्पेन-मोरोक्कोचा सीमाभाग जणू आपलाच आहे, अशी प्रेमळ जवळीक दाखवली. मुळात दोन्ही सीमांवरील छायाचित्रांत इतके साम्य आहे की कुणाचीही फसगत व्हावी. तीच ती.. तशीच ती दिवेलागण आणि त्या दिवेलागणीची घाटदार वळणे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी आत्ताच स्पेनच्या दौऱ्यावर गेले होते, ही बाबही लक्षात ठेवायला हवी. सध्या जगभर मोदींचा डंका वाजतो आहे. प्रेमाने भारतच काय, अख्खे जग जिंकून घेता येते, हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. अंतरात असे प्रेम भरून वाहत असले की ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी मानसिक अवस्था होऊन जाते. अशा अवस्थेत मी, माझे.. तू, तुझे असे कुठलेही भेद उरत नाहीत. ‘म्हणजे माझे ते माझे.. तुझे तेही माझे, असेच म्हणायचे का’, अशी खत्रुड शंका काढतील काही जण. मनाची विशाल अवस्था समजून घेण्याची ज्यांची पात्रताच नसते, अशांच्या डोक्यातच ही शंका येऊ शकते, हे लक्षात ठेवायला हवे. जे जे आहे ते ते सगळ्यांचेच अशी ही मनोवस्था. ही मनोवस्था केवळ मोदींचीच नाही, तर त्यांच्या समग्र सरकारची झाली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा. त्यास तसबिरीचा घोटाळा म्हणून हिणवणे श्रेयस्कर नाही. उलट ती तसबीर अभिमानाने समाजमाध्यमांतून वाहती करावी व अधिकाधिक लाइक करावी. तेवढीच राष्ट्रसेवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:13 am

Web Title: mha report on border floodlights has picture of spain morocco border 2
Next Stories
1 संस्कारमंत्री.. काळाची गरज
2 बुडत्याला ‘सलाड’चा आधार
3 मॉलचा आपदधर्म
Just Now!
X