भारतीय साहित्यिक परंपरेनुसार दसरा म्हणजे विजयादशमीस श्रीरामप्रहरी चि. मोरू यांचे पिताश्रींनी त्यांस लत्ताप्रहार करून त्यांची प्रगाढ निद्रादेवी आराधना भंग करावयाची असते. मोरू यांची निद्रा म्हणजे नरकचतुर्दशीस फोडावयाचा नरकासुर असे मानून त्यांचे पिताश्री ते पुण्यकर्म करीतही असत. किंतु वर्तमानकाली लोकांत तितुकीसी सांस्कृतिक भावना न राहिल्याकारणाने ही उत्कृष्ट परंपरा खंडित झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्या कारणे सांप्रती चि. मोरू प्रात:कालीन महाविद्यालयांस बंक मारणेचे करून धाधा वाजेपर्यंत आपली हाथरूणे उबविताना दिसतात. परंतु कळविणेस अत्यानंद होत आहे की चालू दसरा त्यास अपवाद ठरला व मुमुर्षु साहित्यिक परंपरा जिवानिशी वाचली. त्याचे असे झाले, की- दसरा उजाडला. मोरू अजुनी पसरलेलाच होता. ते पाहून मोरूच्या पिताश्रींच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राइक करून मोरूचे पांघरूण खेचले व म्हणाले, ‘‘मोऱ्या! ऊठ, झोपतोस काय? अरे, आज दसरा! ऊठ.. अंघोळ धुऊन घे.. नवे कपडे घाल.. अरे आजचा दिवस कित्ती खास आहे. आज काही तरी खास घडणार आहे.’’ त्यावर मोरू पुसता झाला, ‘‘भगवानगडावर ना? माह्य़ताय. आम्हांला पण येतात क्लिपा.’’ मोरूचे पिताश्री म्हणाले, ‘‘मूर्खा. त्या कसल्या क्लिपा पाहतोस. आज एक खास क्लिप येणार आहे. कां की आजचा दसरा खास आहे.’’ ‘‘मघापासून हे खास खास काय लावलंय? कसली क्लिप येणारे आज?’’ मोरूने पृच्छा केली, तेव्हा त्याच्या आवाजात आपल्याविषयीचा किंचित संशय दाटला असल्याची दाट शंका त्यांना आली. परंतु हल्ली काय लोक लष्करी कारवायांबद्दलही शंका घेतात, अशी मन्कीबात करीत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व ते म्हणाले, ‘‘क्लिपचं काही नक्की माहीत नाही. परंतु बहुतेक शल्यक हल्ल्याची असेल. मोदीजी म्हणालेत ना, यंदाचा दसरा खास आहे. म्हणजे हेच असणार बघ!’’ ते सांगतानाही मोरूच्या पिताश्रींची छाती अश्शी भरून आली होती. ‘‘पण ते व्हाटस्यापवर त्याची क्लिप टाकतील असं कशावरून?’’ मोरू म्हणजे जातिवंत ट्रोल. त्यास शंका आलीच. ‘‘मग ते काय नवाझ शरीफच्या हॅप्पी बड्डेची क्लिप टाकतील?’’ पिताश्री भडकले. तसा मोरू म्हणाला, ‘‘नाही म्हणजे दुसरंही काही खास असेल ना? म्हणजे संघ फूल पँटीत येतोय, कदाचित त्याबद्दलही ते म्हणाले असतील.’’ मोरूचे पिताश्री जरा विचारात पडले. म्हणाले, ‘‘हां.. तेही आहेच. काय सांगावं, आजपासून ते सीमोल्लंघनही करतील.’’ ‘‘म्हणजे त्यांचे विदेश दौरे पुन्हा सुरू होणार?’’ ‘‘नाही तसंच काही नाही. पण काय सांगावं, कदाचित उद्यापासून अच्छे दिनही सुरू होतील. काही तरी खास घडणार म्हणालेत, म्हटल्यावर असंच काही असेल ना?’’ त्या नुसत्या विचारानेही मोरूच्या पिताश्रींना मोहरल्यासारखे झाले. त्यांना वाटले, खासच असेच घडणार. अच्छे दिन येणार. मग त्यांना वाटले, येणार काय? ते तर कधीच आलेत. आता ती क्लिप आली की त्यावर शिक्कामोर्तब होणार, इतकेच.