खरे वाघ आणि कागदी वाघ यांच्यात फरक काय, असा प्रश्न खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एकदा पडला होता, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण तसे घडले. खऱ्या वाघाने कधीच गरिबांना लुबाडणाऱ्याला पाठीशी घातले नसते, असा एक मखमली जोडा नरेंद्र मोदींनी मारला. नंतर काही दिवसांतच तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि शारदा चिट फंड घोटाळ्यामुळे बदनामीचे धनी झालेले मुकुल रॉय भाजपवासी झाले. त्यानंतर आता, देशात बदल घडवायचा असेल, तर भाजपमध्ये दाखल झाले पाहिजे, असा एक नि:स्वार्थ साक्षात्कार मुकुल रॉय यांना झाला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला राजकारणाच्या पटलावरून पुसून टाकायचे असेल तर निवडणुकीत त्याला चीतपट करणे हा पठडीबाज मार्ग आता खूपच जुना झाला. तीन वर्षांपूर्वी एक नवा पर्यायी मार्ग उदयाला आला आणि ‘मुक्तीचा नारा’ देशात घुमू लागला. ‘शत प्रतिशत’ पक्ष प्रस्थापनेसाठी अन्य पक्षांच्या तारूत हवा भरणाऱ्या शिडांनाच भोके पाडणे हा मुक्तीचा मार्ग ठरला. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या आरोपांनी घायाळ असलेल्या मुकुल रॉय यांना कसेही करून मुक्तीचा मार्ग हवा होता. पश्चिम बंगालमधील खडतर रस्ता विनासायास कापण्यासाठी मुकुल रॉयना खांद्यावर घेऊन अपरिचित बंगालात आपले पहिले पाऊल तरी खड्डय़ात पडणार नाही, याची खात्री झाली आणि रॉय यांना पुढे करून भाजपने ममतादीदींच्या विरोधात दंड थोपटले. भाजपचे कोणतेही युद्ध हे ‘धर्मयुद्ध’च असल्याने, भ्रष्टाचाराचा आरोप असला तरी भाजपमध्ये आलेले मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात पुकारलेले युद्धदेखील धर्मयुद्धच असणार हे तर ठरलेलेच असते. भाजपसाठी अशा धर्मयुद्धांची क्षेत्रे देशात अनेक जागी विखुरलेली असल्याने, जागोजागीचे मुकुल रॉय तंबूत आणण्याची रणनीती भाजपने आखलेली आहे. लंकेच्या रावणाचा पराभव करण्यासाठी रामानेही बिभीषणाची मदत घेतलीच होती. त्यामुळे बिभीषणाला सोबत घेणे हीच रामभक्तांच्या धर्मयुद्धाची रणनीती असल्याने आणि युद्धात सारे क्षम्य असल्याने, जागोजागीच्या धर्मयुद्धांसाठी बिभीषणांचा शोधही सुरू झाला. साक्षात धर्मच सत्तेवर असल्याने त्याच्या बाजूने लढण्यासाठी जागोजागी जे जे उत्सुक आहेत ते सारे बिभीषणच, हे सूत्र पक्के होऊन आता रामभक्त भाजपच्या तंबूत उत्साहाचे वारे संचारले आहे. महाराष्ट्रात हेच वारे वाहू लागल्याने, पुढच्या धर्मयुद्धाची तयारीही सुरू झाली आहे. या युद्धाची रणभूमी कोकणच्या किनाऱ्यावर असेल आणि त्यासाठी स्थानिक बिभीषणाच्या खांद्यावर धर्मयुद्धाचे निशाण चढविले जाईल. रामभक्तांनी ज्याला तीन वर्षांपूर्वी रावण ठरविले, त्याच्या पराभवासाठी बिभीषणाची मदत घेणे हेच तर धर्मयुद्ध असते. बंगालनंतर कोकणातल्या कुडाळातील धर्मयुद्धात एके काळच्या रावणालाच आता बिभीषण ठरविले गेल्यास आश्चर्य नाही.