News Flash

दिवा राहिलाच पाहिजे!

मुंबईच्या प्रथम नागरिकाच्या अस्मितेचा आहे.

हा एकटय़ा महापौरांचाच नाही, तर सबंध पालिकेचा अवमान आहे. पालिकेच्या हेरिटेज इमारतीचा, समोरच्या रेल्वे स्थानकाचा, बोरीबंदरचा, कोर्टाचा, साऱ्या महामुंबईचा, त्यातील उत्तुंग टॉवरांचा, उपकरप्राप्त इमारतींचा, चाळींचा, फोटोपासधारक झोपडय़ांचा, परवडणाऱ्या घरांचा.. आणि त्यात जीव कोंडून राहत असलेल्या तमाम मुंबईकरांचा हा अपमान आहे. मुंबईतले मर्दमावळे तो कदापि सहन करणार नाहीत. आणि का म्हणून सहन करायचा? केवळ सत्तेत आहेत म्हणून? त्या दीडदमडीच्या सत्तेचा मोह त्यांना मुळीच नाही. पण आता हातात आलीच आहे, तर सोडा कशाला उगाच? सोडणार नाही! आता तर अंगात सहा हत्तींचे बळ आले आहे. आणि म्हणूनच असले अपमान सहन करणार नाहीत हे मर्दमावळे. म्हणे महापौरांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाका. का? गाडी महापौरांची, दिवा महापौरांचा, त्याचे वीजबिलही महापौरच भरणार.. मग वाहतूक पोलिसांच्या पोटात का दुखते? नोटीस काढली त्यांनी. मुंबईच्या महापौरांना. तीही ऐन दिवाळी सणाच्या काळात. काही काळवेळाचे भान बाळगाल की नाही? हा हिंदूूंचा दिव्यांचा सण. या काळात दिवे लावायचे, की काढायचे? काल काय म्हणे फटाके वाजवू नका म्हणाले. आज काय लाल दिवे लावू नका म्हणतात. उद्या म्हणतील, गाडीवरच्या हेडलाइट काढून टाका. आता मग काय हिरवे दिवे लावायचे? आमच्या कट्टर हिंदुत्वावर प्रहार कराल, तर याद राखा. मग या मुंबईत एकही लाल दिवा पेटू देणार नाही. नगरसेवक फोडले. तेथे सिग्नलचे दिवे म्हणजे कोण्या झाडाचा पाला! सगळे लाल सिग्नल फुटलेले दिसले तर जबाबदारी आमची नाही. मग पाहू, तुमचे पोलीस कसे वाहतुकीचे नियमन करतात ते. हे वाहतूक पोलीस कोणाच्या इशाऱ्यावरून काम करीत आहेत ते माहीत आहे आम्हाला. दिल्लीतले केंद्र सरकार महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा नेहमीच तिरस्कार करते. पण ते आता आम्ही चालू देणार नाही. प्रश्न केवळ लाल दिव्याचा नाही. मनात आणले, तर गाडीवरच काय, पण डोक्यावरसुद्धा असे छप्पन्न लाल दिवे लावून या महाराष्ट्रातून फिरू. पण प्रश्न मुंबईच्या प्रथम नागरिकाच्या अस्मितेचा आहे. त्याला काहीही अधिकार नाही. सगळे काही आयुक्तांच्या मनावर चालणार. ते एक वेळ सहन केले. पण म्हणून त्याला तुम्ही ‘व्हीआयपी’ वागणूक देणार नाही? महापौर होण्यासाठी किती आटापिटा केलेला असतो. पैसे ओतलेले असतात. त्या मेहनतीला काहीच किंमत देणार नाही तुम्ही? मग कशाला म्हणायचे त्यांना प्रथम नागरिक? अशाने लोक नगरसेवकांनाही खरोखरच सेवक म्हणू लागतील. काय राहील मग त्यांची इज्जत? लोकशाहीत सारेच समान झाले, तर अतिसमानांचे काय होणार? चालणार नाही. लाल दिवा राहिलाच पाहिजे. निदान तेवढे तरी दिवे लावल्याचे सुख मिळू द्या.. काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 1:34 am

Web Title: mumbai mayor car red beacon tardeo rto notice
Next Stories
1 कागदाचा तुकडा..
2 खराखुरा ‘आम आदमी’..
3 सरस्वतीपुत्राचे स्तुतिस्तोत्र..
Just Now!
X