कोणताही मीडिया तुम्हाला हे सांगणार नाही, परंतु वाचकहो, आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी आफ्रिका दिग्विजयाची मुहूर्तमेढ रचली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या इतिहासात आजवरच्या एकाही पंतप्रधानाने जे केले नाही, ते मोदीजींनी केले आहे. ते म्हणजे त्यांनी रवांडा या देशाला बंधुभावाच्या अतूट बंधनात अडकवले आहे. वस्तुत: रवांडाशी मोदीजींचे जुनेच स्नेहबंध आहेत. ते ज्या देशात जातात त्या देशाशी त्यांचे तसे जुनेच नाते असते. म्हणून तर ते जात असतात त्या-त्या देशात. अन्यथा त्यांना का हौस आहे फिरण्याची? अनेकांना हे माहीत नसेल आणि कोणताही मीडिया हे सांगणार नाही, परंतु रवांडा हा आफ्रिका खंडातील एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे. फार पूर्वी, पूर्व आफ्रिकेतून व्यापारासाठी म्हणून लोक गुजरातच्या बंदरांत येत असत. शिवाय आताही आफ्रिकेतील अनेक लोक भारतात येत असतात. आपण अत्यंत प्रेमाने त्यांचे स्वागत व पाहुणचार करतो. तर अशा प्रकारे मोदीजींचे रवांडाशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच या देशाने चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांची पाठ वळताच मोदीजींना पाचारण केले. मोदीजींनी तेथे जिनिपग यांना जे जमले नाही ते केले. जिनिपगांनी रवांडाला रस्ते बांधायला १२६ दशलक्ष डॉलर दिले. मोदीजींनी त्याच्यावर कडी केली. त्या देशातील शेतकरीबांधवांची अवनती पाहून मोदीजींचे मन द्रवले. त्या शेतकऱ्यांवर तरी आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी त्यांनी शेती आणि विशेष आíथक झोनसाठी तातडीने २०० दशलक्ष डॉलर दिले. अशा प्रकारे त्यांनी जिनिपगांच्या आíथक-राजकारणावर पाणी ओतले आणि संपूर्ण रवांडाच नव्हे, तर आफ्रिका खंड जिंकून घेतला. परंतु वाचकहो, मोदीजी तेवढय़ावरच थांबले नाहीत. खरे मुत्सद्दी नेते आहेत ते. त्यांनी त्या देशाला बंधुभावाच्या बंधनातच अडकून टाकले. ते कसे, हे कोणताही मीडिया तुम्हाला सांगणार नाही. पण मोदीजींनी काय केले की रवांडातील एका गावाला २०० गोमाता दिल्या. ते पाहून रवांडावासीयांच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले म्हणतात. भारतीय पंतप्रधानाने आपली गोमाता देऊन रक्ताचे नसले, तरी प्रेमळ बंधुत्वाचे नाते जोडले त्यांच्याशी. जिनिपगांना हे नाही करता आले. नेहरू नावाचे एक नेते होऊन गेले आपल्याकडे म्हणे. तर त्या नेहरूंनासुद्धा हे जमले नव्हते. ते आपले हत्ती वगरेच वाटत बसले होते. असो. तर आता येथून पुढे हिंदी-रवांडियन भाईभाई असेच नाते जुळले जन्माजन्मांचे. मोदीजी म्हणाले सुद्धा तेथे- तुम्हाला गाई दिल्याचे पाहून आमचे भारतीयसुद्धा खूश होतील. अर्थात, भारतीय तर तसेही खूशच असतात. पण रवांडावासी मात्र भलतेच आनंदी झाले असणार. अखेर त्यांच्या अर्थव्यवस्थेत गाईला मोठेच स्थान आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गििरका नामक गोमाता वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे त्यांच्या पंतप्रधानांनी. त्यालाच मोदीजींनी हातभार लावला. तर आपल्याकडचे विरोधक म्हणतात, की तो देश तर गोमांसभक्ष्यी आहे. गोवंशमांसाची निर्यात करतो. या विरोधकांना एवढेही कळत नाही, की तसे आपल्याकडेही गोमांसभक्ष्यी लोक आहेत. पण त्यांना डाएट शिकवितोयच की नाही आपण? तसेच रवांडालाही डाएट शिकविता नाही का येणार? हळूहळू तेथे गोरक्षकांना पाठविता येईल. ते गोहत्या करणे, गाईंची ने-आण करणे किती वाईट याचे शिक्षण देतील रवांडाला. आहे काय आणि नाही काय? पण हे तुम्हाला मीडिया सांगणार नाही. मोदीजींचे असे यशस्वी परराष्ट्र धोरण डोळ्यांत खुपते त्या नतद्रष्टांच्या..