‘नाशिकच्या शिवनेरी या विश्रामगृहात राज ठाकरे पहिल्या मजल्यावरील कक्ष क्र. १०१ मध्ये तर चंद्रकांतदादा पाटील तळमजल्यावर असलेल्या ‘गिरणा’ कक्षात थांबलेले होते. पहिल्या दिवशी दाखल होताच दादांनी चहा घेता घेता राजसाहेब कोणत्या कक्षात थांबले आहेत अशी चौकशी केली. रात्री कार्यक्रमावरून परत आल्यावर भोजनकक्षात त्यांनी साहेब जेवायला येऊन गेले का, असे विचारले तेव्हा खानसामाने त्यांनी कक्षातच जेवण मागवले असे उत्तर दिले. रात्री उशिरा कार्यकर्ते निघून गेल्यावर दादा विश्रामगृहाच्या आवारात शतपावलीसाठी बाहेर पडले. चालताना ते कुणाला तरी फोन लावत होते पण प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले. मग फोन खिशात ठेवून त्यांनी ठाकरे वास्तव्याला असलेल्या कक्षाकडे चालत चालत बघणे सुरू केले. कक्षाचा दिवा सुरू असल्याने ठाकरे कदाचित गॅलरीत येतील असे त्यांना वाटत असावे पण तसे घडले नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर कक्षाचा दिवा बंद होताच दादांचे चालणे थांबले. सकाळी ते एकटेच चहा घेत असताना त्यांना फोन आला तेव्हा त्यांनी ‘मिसळ एकत्र कधी खायची’ असे हसून समोरच्याला विचारले. नेमके त्याचवेळी ठाकरे फोनवर होते व ‘लवकरच एकत्र बसू’ असे म्हणाल्याची नोंद आपल्या सहकाऱ्याने घेतली. दुसऱ्या दिवशी दादा दिवसभर बाहेरच होते तर ठाकरे कक्षातच बैठका घेत अमितच्या हालचाली जाणून घेत होते. किमान आज तरी रात्री ते दोघे भेटतील याची कल्पना असल्याने दोन्ही कक्षात आम्ही जय्यत तयारी करून ठेवली तसेच रात्रीची कोणतीही घडामोड चुकू नये म्हणून जास्तीचे दोन सहकारी बोलावून घेतले. रात्री जेवत असताना अचानक एक व्यक्ती दादांजवळ आली व त्याने एक पेनड्राइव्ह त्यांना दिला. तो ठेवून घेत दादांनी दुसरा पेनड्राइव्ह त्याच्या हातात दिला. जेवणानंतर दादांनी शतपावलीऐवजी खालून पहिल्या मजल्यावर व पुन्हा खाली असा व्यायाम सुरू केला. वर गेल्यावर ते चारदा ठाकरेंच्या कक्षाजवळ गेले. तिथे अचानक थबकले. पण आत गेले नाहीत. विशेष म्हणजे तेव्हा आडून बघणारे आम्ही वगळता वऱ्हांडय़ात कुणीही नव्हते. अर्धा तास चढउतर केल्यावर दादा परतले. त्यांनी पेनड्राइव्ह लॅपटॉपला लावला. त्यात ठाकरेंचे परप्रांतीयाविषयी केलेले भाषण होते. ते मन लावून ऐकत असतानाच अचानक त्यांनी सुटकेसमधून इअरफोन काढून लॅपटॉपला लावले. त्यामुळे भाषणाचा आवाज येणे बंद झाले. तिकडे ठाकरेंच्या कक्षात सुद्धा त्यांनी मिळालेला पेनड्राइव्ह लावला. त्यात त्यांनी केलेला गुजरात दौरा व तिथे केलेल्या मोदींच्या कौतुकाचे चित्रण होते. ठाकरे मात्र इअरफोन न लावताच हळू आवाजात ऐकत होते. थोडय़ावेळात दोन्ही कक्षाचे दिवे मालवले गेले. भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी दादांना एक फोन आला. ते बाजूला जाऊन ‘सर सर’ म्हणून बोलत होते. ‘भेट झाली नाही’ एवढेच एक वाक्य शेवटी ऐकू आले. रात्रीच्या जेवणानंतर दादांनी पुन्हा शतपावली सुरू केली. तेव्हा ते फोनवर ‘कलानगरचे लक्ष आहे, माणसे पेरलेली आहेत तेव्हा कक्षात भेटणे कठीण दिसते’ असे म्हणत होते. यानंतर लगेच ठाकरेंच्या कक्षात अंधार झाला. निघण्याच्या दिवशी सकाळी सर्वत्र धांदल सुरू असताना दोघेही एकाचवेळी बाहेर आले व कार पार्किंगच्या एरियात बराचवेळ बोलले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे कुणालाही जाऊ दिले नाही. त्यामुळे नेमके काय बोलणे झाले ते कळले नाही.’

पाचव्या दिवशी हा अहवाल ज्यांच्या हाती पडला, त्यांनी गुप्तवार्ताच्या प्रमुखांना एका ओळीचा संदेश धाडला. ‘तुमच्या खात्यातील लोकांना आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे’!