11 December 2017

News Flash

मूर्तिमंत आदर्श

आदर्श कसे भव्य असावेत, हे आदित्यनाथांसारख्या योगी पुरुषांनी आधीच जाणले होते.

लोकसत्ता टीम | Updated: October 11, 2017 2:43 AM

जो देश भूतकाळाचा विचार करून वर्तमान जगतो आणि फक्त भविष्याकडे पाहतो त्यालाच खरे भवितव्य असते, असे कोणी तरी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही आणि आमचे प्रधानसेवक अलीकडे सातत्याने भविष्याकडेच पाहतो आहोत. प्रधानसेवकांच्या दृष्टीचा हबल टेलिस्कोप पाहा, कसा इसवी सनाच्या २०२०, २०२२ या वर्षांवर स्थिरावलेला असतो. ते तसे विनयशील व्यवहारी. त्यामुळे ते फारच दूरचे पाहत नाहीत. आम्हांस मात्र त्यांच्याप्रमाणे देशात कमळाची बाग फुलवणे वगैरे निवडणुकी कृषीउद्योग करावयाचे नसल्याकारणाने अधिक लांबवरचे, म्हणजे उदाहरणार्थ २०२५ वगैरेंपर्यंतचे पाहता येते. तर त्यात काय दिसते आम्हांस? तर अर्थातच देशाचा वारेमाप विकास झाल्याचे दिसतेच दिसते. ते तसे आताही दिसत आहे. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. परंतु आम्हांस २०२५चे भारतवर्ष दिसते ते एक सुसंस्कारित राष्ट्र म्हणून. आता कोणी म्हणेल, की त्याआधी हे राष्ट्र संस्कारहीन होते का? तर तसे नाही. काही परकी हातांमुळे या राष्ट्रात संस्कारलोप झाला होता, हे खरे. परिणामी येथे असंस्कृत विरोधक वगैरे जमाती असत. २०२५ मध्ये मात्र तसे काहीही राहिलेले नव्हते. हे कसे काय बुवा साध्य झाले? संपूर्ण देशच्या देश, त्यातील सर्व समाजमाध्यमांसह, एवढा सुसंस्कारी कसा काय झाला? तर त्याचे गमक आहे ‘आप्रमो’मध्ये. म्हणजे आदर्श प्रस्थापन मोहीम. ही मोहीम चालते कशी? तर त्यातून समाजापुढे आदर्श ठेवले जातात. आता हे आदर्श काही लहानसहान असून चालत नाही. आपल्याकडील अनेकांनी, म्हणजे उदाहरणार्थ महर्षी वाल्मीकींनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श आपल्यासमोर मांडला. परंतु त्याचा काय उपयोग झाला? कारण- तो एका ग्रंथातून मांडला होता. आदर्श कसे भव्य असावेत, हे आदित्यनाथांसारख्या योगी पुरुषांनी आधीच जाणले होते. म्हणून तर त्यांनी सन २०१७ मध्ये संकल्प सोडला- प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवायचा तर त्यांची किमान १०० मीटरची, म्हणजे साधारण ३२ मजली इमारतीएवढी मूर्ती तर उभारलीच पाहिजे. तत्पूर्वी महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा असाच पुतळा उभारण्याचा संकल्प अरबी समुद्रात सोडण्यात आला होता. पाहता पाहता ठिकठिकाणी असे उंच उंच पुतळे उभे राहिले. ते २०२५ मध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नासाच्या छायाचित्रांतून दिसतीलच. पाहू तिकडे अशी स्मारकेच स्मारके असल्यावर देश सुसंस्कारी व त्यायोगे विकसित व्हायला किती वेळ लागतो? देशात असा मूर्तिमंत सुसंस्कारी विकास झाला, की असे म्हणतात : सन २०२५ मध्ये भारतातील एकाही रुग्णालयात ऑक्सिजनअभावी मुले मरत नव्हती. ते पाहून तेव्हा म्हणे विकसित देशांत भारताचे पुतळे उभारण्यात येत होते.

First Published on October 11, 2017 2:15 am

Web Title: narendra modi modi government indian development yogi adityanath