राजकारणात स्वाभिमान हा शब्द लवचीक असला पाहिजे, हे ज्यांना कळते, त्यांना योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यातील प्रदीर्घ काळाची कळदेखील सहज सोसता येतो. केवळ कचकडय़ाच्या स्वाभिमानापोटी स्वत:चेच हसे करून घ्यायची वेळ येते हा शहाणपणादेखील हाच काळ शिकवत असतो. काळ हा राजकारणातील एक महागुरू असतो. तो भल्याभल्यांना वठणीवर आणतो, आणि अनेकांना आपल्या वजनाचेही भान देतो. कधीकाळी वजनदार असलेला एखादा नेता, जिवाभावाचा बनून ज्यांच्या हृदयात स्थान मिळवतो, तोच नेता कालांतराने अचानक गुन्हेगारासारखा लपूनछपून वावरू लागतो. हा काळाचाच महिमा. अशा, कसोटी पाहणाऱ्या काळास टक्कर द्यायची असेल तर संयमासारखा दुसरा उपाय नाही आणि संयम पाळावयाचा असेल तर प्रतीक्षा करणे ओघानेच येते. प्रतीक्षा ही एक परीक्षा असते. त्या परीक्षेस पात्र ठरताना, स्वाभिमानाची सारी वस्त्रे उतरवून ठेवावी लागतात, हे आता काहींच्या लक्षात येऊ  लागले आहे. पण एखाद्यास हे समजले, तरी त्याच गोष्टीचे शहाणपण दुसऱ्या कोणास येतेच असे नसल्याने, प्रतीक्षेचा काळ संपेपर्यंत संयम सांभाळणे अवघडच होते आणि अखेर तोल जातोच. मग काळाच्या कसोटीवर उतरण्याची सारी तयारीच वाया जाते. नारायण राणे यांच्या कसोटीचा काळ सुरू असतानाच, ‘आपल्या संयमाचा अंत पाहू नका’, असा स्वाभिमानी इशारा त्यांनी एका क्षणी थेट मुख्यमंत्र्यांनाच देऊन टाकला, आणि संयमाचीच परीक्षा घेणारा काळ मनात हसला. स्वाभिमान हा संयमाचा शत्रू असतो, हा धडा त्या क्षणी इतरांनी घेतला असला तरी साऱ्यांनाच स्वाभिमान गुंडाळून संयम पाळणे शक्यच नसते. राणे यांच्या कसोटीच्या क्षणी संयमाने कच खाल्ल्यावर नाथाभाऊ  खडसेंनी आपल्या संयमाचा तोल सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही अखेर काळाने त्यावरही मात केलीच. भाजपमध्ये राणे यांच्याबरोबरच सध्या एकनाथभाऊ  खडसे यांच्याही संयमाची सध्या कसोटी सुरू आहे. या कसोटीचे दिव्य खरोखरीच पार करावयाचे असेल, तर प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागणार हे स्पष्ट असते. ‘खुनी आणि वेडी माणसं सोडली, तर भाजपमध्ये सर्वाना प्रवेश मिळतो’ असे अलीकडेच हरिभाऊ  बागडे यांनी जाहीर केल्यापासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची गर्दी वाढू लागली. राणे हे त्या रांगेतील पहिल्या क्रमांकाचे उमेदवार, तर पक्षात असूनही त्या रांगेत जाऊन बसलेले नाथाभाऊ  खडसे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार!

भाजपच्या प्रतीक्षालयात सध्या राणे आणि खडसे असे दोघेच परीक्षेची तयारी करत आहेत आणि प्रतीक्षालयाचे दरवाजे बाहेरून बंद करण्यात आले आहेत. परीक्षेची पुरेशी पूर्वतयारी देऊन दोघेही तयार आहेत, पण दरवाजे उघडण्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. कदाचित, संयमाची ही अंतिम परीक्षा असावी. नारायणरावांना ही परीक्षा देण्यावाचून पर्यायच नसल्याने, प्रतीक्षालयाचे दरवाजे उघडेपर्यंत वाट पाहावीच लागणार आहे. तोवर वाट पाहून कदाचित नाथाभाऊ  कंटाळून जातील. परीक्षेवर लाथही मारतील. तरीही,प्रतीक्षालय एकदा बंद झालेले असल्याने, दरवाजा उघडल्याखेरीज बाहेरचा रस्ताही दिसणार नाही. ही तर संयमाच्या कसोटीची परिसीमाच ठरेल.