घरचा अहेर हे एक अप्रूप असते. त्यामध्ये आपुलकी असते, जिव्हाळा असतो. म्हणूनच चारचौघांच्या अहेर सोहळ्याआधी घरच्या अहेराचा एक सोहळा उरकून घेण्याची परंपरा असते. या परंपरेचा विस्तार झाला आणि राजकारणातही घरच्या अहेराची प्रथा सुरू झाली. राजकारणातल्या घरच्या अहेराचे वेष्टनच आकर्षक असते. चकचकीत कागदाचे ते वेष्टन उघडले, की आत मात्र रिकामा खोकाच हाती लागतो. हे बऱ्याचदा असेच घडत असते. सर्वच पक्षांत अनेकांनी आपापल्या पोतडीत घरच्या अहेराची पुडकी चकचकीत कागदात बांधून तयारच ठेवलेलीही असतात. वेळ येताच तो अहेर पक्षार्पण करावयाचा आणि पुडके सोडण्याआधीच त्यातील हवाही स्वत:च काढून घ्यायची हा खेळ आता जुनादेखील झाला. भाजपच्या नाना पटोलेंनी आठवडाभरापूर्वी असेच एक घरच्या अहेराचे ‘सुवेष्टित’ पुडके पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्रभाई मोदी यांचे नाव घालून पक्षार्पण केले आणि ते सोडण्याआधीच, पुडक्यात काहीच नसल्याचेही स्वत:च जाहीर करून टाकले. पण त्या रिकाम्या पुडक्यातही काही तरी लपलेले आहे, याची जाणीव पक्षाला त्यांनी करून दिली. रिकाम्या पुडक्यांचा घरचा अहेरही कधीकधी पक्षाला मौल्यवान ठरतो, तो असा! नानांच्या या रित्या पुडक्यातल्या घरच्या अहेराने भाजपची गोची झाल्याचा आनंद होणे, हे सत्तेतील भागीदार या नात्याने शिवसेनेसाठी साहजिकच होते. पटोलेंच्या घरच्या अहेराने आनंदित होऊन अहेराच्या रित्या पुडक्यावर काही भाष्य करण्याआधीच पटोलेंनी कोलांटउडी घेतल्याने, भागीदाराच्या जखमेवर मीठ चोळण्याची ‘शिवसंधी’ हुकल्याचे दु:ख होत असतानाच, शिवसेनेचे चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्याकडचे अहेराचे सुवेष्टित पुडके नेत्यांना बहाल केले. हे पुडके रिकामे होते की त्यात खरोखरीच घरचा वजनदार अहेर होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच काते स्वत:च त्यातील हवा काढून घेणार, की सेना नेत्यांना त्या पुडक्यातील हवा काढून घेऊन ते रिकामे आहे, हे दाखवण्याचे काम करावे लागणार हे एक-दोन दिवसांत ठरणार आहे. पण आमदार काते यांनी सेना नेत्यांना दिलेल्या या घरच्या अहेराचा अत्यानंद सत्तासोबती असलेल्या भाजपला मात्र नक्कीच झाला असेल. एखाद्याने स्वपक्षाला म्हणून दिलेल्या घरच्या अहेराच्या पुडक्यात, दुसऱ्याच कुणासाठी तरी एखादी मौल्यवान भेट असावी, असाच काते यांच्या या घरच्या अहेराचा प्रकार ठरला. सेनेचे मंत्री कामे करत नाहीत एवढय़ा तक्रारीचा घरचा अहेर असता, तरी सेना नेत्यांनी ते अहेराचे पुडके जसेच्या तसे स्वीकारून शिरावर घेतले असते. कारण त्यातली हवा काढून टाकणे तसे फारसे अवघड नव्हतेच.. पण याच पुडक्यात आमदार कातेंनी मुख्यमंत्र्यांसाठी चार कौतुकाची फुले ठेवल्याने, सेनेच्या हाती आलेल्या घरच्या अहेराच्या रिकाम्या पुडक्यातील भाजपस्तुतीची फुलेदेखील सेनेला डोईजड झाली असतील. ही अवस्था वाईटच.. अगदी, सहन होत नाही अन् सांगताही येत नाही अशीच!