13 December 2018

News Flash

अन्याय पे चर्चा..

भुजबळ लवकरच बाहेर येतील, असा दिलासा भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांनी दिला,

छगन भुजबळ , शरद पवार

ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून अटक झाली, त्याला आणखी दोन दिवसांनी, १४ मार्चला दोन वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पण गेल्या दोन वर्षांत राजकारणाचे भुजबळांविना फारसे काही अडले नाही असे सामान्यजनांना वाटत असले, तरी ते तसे नव्हते. एकटय़ा राष्ट्रवादीलाच नव्हे, तर भाजपसह सर्वच पक्षांनी भुजबळांच्या पाठीशी आपल्या शुभेच्छा उभ्या केल्या होत्या. भुजबळ लवकरच बाहेर येतील, असा दिलासा भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांनी दिला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली नैतिक ताकद भुजबळांच्या पाठीशी उभी केली. भुजबळांच्या रूपाने नाशिकचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे, अशी आर्त कैफियत भुजबळ समर्थकांनी राज ठाकरेंकडे मांडली, तेव्हा नाशिकच्या भवितव्याच्या चिंतेने राज ठाकरेही काही क्षण कळवळले. त्यांनी ‘भुजबळ छोडो’ आंदोलनाची हाक दिली, आणि ‘अन्याय पे चर्चा’ सुरू झाली. तसेही, भुजबळांवर अन्याय होत असल्याच्या भावनेने यच्चयावत राजकीय क्षेत्र हळहळून गेले होतेच. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर, भुजबळांवर अन्याय होत असल्याची भावना केव्हाचीच बोलून दाखविली होती. ओबीसी समाजाचे नेते असलेल्या भुजबळांच्या पाठीशी अशी आपली नैतिक ताकद उभी करण्याच्या स्पर्धेत भाजप, मनसे, आदी सारे पक्ष आपापल्या प्याद्यांच्या फौजा घेऊन उतरले असताना, आपणही मागे राहू नये या भावनेने आमदार कपिल पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या आठवडय़ात भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुन्हा एकदा भावनांचा कल्लोळ राजकारणात दाटून आला. या ‘अन्याय पे चर्चे’ला एवढे उधाण आले की, ‘आता पुरे करा’ असे भुजबळांनाच रुग्णालयातून सांगावे लागले. भुजबळांवर ही आफत कुणामुळे ओढवली, या शंकेची कुजबुज गेली दोन वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती, तेव्हा सारे नेते त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत होते. आजपासून बरोब्बर एक महिन्यापूर्वी भुजबळ यांनीच या शंकेला पूर्णविराम दिला. एका ‘काळ्या गेंडय़ा’मुळे आपल्यावर ही आफत ओढवली, असे भुजबळ यांनी स्वमुखाने सांगितले आणि तो ‘काळा गेंडा’ कोण हे स्पष्ट होताच साऱ्या शंका मिटल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भुजबळ यांच्या पाठीशी आपल्या सदिच्छांची ताकद उभी केली आहे. भुजबळ यांच्या उपचारात हयगय झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा पवार यांनी दिल्याने, भुजबळांचे नेतृत्व मानणारा ओबीसी समाज नक्कीच सुखावला असेल. आता ‘अन्याय पे चर्चा’ खऱ्या अर्थाने रंगेल आणि तुरुंगात असलेल्या भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेने त्यांच्या अनुयायांमध्ये अस्वस्थता पसरेल.. ‘भुजबळ छोडो’ची हाक सर्वदूर ऐकू जाईल. तोवर निवडणुका जवळ येतील. भुजबळांसाठी सारे पक्ष आपले वाचाकौशल्य पणाला लावतील. अन्याय पे चर्चेची स्पर्धा रंगत जाईल आणि त्यामध्ये ज्याची सरशी होईल, त्याला मतांची बेगमी करता येईल. राजकारणाच्या पुलाखाली नव्या पाण्याचा पूर आला आहे..

First Published on March 12, 2018 2:51 am

Web Title: ncp chief sharad pawar warn maharashtra government over chhagan bhujbal health