जनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते यावर सत्ताधाऱ्यांचा भरवसा असतो. पण गेल्या तीन वर्षांत काळ बदलला. सत्ताधाऱ्यांची स्मरणशक्ती अल्पजीवी झाली आणि जनतेच्या स्मरणशक्तीचा गंज पुसला गेला. आता ‘१५ लाख’ म्हटले तरी तीन वर्षांपूर्वीच्या त्या घोषणा लख्ख आठवू लागतात. सत्ताधारी जे विसरू पाहतात, तेच आता त्यांना गळ्यात अडकलेल्या हाडकासारखे टोचू लागले आहे. पूर्वी, निवडणुकीआधी घोषणांचा कितीही पाऊस पाडला, तरी तो ‘चुनावी जुमला’ आहे, हे सांगावे लागत नसे. म्हणून, निवडणुकांचा गोंधळ पार पडला, की जनताच ते विसरून जाईल हे ओळखून सत्ताधारीदेखील त्यांच्या घोषणा विसरून जायचे. आता तसे राहिलेले नाही. विसरू म्हटले तरी जनता त्यांना विसरू देत नाही. हे भलतेच धर्मसंकट. सोडले तरीही चावतच राहणारे! या धर्मसंकटाने एका विकासपुरुषाला जन्म दिला आणि त्याने ‘घर घर’ व्यापले. त्याचा आवाज तर दरमहा घराघरांत घुमू लागल्याने, विसरू म्हणताही विसर पडणे शक्य नाही अशी स्थिती ओढवली आणि पंचाईतच झाली. जनतेला त्यांच्या जुन्या ‘विस्मृतीगुणा’ची पुन्हा ‘आठवण’ व्हावी यासाठी आता वेगवेगळ्या मात्रांचा वापर करावयास लागणार हे आमच्या नितीनभाऊंनी ओळखले. असे चुनावी जुमले हे ‘गले की हड्डी’ होऊन टोचत राहणार हेही नितीनभाऊंनीच पहिल्यांदा ओळखून दाखविले. म्हणूनच, पुण्यातल्या एका मराठमोळ्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाचा ‘चेहरा’ बदलण्याच्या धाडसी कार्यक्रमाचा शुभारंभ करून टाकला. तोवर भाजप हा मोदी-शहांचा पक्ष होऊन गेलाच होता. त्यातून पक्षाला बाहेर काढणे म्हणजे, मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचाच कार्यक्रम! उत्तर-दक्षिणेतील भक्तपरंपरेला तो पेलवणारा नसल्याने, नितीनभाऊंनी ही जबाबदारी स्वत:हून शिरावर घेतली आणि ‘भाजप म्हणजे काही मोदी-शहा नव्हेत’, असे जाहीर करून टाकले. पक्षाचा चेहरा पुसण्याचे हे धाडस दाखविले नसते, तर आज सरकारी जाहिरातींवर तेच चेहरे झळकत राहिले असते आणि तो ‘जुमला’ जनतेला आठवत राहिला असता. पुन्हा गळ्यात अडकलेल्या त्या ‘हड्डी’चा त्रास होतच राहिला असता. नितीनभाऊ मोठे धोरणी! गळ्यातली ती त्रासदायक हड्डी बेमालूम लपवायची म्हणजे तिचा त्रासच होणार नाही, एवढे ओळखण्याचे शहाणपण अन्य कुणीच दाखविले नसते. महाराष्ट्रातील धानोऱ्यात रस्ते विकासाच्या कामांच्या कोनशिला समारंभाचा घाट नितीनभाऊंनी सोमवारी स्वबळावरच घातला. यजमानाच्या भूमिकेत पानभर जाहिराती दिल्या आणि तमाम जनतेला आमंत्रणही दिले. सरकार म्हणजे मोदी-शहा नव्हेत, एवढे बोलूनच थांबले नाहीत, तर नितीनभाऊंनी ते करून दाखविले. सरकारी जाहिरातीत मोदींचा फोटो दिसला नाही, म्हणून कुणी चुकचुकले असेल का?.. जनतेचा विस्मृतीगुण जागा करणारी मात्रा हळूहळू लागू पडणार असे दिसत आहे!