18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

संस्कारी आजी

आमच्या तरी मनात काहीही शंका नाही.

लोकसत्ता टीम | Updated: April 27, 2017 5:06 AM

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण हे देशाच्या भावी पिढय़ांसाठी पिढय़ान्पिढय़ा मार्गदर्शक ठरणार आहे, याविषयी आमच्या तरी मनात काहीही शंका नाही. ज्यांच्या मनात असेल, ते कुसंस्कारी. गोवा विद्यापीठाच्या त्या घटनात्मक प्रमुख. केवढा मोठा त्यांचा अधिकार. त्या नात्यानेच त्यांनी त्या विद्यार्थ्यांना चार मोलाच्या गोष्टी ऐकविल्या. त्यांच्या ज्ञानात भर घातली. प्रत्यक्ष राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरसुद्धा त्या भाषणाने भारावले म्हणतात. होतेच ते तेवढे प्रभावी आणि सुसंस्कारी. अनेकांस ते भाषण त्यांच्या त्यांच्या कर्णसंपुटात साठवून ठेवण्याचे सद्भाग्य लाभले नाही. म्हणूनच आम्ही ते येथे सहर्ष सविनय सादर करीत आहोत. आम्ही ते भाषण ऐकले ते असे – ‘माझ्या लाडक्या मुलांनो.. हसू नका रे.. तुम्ही पीएचडी केलीत, पदव्युत्तर पदवी मिळवली म्हणून काय झालं? अं? माझ्यासाठी किनई तुम्ही मुलंच आहात. लहानलहान मुलं. निष्पाप, निरागस. गुलाबपुष्पांसारखी शोनुली मुलं. तुमच्यापुढं मी किनई भाषणबिषण नाही हं करणार. भाषणं म्हणजे काय नेहमीच जडजड बोलायचं नसतं. उगाच कशाला विचारबिचार द्यायचे मुलांना. कंटाळतात ना मग ती? भावी पिढीला नं विचारांऐवजी आपण फक्त संस्कारच दिले पाहिजेत. म्हणून नं मुलांनो, मी तुम्हाला संस्कारच देणार आहे. तर बरे का मुलांनो, तुम्ही ना लग्न करा. म्हणजे नं बघा, विवाह नं अनिवार्य नसतो, पण आवश्यक असतो की नै? मग तो करायलाच हवा. पण नं हल्लीची मुलं लगेच घटस्फोट घेतात. आता घटस्फोट घेणं हे वाईटच की नै? एकमेकांशी पटलं नाही म्हणून काय घटस्फोट घ्यायचा? नसेल पटत. होत असतील टोकाचे वाद. अगदी जगणं अवघड झालं असेल. पण त्यासाठी का कोणी पवित्र विवाहबंधन तोडतं का? नै की नै? तेव्हा तुम्ही ना, आता शपथच खा, की घटस्फोट घेणार नाही. शिवाय आजूबाजूचा कचरा चांगला असतो की? मग आपण कचरा कशाला करायचा? मोदींच्या स्वच्छता अभियानात आपण नको का सहभागी व्हायला? मग खा बरे शपथ!’ आज्जींनी मुलांना असे खूप खूप संस्कार दिले नि पार शपथबद्ध करून टाकले म्हणतात. त्यांना खरे तर अजून खूप काही संस्कार द्यायचे होते. म्हणजे नेहमी खरे बोलावे, सकाळी उठून दात घासावेत, रोज अंघोळ करावी, शुभंकरोती म्हणावी, आईबाबांची, समाजाची, देशाची, सरकारची सेवा करावी. पण वेळ कमी पडला. त्यामुळे ती पीएचडी झालेली मुले मोठय़ा संस्काराला मुकली. हे टाळायचे असेल, तर या संस्कारी राज्यपाल आजींनी राजभवन सोडून असे संस्कारवर्गच चालवायला हवेत. केवढी मोठी देशसेवा होईल त्यांच्या हातून..

 

First Published on April 27, 2017 5:01 am

Web Title: mridula sinha marathi articles