तर, नेहमीप्रमाणेच आजही आम्ही सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन घरातल्या घरात येरझारा घालत वर्तमानपत्राची वाट पाहात असतानाच अचानक दारावरची बेल वाजल्याने पेपर आल्याच्या आनंदात दरवाजा उघडला. ‘काका, तुमचा पेपर शेजारच्या लेलेंनी वाचायला घेतलाय.. वाचून झाल्यावर पाठवतो म्हणालेत ते,’ असे बाहेरूनच सांगत पेपरवाला मुलगा धाडधाड जिने उतरत खाली उतरत असल्याचे पाहून आम्ही नेहमीप्रमाणे भानावर आलो आणि बराच वेळ हातात धरलेला चहाचा कप तोंडास लावत अखेर, कालचाच, लेलेंनी वाचून पाठविलेला पेपर वाचावयास घेतला. आणि पहिले पान उघडून समोरच दिसलेली आमच्या आवडत्या नेत्याची, शरद पवार यांची, ठळक बातमी आम्ही वाचावयास घेतली. आपण मागे कधी तरी पाकिस्तानात गेलो असताना तेथील जनतेने भारताविषयी प्रेम दाखविल्याचा अनुभव आपणास आल्याचे त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितल्याचे वाचून आमचा ऊर अभिमानाने भरून आला. सध्या देश मोठय़ा कठीण परिस्थितीतून मार्गक्रमणा करीत असल्याने, परस्पर सौहार्दाची व शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध असण्याची गरज आहे असे अमितभाई- म्हणजे, लेलेंचा चिरंजीव अमित नव्हे, आमचे अमितभाई.. शहा- मागे कधी तरी बोलता बोलता म्हणाल्याचे आम्हास आठवले. नेमका असाच कठीण प्रसंग सध्या उद्भवलेला असतानाच शरद पवारांना पाकिस्तानी जनतेच्या भारताविषयीच्या सलोखा, सौहार्द आणि जिव्हाळ्याची जाणीव व्हावी हा योगायोग नक्कीच नाही, असे वाटून आम्हाला शरदरावांविषयी अभिमानही वाटू लागला. आम्ही एका झटक्यात ती बातमी वाचून काढली. झालेच तर, मोबाइलवर तिचा स्क्रीनशॉट घेऊन तातडीने तो लेलेंना व्हॉटसॅप केला. पुढच्या काही सेकंदांतच त्यावर बरोबरच्या दोन निळ्या खुणा दिसल्या. लेलेंनी ती बातमी वाचून काढली असावी असा तर्क करून काही वेळाने आम्ही पुन्हा त्यांस दोन अंगठे पाठवून दिले. निळ्या खुणाही उमटल्या तोच दरवाजाची बेल पुन्हा वाजली. आम्ही उठून दरवाजा उघडून बघितले तो समोर पुन्हा लेलेंचा चिरंजीव- अमित- दरवाजात उभा होता. काखेतली पेपरची घडी हाती घेऊन आमच्या हाती देत अमितराव घरात घुसले, आणि आता हा सुपुत्र काही तरी कोडे घालणार या विचाराने क्षणभर आमच्या मनाची घालमेलही झाली. तोवर अमितने आमच्या सोफ्यावर त्याची नेहमीची मांड ठोकलीही होती. पेपर बाजूला ठेवून आता अमित नवे कोणते कोडे घालतो याची आम्ही वाट पाहात असतानाच अमितने विचारले, ‘काका, तुम्हाला महागुरू माहीत आहेत का?’ आता हा आपल्याला ‘पिळणार’ हे ओळखून आम्ही काहीसे सावधही झालो व लगेचच कालच्या पेपरातली ती पवारांची बातमी उघडून त्याच्यासमोर धरली. ‘अरे, हा बघ तो महागुरू.. बाहेर एवढे प्रश्न पेटलेत, आंदोलनं होतायत, जाळपोळ सुरू आहे, अशा वेळी नेमके यांना पाकिस्तानी जनतेचा भारताविषयीचा जिव्हाळा आठवला.. जुनी बीसीसीआयची दोस्ती रे’.. आम्ही अभिमानाने अमितला सांगितले. आदरणीय पंतप्रधान मोदी पुन्हा पवारांचे बोट पकडून आशेने त्यांच्याकडे पाहात आहेत, असे एक काल्पनिक दृश्यही आमच्या डोळ्यासमोर तरळू लागले. ‘काका, बरोबर आहे तुमचं उत्तर.. मला माहीत होतं, तुम्ही बरोबर सांगणार, पण बाबाच म्हणाले की त्याला विचार, राजकारणात खूप कळतं म्हणून गमजा मारतो ना तो..’ सोफ्यातून उठून बाहेर पळता पळता अमित म्हणाला आणि जाताना पुन्हा त्याने धाडकन दरवाजा आपटून बंद केला.. पण तरीही आम्हाला आज अमितचा राग आला नाही!