सत्तेत असलो तरी राज्याच्या हितासाठी सरकारशी संघर्ष करू, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असली, तरी सेना-भाजपमधील समन्वयाचे सूर अजूनही बिघडलेले नाहीत, हेच खरे. सत्ताकारणात भाजप हाच आपला सोबती आहे, याची शिवसेनेला खात्री असणार. सरकारमधील सहकारी पक्ष म्हणून भाजपकडून शिवसेनेची गळचेपी होत असली तरी जेव्हा सच्चा विरोधक म्हणून सरकारसमोर दंड थोपटून उभे राहायची वेळ येते, तेव्हा सरकार विरोधकांशी किती जिव्हाळ्याने वागते, याचा अगदी ताजा अनुभव शिवसेनेला आला असेल.  महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी हे समन्वयाने लोकशाहीचा गाडा पुढे नेत असल्याचे अविश्वसनीय दृश्य अनेकदा दिसते. विधिमंडळाची अधिवेशने किंवा रस्त्यावरील आंदोलनांच्या निमित्ताने विरोधक जेव्हा जेव्हा आक्रमक होतात, तेव्हा तेव्हा सरकार त्यांच्याशी सुरेख समन्वय साधते आणि आंदोलनाच्या पवित्र्यातील आक्रमक विरोधक समंजसपणे सरकारशी सहकार्याचीच भूमिका घेतात.

शिवसेना हा अधूनमधून सरकारमधील सहकारी पक्ष, म्हणजे, ‘सत्ताधारी’देखील असल्यासारखा जबाबदारपणे वागत असताना सेना-भाजप यांच्यातील समन्वय वाखाणण्यासारखाच असतो, हे प्लास्टिकबंदीच्या निर्णयातून स्पष्ट झाल्याने सेना-भाजपमधील नातेही अधिक घट्ट झाले. पण सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका घेतली, की समन्वयात माशी शिंकते. शिवसेनेने स्पष्ट विरोधकाची भूमिका घेतली की फडणवीस सरकार सहकार्याची भूमिका घेते, आणि सामंजस्याने तोडगा निघतो. सरकार एक पाऊल मागे घेत असल्याने शिवसेनाही समंजसपणाने एक पाऊल मागे घेते. ‘युती’चे सूर अजूनही बिघडलेले नाहीत, अशी आशा उभय पक्षांतील युतीधार्जिण्या नेत्यांमध्ये अजूनही धुगधुगी धरून आहे, त्याचे कारणही तेच आहे. म्हणूनच, मुख्यमंत्र्याचे सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षां’वर ठिय्या मारून सरकारचा निषेध करण्याची कट्टर विरोधकाची भूमिका शिवसेनेने घेताच, विरोधकांशी ज्या जिव्हाळ्याने वागतात तेवढय़ाच जिव्हाळ्याने मुख्यमंत्र्यांनी ती समस्या हातावेगळी केली. नगरपासून नाणापर्यंत अनेक प्रश्नांवर विरोधकाच्याच स्पष्ट भूमिकेत असल्याने, शिवसेना हे लोकशाहीच्या गाडय़ाचे दुसरे ‘तात्पुरते’ चाक झाले आहे. हे जाणून मुख्यमंत्र्यांनी समंजसपणा दाखवून आणि ‘अकारण कारवाई करणार नाही,’ असे आश्वासन देऊन शिवसेनेचा विरोध मवाळ केला आणि सामंजस्याने तोडगा निघाला. सत्तेत राहून संघर्ष करण्यापेक्षा, विरोधात राहून सरकारशी समन्वय साधण्याचे आगळे राजकारण शिवसेनेने करून दाखविले. राज्याच्या स्थैर्याकरिता आम्ही सत्तेसोबत आहोत, असे संजय राऊत नेहमी सांगत असतात. पण विरोधात राहून अधिक चांगला समन्वय साधला जात असेल, तर मूळ स्वभावाला मुरड घालण्यात काहीच अर्थ नाही. ‘वर्षां’वर ठिय्या आंदोलन करण्याचा पुरेपूर गाजावाजा करूनही ते ऐनवेळी मागे घेण्याचा समजूतदारपणा दाखवून समन्वयाचे आगळे उदाहरण शिवसेनेने उभे केले आहे. सत्तेच्या बाकावरून विरोधी सूर लावण्यापेक्षा, विरोधी बाजूने लावलेले समन्वयाचे सूर अधिक मंजूळ असतात, हेही महाराष्ट्रास पाहावयास मिळाले!