16 February 2019

News Flash

संघ-संत संगमयोग..

आपण कोण आहोत?.. कोणासाठी जगतो आहोत?..

प्रातिनिधिक छायाचित्र

आपण कोण आहोत?.. कोणासाठी जगतो आहोत?.. असे अनेक प्रश्न ज्यांना सातत्याने छळत असतात आणि त्याची उत्तरे शोधण्यातच उभा जन्म संपून जातो, अशा संभ्रमावस्थेला संस्कृतीचा आशीर्वाद असतो, असे म्हणतात. आपण कोण आहोत हा प्रश्न जन्माच्या वेळीच तोंडून फुटणाऱ्या पहिल्या रडण्याच्या आवाजातून उमटतो आणि या ‘कोऽहम’च्या संभ्रमाचे ओझे मनावर घेऊनच पुढे जो जगत जातो, तो खरा संस्कृतीरक्षक होतो, असेही म्हणतात. खरे म्हणजे, ‘कोऽहम’ या प्रश्नावर, ‘अहम् ब्रह्मास्मि’ असे उत्तर असतानाही, या प्रश्नाचा पाठपुरावा करणे हे जगण्याचे ध्येय असले पाहिजे, असे सांगणारे समाजधुरीण म्हणजे, या देशाची संतपरंपरा! ..संभ्रमावस्थेतून बाहेर काढून जगाला दिशा देण्याचे काम संत करतात, आणि आम्हीही हेच काम करतो असे या देशातील विद्यमान राजसत्तेची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटनादेखील सांगते. संघाच्या बौद्धिकांमध्ये असाच विचार मांडून स्वयंसेवकांची विजिगीषा जागी करण्याचे काम सुरू असते. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ते खरेच – ‘संघ आणि संत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,’ असे ते परवा गुरुपौर्णिमेनिमित्त नाणीजला नरेंद्र महाराजांच्या आलिशान मठात झालेल्या एका शानदार सोहळ्यात म्हणाले. थोडक्यात, नाणीज मठाचे नरेंद्र महाराज जे काम करतात, तेच काम गेल्या नऊ  दशकांपासून संघ करीत आला आहे, असे भागवत यांना म्हणावयाचे असावे. त्यामुळे नरेंद्र महाराजांसारख्या वर्तमानातील संत विभूती आणि विद्यमान राजसत्तेची मातृसंस्था असलेला संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने, ‘आपल्या जगण्याचे प्रयोजन काय’ याचेच उत्तर सरसंघचालकांच्या त्या गुरुपौर्णिमा संदेशातून अप्रत्यक्षपणे मिळालेले आहे, असे मानावयास संघ स्वयंसेवकांना हरकतच नाही. नरेंद्र महाराज हे महाराष्ट्रातील एक धर्मसत्तापीठ आहे, हे मुख्यमंत्र्यांनी मागेच जाहीर करून टाकलेले आहे. या महाराजांच्या पन्नासाव्या वाढदिवशी, दोन वर्षांपूर्वीच्या ऑक्टोबरात नाणीज मठात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हा निर्वाळा तर दिलाच, पण ‘राजसत्ता जेव्हा आपल्या मार्गावरून भ्रष्ट होते तेव्हा तिला पुन्हा योग्य मार्गावर प्रस्थापित करण्याचे काम धर्मसत्ता करते,’ म्हणजे राजसत्तेवर अंकुश धर्मसत्तेचा हवा, असेही फडणवीस यांनी तेव्हाच जाहीर केले होते. नाण्याच्या या ‘तिसऱ्याच’ बाजूवरून, संघ आणि संत या नाण्याच्या दोन बाजूंची भूमिका सरळ आणि स्वच्छपणे स्पष्ट होऊन असंख्यांच्या मनात वर्षांनुवर्षे माजलेला संभ्रम संपुष्टात येण्यास आता मदतच झाली आहे. संघ आणि संत या ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ केवळ धर्मसंस्थापनाचे काम करीत असतात, असेही भागवत यांनी परवा नाणीजच्या गुरुपौर्णिमा उत्सवात स्पष्ट केले. संघाच्या शाखाशाखांवर भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून त्याला गुरुदक्षिणा अर्पण करणाऱ्या लाखो स्वयंसेवकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तरच भागवत यांच्या नाणीजच्या मठातील वक्तव्यातून मिळाल्याने आता जगण्याच्या प्रयोजनाचा सांस्कृतिक संभ्रम संपला आहे. देशात जागोजागी जेव्हा संघशाखांमध्ये गुरुपौर्णिमेचे पारंपरिक सोहळे पार पडत होते, तेव्हा नाणीजला संघकार्याचा सत्कार म्हणून भागवत यांना सन्मानपत्र बहाल करण्याचा सोहळा संपन्न होत होता, हा संघकार्याच्या इतिहासातील एक अनोखा ‘संत-संघ संगमयोग’ मानावा लागेल. संघकार्यासाठी भागवत यांना नरेंद्र महाराजांच्या संस्थानने दिलेला निधी भागवत यांनी विनम्रपणे परत केला, आणि संघकार्याला संतांचे आशीर्वाद मिळणे हीच मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे, असेही सांगून त्यांनी नरेंद्र महाराजांचे, अर्थात, सध्याच्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वच अधोरेखित केले. राजसत्तेवर निरंकुश अंकुश ठेवण्याची अनुमतीच गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर राजसत्तेच्या मातृसंस्थेकडूनच सध्याच्या धर्मसत्तेस मिळावी हा योगायोग विलक्षणच!

First Published on July 31, 2018 2:09 am

Web Title: narendra maharaj rss