तुम्ही वाचलीत ती बातमी?.. ‘बेडूकराव गेले कुठे?’ म्हणे हल्ली पावसाळा असूनही मराठवाडय़ात बेडूक दिसत नाहीत पूर्वीसारखे. आता ही काय बातमी झाली? काय अर्थ आहे त्यात? प्रत्येक पावसाळ्यात बेडूकरावांनी उडय़ा मारल्याच पाहिजेत का? बरे समजा मारल्या, तर तुम्ही तिकडूनही त्यांच्यावर टीका करायला मोकळे. खरे तर तसाही हल्ली उडय़ा मारणाऱ्या बेडूकरावांचा आवाज निघत नाही. काही जण करतात त्यातल्या त्यात डराव डराव. घेतात आपली किंमत वाढवून. पण त्यांनी असे डराव डराव केले की तुमच्या शांतता क्षेत्राचा भंग होणार. मग तुम्हाला तुमची लोकशाही आठवणार. हक्क आठवणार. आणि तुम्ही त्यांना झोडून काढणार. अर्थात ते सारेच प्रतीकात्मक असते. एरवीही तुमच्याजवळ असतेच काय? शब्दांचीच शस्त्रे आणि शब्दांचीच अस्त्रे. आमच्या बेडूकरावांची कातडी हल्ली एवढी निबर झालीय की ती शस्त्रे त्यापुढे बोथट ठरतात. पण हे पत्रकारही असे, की या पावसाळ्यात मराठवाडय़ातील बेडूकरावांनी जरा बाहेर हिंडणे-फिरणे टाळले, तर त्यांना करमेनासे झाले. लगेच बातम्या छापू लागले, की बेडूकराव गेले कुठे? या पत्रकारांचे चर्मचक्षू एकदा नीटच तपासून घ्यायला हवेत. किती अंध झालेत ते. त्यांना हेही दिसत नाही, की मराठवाडय़ातले बेडूकराव नसतील हल्ली डराव डराव करीत, पण आमच्या कोकणात तर आहेत ना. या आणि एकदा नीट डोळे उघडून बघा नीट म्हणावे. गेल्या कित्येक दिवसांपासून नुसता डराव ध्वनी माजला आहे अपरांताच्या अस्मानात. जिकडे ऐकावे तिकडे डराव डराव. कोकणातील कोणतेही वृत्तपत्र उघडून पाहा. डराव डराव. आज काय – बेडूकराव उडय़ा मारण्याच्या तयारीत. उद्या काय – बेडूकरावांच्या उडय़ा मारण्याचा मुहूर्त नक्की. परवा काय – या तळ्यात जाणार बेडूकराव. तेरवा काय – बेडूकरावांनी केले दिल्लीत डराव डराव. बातम्यांवर बातम्या. जिकडे पाहावे तिकडे बातम्यांच्याच बेडकुळ्या. आता हे काहीही लक्षात न घेता नुसत्याच बेडूकराव गायब झाल्याच्या हाकाटय़ा पिटायच्या याला काय पत्रकारिता म्हणतात? आता यालाही अपवाद आहेत म्हणा. आम्ही सर्वच माध्यमांवर घसणार नाही. आजही काही वृत्तपत्रांनी व त्यांच्या संपादकांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता जपली आहे. हल्लीच्या काळात पत्रकारिता जपण्यासाठी काय करावे लागते? तर पहिल्यांदा टिकावा हे पाहावे लागते. त्यासाठी जाहिराती मिळवाव्या लागतात. तर त्या बळावर कशीबशी आपली पत्रकारिता टिकविणाऱ्या या दैनिकात मध्यंतरी आम्ही छान बातमी वाचली होती. ती होती बेडूकरावांचा फुगून बैल झाल्याची. याला म्हणतात खरी पत्रकारिता. बाकी सारे आमच्या दृष्टीने डराव डरावच.