जाणाऱ्यास निरोप देणे हे असेही अवघडच काम असते. जुन्या वर्षांस टाटा करणे हे तर केव्हाही कठीणच. वर्षभराचे ऋणानुबंध असतात. ते असे एकदम नाही झटकून टाकता येत. त्यासाठी मन घट्ट करावेच लागते. ते करण्यासाठी मग द्रव पदार्थाचा सहारा घ्यावा लागतो. त्या संपूर्ण प्रक्रियेस ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करणे असे म्हटले जाते. वस्तुत: ते चूकच. शोक काही कोणी साजरा करीत नसते. तो साधारणत: पेल्यामध्ये बुडवून नाहीसा केला जातो. काही समाजांमध्ये मरणाचाही बॅण्डबाजा लावून उत्सव केला जातो तशातलाच हा प्रकार. तो करायचा तर सुरेबरोबरच सूरही हवेत. ते डीजेचे ढणढणीत सूर असतील तर अधिक गंमत. अखेर कधी कधी कल्लोळातच माणसास शांती मिळते. परंतु मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला या शांत्युत्सुकांचे हे सुख बघवत नसावे. त्यामुळेच या सरकारने यंदा ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वसामान्य कायदाप्रेमी नागरिकांना निरोपाचा सुर-सुरा उत्सव साजरा करण्यात मोठा अडथळा उभारला. आता कायदाप्रेमी सर्वसामान्य नागरिक हे निरोपकर्म पार पाडण्याचे वार्षिक कर्मकांड करतो ते आपल्याच गृहनिर्माण संकुलातील इटुकल्या मोकळ्या जागेत वा गच्चीवर. तेथे छान चार यार बसतात. गप्पा रंगतात. न आलेल्या सभासदाच्या पाठीमागे त्याच्याबद्दल भरभरून बोलले जाते. उपस्थितांत एखादे दोघे असे असतात की तार लागताच त्यांना थेट भाऊबिजेचीच आठवण येते. मग ‘तूच माझा भाऊ’ असे म्हणत पेल्यांची ओवाळणी सुरू होते. तर एकूण निरोपाच्या सुरावटींवर रंगणारा असा तो बंधुभावाचा फेस्टिव्हलच असतो. त्यास भगिनीवर्गाने नाके मुरडली, तर तो त्यांचा अधिकारच आहे म्हणून बंधूंनी सोडून द्यावे. पण सरकारने नाके मुरडावीत? आपल्याच टेरेसवर, आपल्याच गच्चीमध्ये हा खास निरोप (आणि जमल्यास नववर्ष स्वागताचा) ओलाचिंब समारंभ साजरा करण्यासाठी सरकारच्या उत्पादनशुल्क खात्याने चक्क परवान्याचे बंधन घातले. त्याचे मूल्यही थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १३,३०० रुपये इतके. आता हा अनेकांचा एका महिन्याचा डीए. तो केवळ परवान्याच्या चिटोऱ्यासाठी खर्चणे हा घोर अन्यायच. उत्पादन शुल्क खाते अशा गमतीजमती पूर्वीपासूनच करीत आहे. परंतु यंदा त्या खात्याने चक्क त्याच्या बातम्या पेरून जनतेमध्ये घबराट पेरण्याचा प्रयत्न केला. आता याच्या परिणामी किती निरोप समारंभ कोरडेच गेले, हे समजण्यास मार्ग नाही. किती जणांची नव्या वर्षांची पहिली सकाळ बिनदुधाच्या चहाची वा लिंबूपाण्याची गेली हे कसे मोजणार? वस्तुत: सरकारने असे करावयास नको होते. कोणत्याही भावनेचे विरेचन होणे हे बरे असते. आपल्याकडील अशा किती तरी उत्सवांची – उदाहरणार्थ साऱ्यांचा प्रिय शिमगा – योजना त्यासाठीच करण्यात आलेली आहे. थर्टी फर्स्ट म्हणा वा नववर्ष स्वागताचे चिंब ओले कार्यक्रम हा त्यातलाच एक भाग. तो भलेही पाश्चात्त्य असेल, परंतु पाश्चात्त्य भाषा आणि भूषेप्रमाणेच आपण तो आपला मानला आहे. त्यास ‘चांगभले’ म्हणावे आणि म्हणू द्यावे हे उत्तम. एरवी निरोपाला करकर लावण्यात काय हशील?