मराठवाडय़ातील आपल्या घराच्या गच्चीवरून चिंतू हताशपणे आभाळ न्याहाळत होता. आकाशाच्या कोपऱ्यात कुठे तरी एखाद्दुसरा काळ्या ढगाचा ठिपका दिसत होता. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजविला असताना, ढगाचा हा जेमतेम तुकडा तरी आपल्या डोक्यावरच्या आभाळाकडे येईल का, असा विचार करतच चिंतूने लांबवर पाहिले. माळरानाची उजाड जमीनही आशाळभूतपणे आकाशाकडे पाहात आहे, असा चिंतूला भास झाला. अचानक आकाशात झेपावणारे काळे लोळ दिसले. चिंतूने निरखून पाहिले. हे ढग नाहीत, तर कारखान्याच्या धुरांडय़ातून आकाशात दाटणारा काळा, विषारी धूर आहे, याची खात्री झाल्यावर तो खिन्न झाला. कारखान्यापर्यंतच्या माळावर मध्ये कुठेच एकही झाड नाही, ही भयाण जाणीव त्याला छळू लागली, आणि आपण निसर्गापासून खूप दूर जात आहोत या विचाराने चिंतू खंतावला. तिकडे कोल्हापुराकडे नद्यांची पातळी पूररेषा ओलांडून गावे गिळू पाहात असताना, इकडे मात्र नदीच्या पात्राची रेषाही शोधावी लागते याची चिंतूला लाज वाटली. संध्याकाळ सरत चालली होती. त्याने घडय़ाळाकडे पाहिले. काही वेळातच मोदी आणि बेअर ग्रिल्स यांची ती भेट होणार होती. चिंतूने टीव्ही चालू केला, चॅनेल निवडले. वने, निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी मोदी आणि ग्रिल्स यांच्यातील संवादाची चिंतूला उत्सुकता होती. अखेर तो क्षण आला. ग्रिल्ससोबत संवाद साधताना मोदी त्यांच्या निसर्गासोबतच्या नात्याची उकल करू लागले, आणि आकाशाच्या कोपऱ्यात रुसव्या बाळासारखा चिकटून  बसलेला काळ्या ढगाचा तो तुकडा पुन्हा चिंतूला आठवला. लांबवर एकही झाड शिल्लक नसताना या ढगाने आपल्याकडे कशासाठी यावे, असा हताश विचारही चिंतूच्या मनात आला. त्याने पुन्हा टीव्हीवर नजर लावली.. मोदी आणि ग्रिल्स यांची ‘वन की बात’ खूपच रंगली होती. लहानपणीच्या निसर्गासोबतच्या नात्याची उकल करताना मोदी भूतकाळात हरवून गेले होते. भारताने निसर्गाशी किती जवळीक साधली आहे, या विचाराचे भारावलेपण ग्रिल्सच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटले होते. चिंतूला मात्र, आपल्या घराबाहेरचे ते माळरान जणू वेडावत होते. जिम कार्बेटच्या जंगलातील ते हिरवेपण आपल्याला खिजवत आहे, असे चिंतूला वाटू लागले. आपल्या जमिनीचे वनाशी, जंगलाशी नातेच राहिलेले नाही, या जाणिवेने चिंतू उदास झाला. तिकडे ग्रिल्स आणि मोदी यांचा संवाद सुरूच होता. चिंतूने डोळे मिटले. पण कान मात्र उघडेच   होते. ‘आपण निसर्गाशी नाते तोडले, तर निसर्ग आपल्याला धोका देणारच.. पण निसर्गाशी समतोल साधला, तर तो आपल्याला मदत करतो.. निसर्गात, झाडाझुडपांमध्येही जीव असतो. ती तोडून त्यांचा जीव घेऊन आपले  पोट भरणे ही संस्कृती नाही!’.. मोदी म्हणाले आणि चिंतूने पुन्हा खिडकीतून घराबाहेर पाहिले. ग्रिल्ससोबतची मोदींची ‘वन की बात’ आपल्यासारख्या, वनांचा संहार करून बंगले बांधणाऱ्या आणि पैशापाठी धावणाऱ्या माणसांसाठी आहे, हे ओळखून चिंतूने आपले सारे लक्ष टीव्हीच्या पडद्यावर खिळविले.. आता पाऊस आला की आपणही पावसाची बातमी पोस्टकार्डावरून सगळ्यांना कळवायची, असेही त्याने ठरविले. आकाशातला काळा धुरकट पुंजका अजूनही रुसल्यागत  तिथेच लपून बसला होता!