News Flash

सरकारच खरे!

शरीरातील प्राणवायूची पातळी ९५ वर होती. म्हणजे बॉर्डर लाइन!

मंत्री म्हणून सभागृहात प्रश्नाचे उत्तर देण्याचा उद्या पहिलाच दिवस. त्यामुळे नाशिकच्या ताई खुशीत होत्या. मागे एकदा सदस्य म्हणून सभागृहात बोलताना थोडी चूक झाल्याबरोबर मागे बसलेल्या आपल्याच तीन मैत्रिणी कशा खिदळल्या हे त्यांना आठवले. आता नव्या जबाबदारीत तशी चूक व्हायला नको असे मनाशी ठरवत त्या गृहपाठाच्या तयारीला लागल्या. सहायकाने समोर ठेवलेल्या फायलीत पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरावर त्यांची नजर खिळताच त्यांना घाम फुटला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात येताच एकाने पंख्याचा वेग वाढवला. दुसऱ्याने डॉक्टरला बोलावू का असे अदबीने विचारले. मानेनेच नाही म्हणत त्यांनी एकाला ऑक्सिमीटर आणायला पाठवले. ते बोटाला लावून बघितले तर शरीरातील प्राणवायूची पातळी ९५ वर होती. म्हणजे बॉर्डर लाइन! जीव घाबरा झाला की होते असे कधी कधी अशी मनाची समजूत काढत त्यांनी पुन्हा सभागृहात द्यायचे उत्तर वाचायला सुरुवात केली. ‘प्राणवायूच्या अभावाने देशात एकाही करोनाग्रस्ताचा मृत्यू नाही’ हे वाक्य त्यांनी दोनदा वाचले. हे खरे नाही, असे त्यांच्या तोंडून अभावितपणे निघून गेले. ते जणू ऐकलेच नसल्याचे भासवत खात्याचा अधिकारी सराईतपणे म्हणाला, ‘मॅडम, इस में अपना कोई रोल नही. राज्यांनीच माहिती दिली नाही त्याला आपण काय करणार?’ या बनेलांच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही असे मनात म्हणत त्या शांतच राहिल्या. पण विचारचक्र थांबेना. आपल्या नाशिकलाच ३० लोक गेले. गोंदिया, विरार, मुंबई अशा किती तरी ठिकाणी रुग्ण दगावले. याच दिल्लीत तर प्राणवायूअभावी रुग्ण तडफडून मरताना आपण वाहिन्यांवर कैकदा बघितले. स्वत: डॉक्टर असल्याने त्यावेळी झालेल्या वेदना आठवून पुन्हा त्यांचे अंग शहारले. हे उत्तर खरे असेल तर ती पडद्यावरची दृश्ये खोटी समजायची? त्यांच्या मनात काहूर माजवले. हे असले उत्तर आपल्याला द्यावे लागणार या कल्पनेनेच त्यांना कसेतरी झाले. लहानपणी शाळेत असताना एकदाच खोटे बोललो तेव्हा पडलेला आईचा मारही आठवला. खात्याच्या माणसाकडे बघत त्या म्हणाल्या, ‘ये फॅक्च्युअल नही है’ आजवर अनेक मंत्र्यांना ब्रीफिंग करून करून सरावलेला तो ठेवणीतले हसत म्हणाला, ‘मॅडम सरकार खरे, बाकी सारे मिथ्या. हेच सत्तेचे सूत्र आहे हे कृपया आपण लक्षात घ्यावे’ हे ऐकताच त्या नरमल्या. सध्याच्या काळात प्रश्न विचारणे वा उपस्थित करणे गैरच. त्यामुळे राजकारणच धोक्यात येऊ शकते हे वाक्य पक्षाच्या कुठल्यातरी प्रबोधन वर्गात ऐकल्याचे त्यांना आठवले. खरोखर राज्यांनी माहिती दिली नसेल का, अशीही शंका त्यांच्या मनात आली पण तिथल्या कुणाला ती विचारण्याचे धाडस त्यांना झाले नाही. मंत्रीपद टिकवायचे तर प्रश्न गिळण्याचा सराव करावा लागणार याची जाणीव त्यांना झाली. थोडा श्वासांचा व्यायाम करत त्यांनी पुन्हा प्राणवायूची पातळी तपासली- ९६! त्या थोड्या सुखावल्या. तरीही त्यांच्यातला डॉक्टर त्यांना स्वस्थ बसू देईना. काय करावे, कुणाला विचारावे का, असे प्रश्न मनात घोळत असतानाच त्यांना वाटले, खात्याच्या ‘कॅबिनेट’लाच का विचारू नये. लगेच त्यांनी फोन लावला. ‘ओटूच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही हे उत्तर तुम्हाला पटते का?’ हा प्रश्न ऐकताच पलीकडून उत्तर आले ‘ये ओटू क्या होता है, मुझे नही मालूम’ पुढे बोलण्याची इच्छाच मरून गेलेल्या ताईंनी ‘ठीक है’ म्हणत फोन कट केला व नाइलाजाने पुढचे ब्रीफिंग घ्यायला सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:09 am

Web Title: minister answer the question in the hall oxygen death of a coronary heart akp 94
Next Stories
1 बाहुबली-भाग ३
2 गुप्तवार्ता !
3 कैदच बरी!
Just Now!
X