14 December 2019

News Flash

..और ये मौसम हसीं!

‘पावसामुळे वाहतुकीचा बोजवारा वाजला असून जनजीवन उद्धवस्त झाले आहे’

‘पावसामुळे वाहतुकीचा बोजवारा वाजला असून जनजीवन उद्धवस्त झाले आहे’ असा ‘मेसेज’ मोबाइलवर येताच खलबतखान्यात येरझारा घालणाऱ्या साहेबांनी टेबलवर जोरात मूठ आपटून संताप व्यक्त केला. टेबलवरचा पुतळाही क्षणभर थरथरला. साहेबांना संतापाचे भाव चेहऱ्यावर आणता येत नसले तरी संतापल्यावर साहेब मूठ आपटतात हे सर्वानाच माहीत होते. साहेबांचा रागाचा पारा अचानक चढावा एवढे काय त्या मेसेजमध्ये असेल या कुतूहलाचे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटले. ‘‘अरे, उद्धवस्त नव्हे रे.. उद्ध्वस्त असे लिहायला हवे..’’ साहेब जोरात बोलले आणि संतापाने त्यांनी मोबाइल सोफ्यात फेकला. ‘प्रधान’जींनी तो अलगद उचलला आणि हळूच मेसेजबॉक्स उघडला. तो महापौरांचा मेसेज होता. नावामागे प्रिन्सिपल अशी उपाधी मिरविणाऱ्या महापौरांनी मुद्दामच ‘उद्धवस्त’ असे लिहिले असावे, अशी शंकाही प्रधानजींच्या मनात चमकून गेली. त्यांनी गुपचूप युवराजांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविला, ‘जनजीवन उद्ध्वस्त झाले असल्याने तातडीने पाहणीसाठी बाहेर पडावे लागेल!..’ वरच्या मजल्यावरच्या ‘स्टडी रूम’च्या खिडकीतून कोसळणारा पाऊस न्याहाळत त्याचे फोटो घेत असतानाच युवराजांनी तो मेसेज वाचला आणि ‘निघू या’ असा उलट मेसेज पाठवून ते खाली उतरले. गाडय़ांचा ताफा बाहेर उभाच होता. युवराज पाहणीसाठी निघाले. बंगल्याबाहेरच पावसाचे पाणी तुंबले होते. आसपास अनोळखी कुणी नाही हे पाहून युवराजांनी तोंडातल्या तोंडात पुटपुटत महापौरांच्या नावाने चारपाच ‘फुल्या-फुल्या’ सोडल्या.. ते ऐकून प्रधानजी चपापले. म्हणाले, ‘‘साहेब, इथे पाणी भरपूर दिसत असलं, तरी ते तुंबलेलं नाहीय.. फक्त साचलंय.’’ पण तिकडे लक्ष न देता युवराजांनी गाडीत बसताच फर्मान सोडलं, ‘कंट्रोल रूम’.. गाडय़ांचा ताफा बाहेर पडला. तोवर महापौरांना निरोप पोहोचला होता. मुख्यालयातील कंट्रोल रूमचा स्टाफ सज्ज झाला होता. ‘पावसाच्या संकटास तोंड               देण्यासाठी कंट्रोल रूम सज्ज आहे असे युवराजांना वाटले पाहिजे..’ मुख्य अधिकाऱ्याने सगळ्यांना बजावले आणि चहाचे कप भराभरा रिकामे करून सगळ्यांनी माना समोरच्या संगणकात खुपसल्या. टेलिफोनच्या घंटाही घणघणू लागल्या. सारे वातावरण तयार झाले आणि काही मिनिटांतच युवराज तेथे पोहोचले. अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराप्रमाणे युवराजांचे यथोचित स्वागत केले आणि युवराजांनी पाहणी केली. त्यांनाही सारे आलबेल वाटत होते. आता प्रधानजी काळजीत पडले. ‘सारे जनजीवन उद्धवस्त झाले आहे’, असे महापौरांनी का म्हटले असावे, शहर सुरळीत आहे, पावसामुळे शहरवासी सुखावला आहे, असे कालच तर ते म्हणाले होते. मग  आज अचानक असे? पण प्रधानजी काहीच बोलले नाहीत. तोवर युवराजांची ‘कंट्रोल रूम सफर’ पूर्ण झाली होती. बूमधारी पत्रकारांचा ताफा बाहेर वाटच पाहात होता. युवराजांची पावले संथ झाली. मग कुणी तरी समोर बूम  धरला आणि युवराज बोलू लागले, ‘‘संकटाचा सामना करण्यास शहर शंभर टक्के सज्ज आहे.  ही वाद वाढविण्याची वेळ नाही, तर परिस्थिती आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे..’’  एवढे बोलून युवराजांनी प्रधानजींकडे पाहिले. प्रधानजींनी हर्षांने मान डोलावली आणि  युवराज झपाझप बाहेर पडून गाडीत बसले.. ताफा बंगल्यावर परतला. युवराजांनी वरच्या मजल्यावरची खोली गाठून टीव्ही चालू केला. सगळ्या वाहिन्यांवर त्यांच्या भेटीचीच बातमी  सुरू झाली होती. बाहेर पावसाचा कहर सुरूच होता!

 

First Published on July 3, 2019 12:08 am

Web Title: monsoon in mumbai mpg 94
Just Now!
X