16 January 2019

News Flash

कला कलाने शेती..

अर्रे तसे नव्हे. विविध योजनांसाठी सरकार जिचे संपादन करते त्या जमिनीस शेती म्हणतात

प्रतिकात्मक छायाचित्र

– कलचाचणी म्हणजे काय रे भाऊ?

– अरे, कित्ती रे तू अडाणी! अरे, कलचाचणी म्हणजे कोणास काय आवडते ते तपासून पाहण्याची एक परीक्षा होय. ती शास्त्रशुद्ध असते असे आपले गुरुजी सांगतात.

– आपले गुरुजी सांगतात म्हणजे ते खरेच असेल, नव्हे काय भाऊ?

– होय रे होय. ते मन की बात कधीही सांगत नाहीत. परंतु तुला कलचाचणीचे काय करावयाचे आहे रे?

– मला काहीही करावयाचे नाही रे भाऊ. तथापि आमच्या दादाने कलचाचणी केली असून, त्याचा कल शेतीकडे असल्याचे त्यात आले आहे. म्हणून तुजला विचारले. परंतु शेती म्हणजे काय रे भाऊ?

– अरे, तुजला शेती माहीत नाही? कित्ती रे तू ग्रामीण? अरे शेती म्हणजे ज्यात शेतकरी काम करतात.

– अच्छा म्हणजे शेतकरी जेथे नोकरी करतात ते कार्यालय म्हणजे शेती काय रे भाऊ?

– अर्रे तसे नव्हे. विविध योजनांसाठी सरकार जिचे संपादन करते त्या जमिनीस शेती म्हणतात. त्यात काळी माती असते. व तेथे शेतकरी यांचे फार्म हाऊसही असते. तेथे राहून शेतकरीवर्ग भलरी दादा भलगडी दादा अशी गीते गात काम करतो.

– म्हणजे आमचे बाबा खुशीत आले की रामरक्षास्तोत्र म्हणतात तसे शेतकरी खुशीत आले की गाणी म्हणतात, असेच नव्हे काय? परंतु ते खुशीत का येतात रे भाऊ?

– अरे आता कसे सांगू बरे तुला? अरे शेतकरी हे नेहमी मोकळ्या हवेत फिरत असतात. तसेच त्यांना चांदण्यासारख्या उन्हात काम करण्याची संधीही मिळते. शिवाय शेतकरी यांना शेतीमुळे पीक व भाजीपाला मिळतो, तसेच कर्ज व कर्जमाफीही मिळते. अशा नाना कारणांमुळे ते खूश व आनंदी असतात. समजले का तुला?

– होय रे भाऊ. मला  समजले. म्हणूनच आमच्या दादाचा कल शेतीकडे आहे काय रे भाऊ?

– होय रे होय. तुझ्या दादाप्रमाणेच ब्रह.. ब्रह. ब्रहन-मुंबईतील दहावीच्या सहा हजार विद्यार्थ्यांचा कलही शेतीकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे बरे.

– बाप रे बाप. एवढी मुले एकाच वेळी शेतीकडे का कलली रे भाऊ?

– आता मात्र हद्दच झाली हो तुझ्यापुढे? अरे मी एवढे समजावून सांगितले, तरी तुझे मात्र पहिले पाढे पंचावन्नच! छे छे!! आता तुला कसे बरे सांगावे? अरे, आपल्या पूर्वजांनी उत्तम शेती असे म्हणून ठेवले असून, त्या क्षेत्रामध्ये खूप फायदा व लाभ असतो.

– म्हणूनच आपले शेतकरी आत्महत्या करतात का रे भाऊ?

– अरे नव्हे! शेतकरी आत्महत्या करतात कारण त्यांना शेती करता येत नाही. उलट शेतकऱ्यांना सरकारने किती तरी सुविधा व योजना व उपक्रम दिले आहेत व त्याचप्रमाणे त्यांच्याकरिता दुप्पट हमीभावसुद्धा दिला आहे. म्हणूनच तर ब्रह.. ब्रह.. ब्रहन मुंबईतील एवढी मुले शेतीचा अभ्यास करू इच्छित आहेत.

– आता मला बरोबर समजले भाऊ. शेती म्हणजे आनंदीआनंद व ढवळ्यापवळ्याची रंगीत जोडी व मेरे देश की धरती सोना उगले असे असल्यामुळेच दादाला शेती करावयाची आहे, होय ना रे भाऊ?

– अगदी बरोब्बर.

– बरे झाले तू मला हे सांगितले. आता मीसुद्धा शेतीमध्ये कलेन हो भाऊ!

First Published on May 17, 2018 2:05 am

Web Title: mumbai ssc student interested to build career in agriculture