सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते.. तेच ते. सोळा सरले, सतरा लागले, भिंतीवरल्या कॅलेंडरात नवे नवे आकडे लागले. जानेवारी तोच, फेब्रुवारी तोच, डिसेंबरही पुन्हा येणार थर्टीफर्स्टसाठी तसाच तोच. तसाच फुलणार चैत्र, आणि वैषाख येणार, तसाच पूर्णविरामाशी फाल्गुन उभा राहणार. तिशी वा एकतिशी, महिने आमचे हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. तेच वर्तमान, तेच पत्र, रोजच्या रकान्याचे तेच गोत्र. त्याच कॉलमात, तेच भविष्य, एकदा वर, एकदा खाली, चांगला दिवस.. छान दिवस.. आज मान होणार नाही खाली. तसाच रस्ता, तशीच वाट, वाटेवरती तसाच घाट, घाटासाठी तशीच धाप, रस्त्याचेही तेच माप, पावलांचेही तेच माप, नाही बदलली साधी आडवाट.. हेच ते, हेच ते.. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. तसेच रूळ, तशीच गर्दी, फलाटावर वायफायदर्दी. तशीच गाडी, तसाच भोंगा, चौथ्या सीटवर स्वत:ला कोंबा. रविवारही तोच तसा, मेगाब्लॉकही तोच तसा, लटकून, झटकून लोकलमध्ये, ठोसे देत घाम पुसा. इंडिकेटरवर स्थानक आमच्या याही वर्षी हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. घडय़ाळ्याच्या कोंबडय़ाची भल्या सकाळी तशीच बांग, कचेरीला निघण्याआधी डोईवरचा तसाच भांग, बसच्या थांब्यावरती, रिक्षाच्या अड्डय़ावरती तीच रांग, तशीच रांग, रांगेमधले भांडणदेखील हेच ते हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. सरत्याने केले रिते, पाकीट अवचित हातोहात, सरता सरता पन्नास दिवस, आम्ही ऐकली मन की बात. नाही भरले पोट आमचे, एटीएमही भरले नाही, बँकेच्या कॅशियरने, जरा आमचे ऐकले नाही.

रोज रोज तेच विनोद, ऐकतो ऐसे आता थिल्लर, अध्र्या खिशाची रक्कम मिळाली, जगणे झाले पुरते चिल्लर. देण्याघेण्या नाही पैसा, सांगेल कोण, येथे बैसा? पैशासाठी रांगेमध्ये, जीव उबला, आणि उडाला, जगण्याच्या रणांगणी, असा फुकाचा देह पडला चलनाच्या वाटेवरती आमचे हाल हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. उजाडली ही तशीच सकाळ, चॅनेलांचा तसाच सुकाळ. कोण सांगे कुणी मारला गल्ला, कोण सांगे कुणी केला कल्ला. कुणी कुणाचा जीव घेतला, कोण कुणाच्या जीवावर उठला, विकट हसत बंदुका झाडत, कुणाचा जीव, कुणी मिटला. बातम्यांलगतचे लाल रक्त, हेच ते हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. कुठली खुर्ची, हवी कुणाला, रिमोट कुठला हवा कुणाला, कुठले डावे, कुठले उजवे, कुठले मधले म्हणावे कुणाला. बेबंदाच्या झेंडय़ाखाली कालचेच नाच ते.. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. त्याच त्या वाटेवरती, तरीही पाऊल आम्ही टाकू, हलके हसता चेहऱ्यावरती, पायतळीचे काटे झाकू. फसवून सर्वा, स्वत:सकटही गाणे गाऊ हेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते.