राज्यात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात. पण हीच कामे पोखरणाऱ्या प्रवृत्तीही जोमाने कामास लागल्या आहेत, हे खूप महिन्यांपूर्वीच लक्षात आणून देऊनही सरकार अजून त्याबाबत सावध झालेले नसल्याने आता त्यातून उद्भवणाऱ्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत, हेही नमूद करणे गरजेचे झाले आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, मार्च महिन्यात विधिमंडळात, मंत्रालयातील उंदरांच्या सुळसुळाटाची गोष्ट खूप गाजली होती. यापैकी काही उंदीर काळे आहेत, काही गोरे आहेत. काही गलेलठ्ठ आहेत, तर काही माजलेले आहेत. काही जुने आहेत, तर काही नुकतेच जन्मलेले आहेत, असे वर्णन जेव्हा विधिमंडळात भाजपचेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सुरू केले, तेव्हा या उंदीरलीलांची ओळख असलेल्या अनेकांच्या  डोळ्यांपुढे त्या उंदरांचे चेहरेही  तरळू लागले होते असे म्हणतात. एकटय़ा मंत्रालयात जर अशा उंदरांचा सुळसुळाट झाला असेल, तर राज्यभरातल्या इतर सरकारी कार्यालयांत मिळून किती उंदीर असतील असा सवाल त्या वेळी खडसे यांनी केला होता. तेव्हा केवळ खसखस पिकली, आणि खरोखरीच मंत्रालयात तीन लाख ३७ हजार उंदीर मारले गेले का, यावर खल सुरू होऊन तो मुद्दा तांत्रिकदृष्टय़ा संपुष्टात आला होता. आसपासच्या बिळांतून ही चर्चा लपूनछपून ऐकताना त्या उंदरांना मोठय़ा गुदगुल्या होत असणार याबाबत शंका घेण्यास आता – सहा महिन्यांनंतर – वाव राहिलेला नाही. मंत्रालयातील उंदरांप्रमाणेच बाहेरही अशाच उंदरांचा सुळसुळाट झालेला असणार ही खडसे यांची शंका खरी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाबाहेरही उंदीर माजले आहेत आणि त्यांनी आता विकासकामेही पोखरण्यास सुरुवात केली आहे, हे परवाच्याच एका घटनेवरून सिद्ध झाले. याच माजलेल्या उंदरांनी पुण्याच्या खडकवासला धरणाचा मुठा नदीचा कालवाच पोखरला असावा अशी शंका पाटबंधारे खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोरच बोलून दाखविली आणि मंत्री असलेल्या गिरीश महाजनांचा त्यावर विश्वासही बसला. सरकारी कार्यालयांतच नव्हे, तर सरकारी कामांतही आपल्या पोखरण्याच्या ताकदीची चुणूक दाखविणारे हे उंदीर एक अख्खा कालवा पोखरू शकतील एवढे माजले आहेत, आणि आता तर त्यांना घुशी आणि खेकडय़ांचीही साथ मिळू लागली आहे, हे महाजनांच्या खुलाशावरूनच दिसते. खडसे यांनी तर केवळ उंदरांच्या जमातीचा मुद्दा मांडला होता. आता तर, राज्यात या उंदरांच्या साथीला घुशी आणि खेकडेदेखील दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्या कमरेला नेहमी पिस्तूल खोचलेले असते. मागे एकदा ते पिस्तूल घेऊन बिबटय़ा शोधण्यासाठी रानोमाळ भटकले होते. तेव्हा त्यांना तो बिबटय़ा काही सापडलाच नव्हता. आता उंदीर-घुशी आणि खेकडय़ांचा तरी त्यांनी शोध घ्यायलाच हवा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याची मदत घेण्याची वेळ आली तर तीदेखील घ्यावी. गृहखात्यातील काही तज्ज्ञ मंडळी, केवळ वर्णनावरून गुन्हेगारांची रेखाचित्रे तयार करतात असे म्हणतात, खडसे यांनी तर सभागृहातच सरकारी कार्यालयांतील उंदरांचे वर्णन केले होते. त्यावरून त्यांची रेखाचित्रे तयार करण्यास काहीच हरकत नाही. त्यावरून या उंदरांचा नायनाट करण्यासाठी महाजनांनी कमरेचे पिस्तूल वापरावे. नाही तर, इकडे विकास सुरू राहील आणि तो पोखरण्याची कामेही जोमात सुरू राहतील..