त्यांचे महाराष्ट्रात असणे किती महत्त्वाचे आणि अगत्याचे आहे, हे तुम्हाला अजूनही कळलेलेच नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये त्यांचे हितचिंतक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातच असले पाहिजे, महाराष्ट्रातच त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष फोफावेल आणि त्यांचे नेतृत्व बहरेल अशी आम्हा हितचिंतकांची अपेक्षा आणि खात्रीदेखील आहे. दिल्लीच्या राजकारणाचा इतिहास तुम्हास ठाऊक नाही काय? याच दिल्लीने आजवर अनेक राजकीय नेत्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून महाराष्ट्रापासून हिसकावून घेतल्याने महाराष्ट्राची जी काही राजकीय हानी झाली आहे, त्याची तुम्हांस कल्पना नाही काय? तुम्ही आता तरी बोध घ्यायला हवा. महाराष्ट्रात यशस्वी झालेले बिनीचे मोहरे तिकडे दिल्लीत गेले की कोमेजतात, त्यांच्या कर्तृत्वाची झळाळी कमी होते असा आजवरचा अनुभव असताना, हाताशी असलेले तेजस्वी तडफदार नेते दिल्लीत नेऊन त्यांचे लोणचे घालण्याचा तुमचा विचार असेल, तर (शाहू- फुले- आंबेडकरांचा) हा महाराष्ट्र ते कदापिही सहन करणार नाही. ह्य महाराष्ट्राला पराक्रमाची परंपरा आहे.  इथले पराक्रमी वीर केवळ दिल्लीश्वरापुढे कुर्निसात करण्यापुरते उरावेत अशी तुमची वा तुम्हास पाठिंबा देणाऱ्या अन्य कोणाची इच्छा असेल, तर हा कणखर, राकट देश ते कारस्थान कदापिही यशस्वी होऊ  देणार नाही. भले, आमचे वीर महाराष्ट्रात रिकामे राहून निकामी झाले तरी बेहत्तर.. त्यांच्या तलवारीची- पक्षी जिभेची- धार काळाबरोबर कमी होत गेली, त्यांच्या अंगावरील सत्तेची झूल उतरवली गेली, तरी चालेल, पण हे षड्यंत्र हाणून पाडलेच पाहिजे. आमच्या नेत्याने महाराष्ट्रातच राहिले पाहिजे, अशी आम्हा हितचिंतकांची इच्छा आहे. त्यांचे महत्त्व कमी करण्याचा हा एक व्यापक डाव असून, त्याला यापुढे आम्ही बळी पडणार नाही. गेल्या दहा वर्षांत मानहानीचे असे असंख्य प्रसंग आम्ही झेलले, प्रसंगी मान झुकविली, श्रेष्ठींसमोर कंबरही वाकविली, पण तो तर केवळ गनिमी कावा होता. शत्रूला बेसावध ठेवून योग्य वेळ येताच संधी साधण्यासाठी प्रसंगी कोशात राहणे आम्ही पसंत केले होते. पण ती वेळ कधी आलीच नाही. आली असती, तर आम्ही संधीचे सोने कसे करतो, ते उभ्या राज्याने पुन्हा एकवार अनुभवले असते. अर्थात, तसे झाले नाही याचे आम्हाला वाईट वाटत नाही, कारण राजकारणात प्रसंगी झुकावे लागले तरी स्वाभिमानास तिलांजली देणे आम्हांस कदापिही शक्य होणार नाही.  आम्ही कालही स्वाभिमानी होतो, आजही स्वाभिमानी आहोत, आणि उद्याही स्वाभिमानीच असू हेदेखील पक्के लक्षात ठेवा. आमचे महत्त्व तुम्ही जाणता, आमची गरज तुम्हास माहीत आहे, हेही आम्हास माहीत आहे. तसे नसते, तर काही महिन्यांपूर्वी, मैं तो गाने सुनने जा रहा हूं.. असा विनोद करणारे शहाजहान आज आमच्या या तेजस्वी नेत्याच्या भेटीसाठी वेळ काढते झालेच नसते. आमच्या स्वाभिमानाची आता आणखी परीक्षा पाहू नका. त्यांना दिल्लीत नेऊ  नका, ही आमची तुम्हाला अखेरची विनवणी आहे. ते इथेच असले पाहिजेत, अशी आमची तुम्हाला प्रार्थना आहे. त्यासाठी आम्ही आमची बोटे एकमेकांत गुरफटवून ठेवली आहेत. आमचे एवढे ऐकाच.. नाही तर आमचा स्वाभिमान उफाळून येईल, आणि मग काय होईल, ते तुम्ही जाणताच.. जय हिंद, जय महाराष्ट्र!