मुंबई विद्यापीठाचे तरुण-तडफदार कुलगुरू डॉ. संजयजी देशमुख यांच्यासंबंधाने कुलपतींनी दिलेला निकाल विद्यापीठाच्या निकालपरंपरेप्रमाणेच चुकलेला आहे हे आम्हांस येथे सांगितलेच पाहिजे. एखाद्या नाठाळ विद्यार्थ्यांस – जा, पालकांची चिठ्ठी आणल्याशिवाय वर्गात बसू नकोस असे सांगत – वर्गाबाहेर काढावे, तद्वत कुलगुरूंची केलेली हकालपट्टी ही अयोग्यच आहे हे आमचे ठाम व ठोस मत आहे. उद्या साक्षात कुलपतींनीच काय, पण समस्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने किंवा गेलाबाजार अ. भा. विद्यार्थी परिषदेने जरी आम्हांस आमचे हे मत बदलण्यास सांगितले तरी आम्ही ते बदलणार नाही. त्यांच्याविषयी आमच्या मनात आदराचा राजाबाई टॉवर आजही उभा आहे. त्याची साधी वीटही तुमच्या त्या बालंटांनी निखळणार नाही. उलट, कुलपतींनी त्यांना गुमान राजीनामा द्या व आपली इज्जत वाचवा असे आमिष दाखविले असतानाही, मोडेन पण वाकणार नाही असा अस्सल देशमुखी बाणा दाखवत त्यांनी ज्या पद्धतीने शेवटपर्यंत राजीनामा पाठविलाच नाही, ते पाहून त्यांच्याविषयीच्या श्रद्धेने आमच्या काळजाचा अख्खा कलिना कॅम्पस गदगद् झाला आहे. काय चूक होती त्यांची? वेळेवर निकाल लागले नाहीत, अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, एवढेच ना? पण मग जरा इतिहास काढून पाहा या विद्यापीठाचा. अगदी पहिल्या वर्षी, सन १८६२ मध्ये या विद्यापीठाचा निकालच काय, पदवीदान समारंभही दोन महिने रखडला होता. या इतिहासाच्या सुधारणेचे काम सुरूच होते. कितीतरी ‘पीपीटय़ा’ तयार केल्या होत्या त्याबद्दल. आणि बैठका? सुमारच नाही. उगाच नाही संजयजींना बोलके सुधारक म्हणत. पण या सुधारणांना काही वेळ तर देणार की नाही? दीडशे वर्षांचा कचरा साठलेला आहे. तो फक्त अडीच वर्षांत उपसायचा? या स्वच्छता मोहिमेत झाल्या काही चुका, निर्णय घेतले सशाच्या घाईने आणि अंमलबजावणी केली कासवाच्या पायाने.. पण हे असे आजकाल कोण करीत नाही? मग एकटय़ा संजयजींवरच कारवाई का? म्हणे निकाल रखडले त्यांच्या हट्टापायी. पण त्याकडे कोणी सकारात्मकतेने का पाहात नाही? या रखडपट्टीमुळे राष्ट्रातील बेरोजगारांच्या संख्येत पडणारी भर पुढे नाही का ढकलली गेली? राष्ट्रविकासाच्या अशा कितीतरी योजना होत्या त्यांच्या डोक्यात. पण काय उपयोग? काही नतद्रष्ट  विद्यार्थ्यांच्या निकालामुळे राष्ट्राने एक द्रष्टा कुलगुरू गमावला. आता विद्यापीठाला नव्या कुलगुरूचा शोध घ्यावा लागणार. पण कुठून आणायचे प्रत्येक वेळी इतके विद्वान सुधारक? ते का असे नागपूरच्या वाटेवर पडले आहेत असे वाटते का तुम्हांस कुलपतीजी? अं?