या देशाचे आता काहीही होणार नाही. तो  कधीही सुधारणार नाही. विश्वगुरू बनणार नाही.. आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांचा हा सात्त्विक संताप पाहून त्यांना तातडीने पाकिस्तानचा व्हिसा काढून द्यावा असा एक राष्ट्रप्रेमी ट्रोलविचार आमच्या मनात तरळून गेला. परंतु मग वाटले, की लेलेंसारखे सातत्याने ‘त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्’ असे म्हणणारे तंतोतंत देशभक्त ज्याअर्थी असे म्हणतात, त्याअर्थी यात काही तरी अर्थ असणारच. विचारांती आमच्या लक्षात तो अर्थ आला तो असा, की भारतवर्षांस मिळालेली दैवी देणगी म्हणून आमचे प्रिय नेते व्यंकय्याजी नायडू यांनी ज्यांची आरती ओवाळली, त्या श्री. न. दा. मोदींसारखा महानेता असतानाही जो देश सुधारत नाही त्याचे काय होणार? आम्हांस तर वाटते, आपली ही सव्वाशे कोटी भारतीय जनता लायकच नाही मोदींसारख्या महानेत्यासाठी. किती कष्ट करतात ते देशासाठी? व्हाट्सअ‍ॅपच्या संदेशासंदेशांतून तुम्हाला सापडतील त्यांच्या कष्टांच्या गौरवगाथा. मनात सतत एकच विचार असतो त्यांच्या. निवडणुका जिंकण्याचा. खीखीखी करून हसू नका. त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात त्या काही स्वतसाठी नाही. अखेर ते एकटेच फकीर. एवढय़ा निवडणुका जिंकून किती मंत्रिपदे घेतील स्वतकडे? त्या निवडणुकांमागे कळकळ असते ती देशाच्या विकासाची. पण आमचे लोक असे नतद्रष्ट, की सब का साथ मागणाऱ्या या दैवी पुरुषास साथच देत नाहीत. त्यांनी स्वच्छता अभियान सुरू केले. पण आज पाहा कोणीही सेल्फी विथ झाडू काढीतच नाही. त्यांनी शौचालये बांधली. तर लोकांना म्हणे तेथे पाणीसुद्धा हवे आहे. नसते बहाणे, दुसरे काय? त्यांनी जनधन अकौंटे खोलून दिली. तर लोकांना त्यात पैसेही हवे आहेत. आणि नोटाबंदीची तर वाटच लावली आपल्या लोकांनी. किती ऐतिहासिक तो निर्णय. तो जाहीर झाला तेव्हा देवागंधर्वानी त्या दिवशी आकाशातून पुष्पवृष्टी केली होती. तीही खास जीपीएस ट्रॅकर वापरून. खरे वाटत नसेल, तर कोणत्याही च्यानेल पत्रकारूस विचारा. किती छान छान परिणाम दिसले त्याचे. काळा पैसा परत आला बँकेत. खरे वाटत नसेल, तर रिझव्‍‌र्ह बँकेत जाऊन पाहा त्या हजार-पाचशेच्या नोटा. किती तरी घाणेरडय़ा, काळ्याकुट्ट आहेत त्या. हाच तर काळा पैसा. तो जमा झाला. त्यामुळे काळाबाजार थांबला, महागाई कमी झाली, दहशतवाद संपला, नक्षलवादी तर झारखंडच्या जंगलात ढसाढसा रडत होते म्हणतात- कंबरच तुटली ना त्यांची. शिवाय सगळा देश प्लास्टिक मनी वापरू  लागला. डिजिटल झाला सगळा इंडिया. येथील भिकारीसुद्धा पेटीएम वापरू लागले. अमेरिकेने, युनोने, ईयूने आणि अर्थातच नासानेही तोंडात बोटे घातली हे पाहून. पण आपले लोक असे ना! फक्त विरोधासाठी विरोध म्हणून ते पुन्हा रोखीत व्यवहार करू लागले. मोदींनी एवढय़ा बँका उघडल्या. एटीएमचा, पेटीएमचा शोध लावला. भीम अ‍ॅप तयार केले. गेल्या सत्तरशे वर्षांत जे झाले नाही ते सगळे केले. परंतु आपले लोक.. नोटबंदीच्या निर्णयानंतरच्या काळात रोखीचे प्रमाण जे ७.८ लाख कोटींवर आले होते, ते  आता त्यांनी दुप्पट केले. बाजारातले चलनाचे प्रमाणसुद्धा त्यांनी वाढवले. ते का? तर केवळ मोदींसारख्या अवतारी पुरुषाला विरोध करण्यासाठी. हा विरोध खरेतर मोडूनच काढला पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा नोटाबंदी झालीच पाहिजे. या देशाचा रोकडा विकास हवा असेल, तर हे केलेच पाहिजे..