X

न खाने दूंगा..

पोलीस ठाण्यांच्या आवारात तरी कोंबडे कापून आता गटारी साजरी केली जाणार नाही.

पोलीस हा कायद्याचा रक्षक असल्यामुळे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरी त्याने कायदा मोडू नये यासाठी मुंबई पोलीस दलाने गटारीच्या सुमुहूर्तावर सुरू केलेल्या मोहिमेस सर्वप्रथम शुभेच्छा! एक तर गटारी हा या मराठी मुलखातील एकमेव आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष सण.. या सणाला कोणत्याही धर्माची अधिकृत चौकट नसल्यामुळे तो साजरा करण्यावरून कोणतेही धार्मिक वाद उफाळल्याचे आजवर कुणाच्या ऐकिवातही नाहीच; उलट तो साजरा करण्याच्या संकल्पनांबाबत सर्वपक्षीय एकमतच असते. हे खरे असले तरी, पोलीस ठाण्याच्या परिसरात तरी पोलिसांना कायदा पाळावाच लागतो. त्यामुळे, पशुपक्ष्यांच्या हिंसा रोखण्याचा कायदा पाळण्याची जबाबदारी तरी ओळखलीच पाहिजे, असा साक्षात्कार ऐन गटारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलीस दलास झाला ही अभिनंदनीय बाब आहे. खरे म्हणजे, गटारी हा सणच नव्हे. ही तर केवळ एक निमित्तसंध्या असते. हा दिवस मावळला, की श्रावण पाळण्याची प्रथा सुरू होते, हे या दिवसाचे वैशिष्टय़! जवळपास एक महिनाभर श्रावण नावाचे शाकाहाराचे व्रत पाळणे हे सामिषाहारींसाठी मोठेच धार्मिक आव्हान असते. ते पेलण्याची मानसिक शक्ती गटारी साजरी करण्यामुळे प्राप्त होईल, असा सर्वसाधारण समज असतो.  यापूर्वी गटारीच्या या निमित्तसंध्येस त्याच्या कायदापालकाच्या भूमिकेपासून त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच गुपचूप मुक्तता दिली जायची. दलाच्या कडक शिस्तीला लाभलेली ही माणुसकीची किनार म्हणजे पोलिसांच्या दगदगीच्या दिनक्रमास मिळणारा मोठा दिलासा होता. गटारीच्या एक-दोन दिवस अगोदर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराशी जिवंत कोंबडय़ाचा बळी द्यायचा आणि त्याच्या देहापासून शिजविलेल्या खमंग चिकन वा बिर्याणीचे वाटे पोलीस कर्मचाऱ्यांनी गटारीचा प्रसाद म्हणून आपापसात वाटून घ्यायचे, ही अनोखी प्रथा मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांत सुरू होती. अशा प्रथांमुळे पोलिसांमध्ये कौटुंबिक भावना बळावते आणि ठाण्याच्या हद्दीत कधीच एकटय़ाने काही खाऊ नये असाही सुसंस्कार प्रत्येकाच्या मनावर बिंबविला जातो, अशी या सणाची महती असल्याने, गटारीचा सण साजरा करण्याचा त्या त्या ठाण्यांत सणाचा अपरिमित उत्साह ओसंडून वाहात असे. आता त्यावर विरजण पडणार असले, तरी कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलीस दलाने ते कडवट वास्तवही स्वीकारले असेल यात शंका नाही. पोलीस ठाण्यांच्या आवारात तरी कोंबडे कापून आता गटारी साजरी केली जाणार नाही. साहजिकच, त्या दिवशी मिळणारा सामुदायिक प्रसाद यंदा पोलिसांना मिळणार नाही आणि एक तीळ सात जणांत वाटून घेण्याच्या संस्कृतीला एका दिवसापुरती कात्री लागेल. या सौहार्द संस्कृतीचे बारमाही संस्कारदर्शन अनेक सरकारी खात्यांमध्ये होत असते. मिळून सारे जण ही भावना जेथे जेथे जपली जाते, अशा जागांमध्ये पोलीस ठाण्याचा क्रमांक बराच वरचा असतो. बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये ही संस्कृती रुजलेली असली तरी ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ अशी घोषणा पंतप्रधानांनी केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातील गटारी साजरी करण्यावर बंदी आली असली तरी, गटारीच्या पूर्वसंध्येस पार पाडावयाच्या या सणाच्या पारंपरिक प्रथा मोडीत काढणे ही वाटते तितकी सहजशक्य गोष्ट नाही. काळजावर दगड ठेवून प्रथेला मूठमाती देण्याचे धाडस पोलिसांनी केले आहे. म्हणूनच त्याचे कौतुक केले पाहिजे..