19 October 2019

News Flash

‘नामां’चा गजर..

भाजपच्या संकल्प पत्रात दादांनी मालवणच्या समस्यांना न्याय द्यावा, अशीही मालवणी माणसाची अपेक्षा आहे

नारायण राणे

रामेश्वर, रवळनाथ, गावडोबा, वेतोबा, खवणोबा आणि सातेरी, सोनुर्ली, भराडीदेवीच्या आशीर्वादाने अखेर सारे सुरळीत झाले. दादांनी काँग्रेसला रामराम करून स्वाभिमान पक्ष काढला तेव्हा शिंदुर्गातील समर्थकांनी काळजीपोटी आपापल्या गावातल्या देवाला गाऱ्हानां घालून ‘दादांच्या राजकारणाला यश दे रे म्हाराजा’ म्हणून साकडे घातले होते. दादांनी शिवसेना सोडली, काँग्रेस सोडली, स्वाभिमान पक्ष काढला, भाजपच्या तिकिटावर खासदार झाले तोवर ठीक. गेल्या महिन्यात अचानक, दादांच्या ‘ओम गणेश’ला पवारांचे पाय लागले. सदिच्छा भेट झाली, नंतर बंगल्याच्या बंद खोलीत चर्चा झाली आणि दादाभक्त काळजीत पडले. दादा नवं राजकारण काय करणार यावर गजाली सुरू झाल्या. ‘राजकारनाला आता रामेश्वराचाच आधार’ असेही कुणी तरी कुजबुजले. पण रामेश्वर पावला. स्वाभिमानाला भाजपची कायमची सावली मिळाली. स्वाभिमानासकट भाजपसोबत गेलेले दादा आता भाजपच्या संकल्प समितीवर सोळावे सदस्य झाले आहेत. ‘विश्वेश्वराचा खेळ अगाध आहे’ असे म्हणत शिंदुर्गातील दादाभक्तांनी आता जुने नवस फेडण्याची तयारी सुरू केली असेल. निवडणुकीआधीचा जाहीरनामा हा ‘नंतरचा चुनावी जुमला’ असला, तरी निवडणुका होईपर्यंत संकल्पपत्र म्हणजे पक्षाची नव्या निवडणुकीची जणू पंचवार्षिक घटना, आणि दादा थेट घटना समितीवरच! एवढे पक्ष फिरूनही असा बहुमान दादांना आधी कुणीच दिला नव्हता. वचननामा, वचकनामा, जाहीरनामा, अशा अनेक ‘नामांचा गजर’ दादांनी पाहिला, पण संकल्पपत्राच्या समितीवर दादा म्हणजे शिंदुर्गाला थेट दिल्लीत मानाचे पान!.. दादा संकल्प समितीवर गेल्याची वार्ता शिंदुर्गात वाऱ्यासारखी पसरल्यावर ‘आता भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे शिंदुर्गातील दादाभक्त ‘देवावरचे फूल’ उचलून सांगू शकतील. ‘शिवसेनेशी हातमिळवणी केली तर भाजपशी संगत नाही’ अशी गर्जना दादांनी केली, आणि याच भक्तांनी नारळावर हात ठेवून दादानिष्ठा व्यक्त केली. हे पाहूनच त्या रामेश्वराच्या हृदयाला पाझर फुटला असणार. शिंदुर्गात आता दादा जातील, तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी रांगा लागतील.. ‘कनकवलीच्या सभेचे गाडय़े करंबट तरंदळ्यापर्यंत लागतंत तां काय उगाचच काय?’ असे सांगत दादांच्या लोकप्रियतेचे गोडवे शिंदुर्गात गायिले जातील. नाराजीनाम्यातून सुरू झालेले राजकारण आता जाहीरनाम्यापर्यंत येऊन अखेर स्थिरावले म्हणून मालवणी माणूस समाधान व्यक्त करेल. राष्ट्रवादीच्या तंबूत दादांनी पाय ठेवला नाही ते बरंच झालं, असंही त्याला वाटत असेल. भाजपच्या संकल्प पत्रात दादांनी मालवणच्या समस्यांना न्याय द्यावा, अशीही मालवणी माणसाची अपेक्षा आहे. ‘मालवण बंदराक मुंबैक जाऊक बारमाही बोटी चालवूचा जाहीरनाम्यात घालाक विसरा नको’ म्हणून कुणी आग्रह करेल.. ‘यंदा आंगणेवाडी २५ तारखेक आसा. फुडच्या गणपतीक तुमका जमाचा नाय तरी फुडच्या आंगणेवाडीक तरी महामार्गाच्या रुंदीकरणाचा काम पुरा करतलंव म्हणा..’ अशी मनीषा कुणी दादासमर्थक व्यक्त करेल, तर तिठय़ावरच्या पारावरल्या गजालीत कुणी तरी तोंड वाकडां करेल.. ‘बरां झाला हेंका जाहीरनामा समितीर घेतलां तां.. हेंका सगळाच जाहीर करूक जमता. आता धूमशान घालुक मोकळे..’ म्हणत, दादांना सावधगिरीचा इशाराही देईल, आणि पुन्हा एकदा गावच्या देवळात गाऱ्हाण्याचा सूर घुमेल, ‘बा देवा रवळनाथा, आता बारा पाचाचा याक कर. भराडी, केळबाई, सातेरी, वेतोबा, माऊली, सगळ्याचो एक  विचार कर, सगळे पक्ष मतभेद बाजूक कर आणि सगळ्या मालवण्यांका एक कर.. भला कर रे म्हाराजा!’

First Published on January 8, 2019 1:51 am

Web Title: narayan rane get place in bjp manifesto panel