नाताळदिनी, म्हणजे २५ डिसेंबर २०१७ या तारखेला मुंबईत पश्चिम रेल्वेवर वातानुकूल लोकलफेरी सुरू होणार आहे. रेल्वे ही खरोखरच धर्मनिरपेक्षता जपणारी असल्याने नाताळचा उल्लेख टाळून, विक्रम संवतनुसार २०७४ साली, शालिवाहन शकानुसार १९३९ सालच्या किंवा शिखांच्या नानकशाही कालगणनेनुसार ५४८ सालातील ‘पौष सप्तमी’ अशीसुद्धा ग्रेगोरियन ख्रिस्ती दिनदर्शिकेतील २०१७ सालातली २५ डिसेंबर ही तारीख सांगता येईल. याच (ग्रेगोरियन) तारखेस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवसही असतो. ग्रेगोरियन तारीख सोयीसाठी सार्वत्रिक मानली जाते. सोय महत्त्वाची, हेच पश्चिम रेल्वेच्या या वातानुकूल निर्णयामुळे जनमानसात ठसेल. तशाच प्रकारचा एक भावी निर्णय मध्य रेल्वेच्याही गाडय़ांसाठी प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित किंवा भावी निर्णय वातानुकूल गाडीबाबतचा नसून, भगव्या रंगाबाबतचा आहे. यात ‘भगवा रंग’ हे निव्वळ सोयीसाठी म्हटलेले आहे. ‘महिलांचे डबे यापुढे फिक्या भगव्या रंगाचे करावेत, या रंगामुळे शौर्य, त्याग अशा गुणांचा परिपोष होऊन महिलांच्या संरक्षणास मदत होईल,’ अशी लेखी सूचना रेल्वे सुरक्षा बलाचेअतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणव कुमार यांनी केलेली आहे. मध्य रेल्वेस करण्यात आलेली ही सूचना भारताचे वैविध्य जपणारीच आहे. कशी ते पश्चिम रेल्वेच्या उदाहरणातून पाहू. वातानुकूल गाडी २०७४ किंवा १९३९ किंवा ५४८ सालच्या पौष सप्तमीपासून किंवा इस्लामी हिजरी कालगणनेनुसार १४३९ सालच्या रबी-अल-अखिर महिन्यातील दिनांक ६ पासून  सुरू होणार, असे म्हटले असते तर कोणास काही समजले असते का? त्यापेक्षा ‘२५ डिसेंबर २०१७’ समजले की नाही? तसेच भगव्या रंगाचे आहे. मुंबई-ठाणे परिसरात महिलांना चालक-परवाने दिलेल्या रिक्षा ‘अबोली रिक्षा’ म्हणवल्या जाणाऱ्या रिक्षांचा रंग पाहा- तोही फिका भगवाच रंग आहे. ‘अबोली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची उभट नाजूक फुले पाहा.. तीही फिकट भगवीच दिसतील. हा फिकट भगवा रंग देशातील माताभगिनींच्या संरक्षणासाठी ज्या प्रणव कुमार यांनी सुचवला, त्यांनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘नोट’मध्ये ‘लाइट सॅफरॉन’ असा शब्दप्रयोग आहे. यासाठी हिंदीत ‘हल्का केसरिया’ हाही शब्द आहे. म्हणजेच याच्याशी भगवेकरण वगैरेचा काही म्हणता काहीही संबंध नाही. उगाच रंगांना राजकारण कशाला बरे चिकटवायचे? उद्या महिलांच्या डब्यात ‘स्थैर्य, शहाणीव, आत्मविश्वास’ नांदावेत, असे वाटल्यामुळे दुसरे कोणी अधिकारी हे डबे निळ्या रंगात रंगवण्याची शिफारस करू शकतात किंवा आणखी कुणाला जर महिलांच्या डब्यात नवोन्मेष, उपजक्षमता, ऊर्जा, चैतन्य यांची वाढ व्हावी असे वाटले तर रेल्वेचे हेच डबे हिरव्या रंगात रंगवले जाऊ शकतात. याचा अर्थच असा की, प्रणव कुमारांच्या सूचनेविषयी ‘भगवेकरण’ वगैरेची चर्चा करण्याचा कोणताही हक्क कोणालाही उरत नाही. त्याऐवजी, ‘अबोलीकरणा’कडे सकारात्मकतेने पाहा, एवढाच त्या भगव्या सूचनेचा अर्थ आहे.