‘सात टक्के किंवा अधिक विकासदर असलेली अर्थव्यवस्था’ हे मानाचं बिरुद आम्ही काही महिन्यांपूर्वी गमावलं म्हणून हिरमुसले होण्याचे कारण नाही. नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांसारख्या गौरप्रधान संस्थांना आमच्या देशाची महती कधीही कळलेली नाही, हे आम्ही फार पूर्वीच ताडलेलं आहे. अखेर एका कुठल्याशा ‘टॉमटॉम’ नामे संस्थेने भारतीय प्रगतीची थोरवी जगाला सांगून टीकाकारांची तोंडे आणि लेखण्या बंद करून टाकल्या. हे म्हणजे फारच उत्तम झालं. त्यांची राष्ट्राच्या दृष्टीने पुण्याई कोणती? तर त्यांनी नुकतीच एक यादी प्रकाशित केली. जीत जगातील पहिल्या दहा शहरांची नावं देण्यात आली आहेत. यात चार भारतीय शहरं दिमाखानं झळकतायेत. ती आहेत बंगळूरु, दिल्ली आणि आम्हा मराठी माणसांस सदैव अभिमानास्पद वाटणारी मुंबई आणि पुणे. काय आहे या शहरांची जगद्विख्यात कामगिरी? तर ही जगातली सर्वाधिक ट्रॅफिकपीडित शहरं आहेत. काय म्हणता, यात कसला आलाय अभिमान? का नाही? नव्हे, तो असलाच पाहिजे. ट्रॅफिक कशामुळे होतं? वाहनांमुळेच ना? ठीकाय, आमच्याकडे रस्ते, उड्डाणपूल, गटारे, पदपथ आणि आता मेट्रो अशी विकासकामं विशेषत: सर्वच मोठय़ा शहरांत सुरू असल्यामुळेदेखील रहदारीमध्ये वाढच होत आहे. पण वाहनं काय किंवा मेट्रो काय, ही प्रगतीची आणि समृद्धीचीच लक्षणं ना? समृद्धलेणीच जणू. त्या यादीत कोणकोणती शहरं आहेत पाहा बरं : मनिला, बोगोटा, मॉस्को, इस्तंबुल, जाकार्ता, लिमा.. आमचं बंगळूरु यादीत पह्य़लं आहे पह्य़लं! मुंबई चौथं आणि ट्रॅफिकसह काहीही उणे नसलेलं पुणे पाचवं. यादीत पहिल्यांदाच समावेश झालेल्या पुण्यानं थेट पाचव्या क्रमांकावर मुसंडी मारलेली आहे. लवकरच अव्वल स्थानावर झळकणार अशा पैजा पुणेकर चौकाचौकात घेताना दिसू लागतीलच. पहिल्या पाचात तीन शहरं. इतर कोणत्या यादीत भारतातील तीन-तीन शहरं पहिल्या पाचात सापडतील का? राजधानी दिल्ली यादीतलं आठवं रत्न. लंडन, न्यू यॉर्क, पॅरिस, बर्लिन, झुरिच ही पुढारलेली शहरं म्हणता ना? कुठं आहे तिथं ट्रॅफिक? काही ठिकाणी अजूनही त्या जुनाट ट्राम चालतात म्हणे. यात कसलं आलं पुढारलेपण. तर आता देशाचं नाव महान करणाऱ्या या शहरातील वासीयांसाठी काही सवलती आमच्या सरकारनं दिल्या पाहिजेतच. बंगळूरुकर ट्रॅफिकमुळे रस्त्यावर वर्षांकाठी २४३ तास किंवा १० दिवस अतिरिक्त घालवतात. ७१ टक्के अतिरिक्त वेळ ट्रॅफिकमुळे अडकल्यामुळे होते. मुंबई ६५ टक्के, पुणे ५९ टक्के आणि दिल्ली ५६ टक्केअसं प्रमाण आहे. मग.. या चार शहरांमध्ये काम करणाऱ्यांसाठी अनुक्रमे १०, ९, ८, ७ दिवसांची अतिरिक्त रजा का मंजूर करू नये? इतके दिवस वाया जातात हा काय त्या बिचाऱ्या शहरवासीयांचा दोष? त्यांना फुकट गेलेल्या तासांची भरपाई मिळायलाच हवी. तिच्यासाठी पैसे कोण मोजणार, तेव्हा त्याऐवजी फुकट गेलेल्या दिवसांची रजाच मंजूर करून या शहरवासीयांना दुहेरी आनंदाचा लाभ मिळवून द्यावा, अशी सरकारकडे नम्र विनंती!