हसा. खुशाल हसा. तिरस्काराने ओठ दुमडून हसा. दुसऱ्याला टाळी देऊन छद्मीपणाने हसा. स्वत:ला शहाणे ठरवून तुच्छतेने हसा. आजवर या जगातील सर्व संत सज्जनांना, अवतारी पुरुषांना असेच हसणे सहन करावे लागले आहे. हसणेच नव्हे, तर जगाच्या सर्व अन्यायांचे क्रूस त्यांना आपल्या खांद्यावर वाहावे लागले आहेत. इतिहास साक्षी आहे त्याला. संत आसाराम, संत रामपाल, स्वामी नित्यानंद.. किती किती उदाहरणे द्यायची? त्या महात्म्यांच्या अवतारी लीला समजल्याच नाहीत जगाला. मर्त्य मानवांच्या कायद्यांनी छळले त्यांना. आता अशीच पाळी आली आहे एका पुण्यात्म्यावर, एका अवतारी पुरुषावर. होय, हे पाप्यांनो, नास्तिकांनो, शंकासुरांनो.. हिंदुत्वाच्या थोर पुण्यप्रयोगशाळेमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा दहावा अवतार जन्माला आला आहे. नाही, नाही.. सकल हिंदुबंधूंनो, भक्तगण आणि गणंगांनो, तुम्ही समजता तो हा अवतार नाही. होय होय, पंतप्रधान न. दा. मोदी हे परमेश्वराचे अवतार आहेत, असे आपल्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स’चे प्रमुख पद्मभूषण लोकेश चंद्र म्हणतात ते का आम्हांस माहीत नाही? आमचे अतिकार्यकुशल गृहमंत्री राजनाथ सिंह हे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मोदीजींची तुलना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राशी केली होती, हेही आम्हांस ठाऊक आहे. ते ब्रह्मज्ञान आमच्या गाठी नसते, तर आम्ही मोदीजींच्या पदकमलांशी अर्पण केले असते का आमचे मतपुष्प? परंतु लक्षात घ्या सुभक्तहो, आम्ही म्हणतो तो अवतार दुसराच आहे. ऐका ऐका, हृदयावर हात ठेवून ऐका.. लोकहो, तो साक्षात कल्की अवतार आहे. जेव्हा जेव्हा विश्वामध्ये धर्माला ग्लानी चढते, अधर्माचा बोलबाला वाढतो, पाप सत्तेवर येते तेव्हा तेव्हा सत्य धर्माच्या उत्थापनासाठी या धरतीवर एका नव्या अवताराचा जन्म होतो. कलियुगाच्या अंती, सत्ययुगाच्या अच्छे दिनांच्या आरंभी येणारा हा अवतार आहे कल्कीचा आणि आपण असे पापी, की ‘देवदत्त’नामक सफेद अश्वावर स्वार होऊन, हाती तलवार घेऊन जगातील पाप नष्ट करीत राजकोटातल्या रस्त्यांवरून फिरणाऱ्या त्या अवताराला आम्ही ओळखलेच नाही. का? तो केवळ ‘मिस्टर इंडिया’तल्या कॅलेंडरसारखा दिसतो म्हणून? त्याला चश्मा आहे, टक्कल आहे आणि त्याचे पोट सुटलेले आहे म्हणून? हे पाप्यांनो, मनाची कवाडे उघडा आणि पाहा.. सरदार सरोवर पुनर्वसन एजन्सीमधला तो वरिष्ठ अभियंता.. रमेशचंद्र फेफर हाच कल्की आहे. त्या महापुरुषालाही हे माहीत नव्हते. मार्च २०१० मध्ये त्यांना अचानक साक्षात्कार झाला. कोणाला हिमालयाच्या गुंफेत होतो, कोणाला झाडाखाली. फेफरांना तो कचेरीतील खुर्चीत झाला. तेव्हापासून त्यांनी कामावर जाण्याचे सोडून दिले. अवतारी पुरुष काम करीत नसतात या देशात. ते पाप स्वच्छता मोहिमेवर असतात. या कल्कींनी वैश्विक मनपरिवर्तनासाठी पाचव्या मितीत जाण्याची साधना सुरू केली आणि त्या साधनेद्वारे गेल्या १९ वर्षांपासून ते या देशात चांगला पाऊस पाडताहेत आणि त्यांना तुम्ही गैरहजर राहिलात इतकी वर्षे म्हणून मेमो काढता? तेही हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत? कुठे फेडाल रे ही पापे? अरे, अशा अवतारी पुरुषांचा तर आधार राहिला आहे आता या भारतभूला. ते वाढले पाहिजेत म्हणून आपण शाळाशाळांतून, मदरशांतून, कॉन्व्हेन्टांतून प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नांच्या फळाला तुम्ही मनोरुग्ण ठरवून हसता? हसा हसा, पण लक्षात ठेवा, सध्याच्या गतीने तोच आपला ‘कल’   (पक्षी : उद्या) असणार आहे. तीच आपली ‘कल्की बात’ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi
First published on: 21-05-2018 at 00:18 IST