‘दाखवायचे दात’ हेच आपले ‘खरे दात’ आहेत असे बेमालूमपणे भासविणे हे ‘खायचे काम’ नव्हे. नीरव मोदी प्रकरणामुळे स्वत:ला, संपूर्ण बँकिंग क्षेत्राला आणि देशालाही मान खाली घालावयास लावलेल्या पंजाब नॅशनल बँकेने मात्र, आपले दाखवायचे दात डोळ्यात तेल घालून जपले. या अभूतपूर्व जपणुकीच्या कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्कार आणि प्रमाणपत्रांच्या पाठीमागेच या बँकेने आपले ‘खरे दात’ दडवून ठेवले. आता सारेच बिंग फुटल्यावर या प्रमाणपत्रांच्या आणि पुरस्कारांच्या मागे दडलेले दातच खरे दात होते, आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीतून चमकणारे दात मात्र नकली होते, याची कबुली देण्याशिवाय गत्यंतर उरलेच नाही. नीरव मोदी प्रकरणात समझोतापत्रांची खैरात करणाऱ्या या बँकेला केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तांच्या हस्ते, भ्रष्टाचारविरहित, चोख व शिस्तबद्ध कारभारासाठी पुरस्कार व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविले गेले. अशी काही वेगळीच बातमी आपल्यापर्यंत पोहोचल्यावर दक्षता आयोग नावाच्या यंत्रणेच्या दक्ष कारभाराचे मन भरून कौतुक करावे, की भ्रष्टाचार उजेडातही येणार नाही याची डोळ्यात तेल घालून जागरूकतेने काळजी घेणाऱ्या संबंधितांची ‘वाहवा’ करावी हेच समजेनासे होते. बँकेचे दाखवायचे दात दक्षता आयोगासही खोटे वाटले नाहीत. याच बँकेस, भ्रष्टाचार रोखण्यासाठी कारभारावर कडक पहारा ठेवल्याबद्दल उस्मानिया विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसने दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांच्या हस्ते मानाचा पुरस्कार बहाल केला होता, हे उजेडात आल्याने दक्षता आयोगासारख्या यंत्रणांचा कारभार किती डोळ्यात भरण्याजोगा आहे, या जाणिवेने ऊर भरून येतो. एखादा विद्यार्थी इंग्रजी विषयात अव्वल गुणवत्ता दाखवून त्याबद्दल बक्षिसेही मिळवतो, आपले पुरस्कार अभिमानाने मिरवतो, आणि हिंदी विषयात मात्र नापास होतो, तेव्हा त्याच्या पुरस्काराचे कौतुक करावे की तो ढ असलेल्या विषयाची काळजी करावी हा संभ्रमाचा मुद्दा खराच! पंजाब नॅशनल बँकेला गेल्या तीन वर्षांत पुरस्कार प्रदान करणारे दक्षता आयोगाचे अध्यक्ष के. व्ही चौधरी यांना मात्र बँकेच्या इंग्रजीतील हुशारीचे एवढे कौतुक, की ती दुसऱ्या एखाद्या विषयात पुरती नापास झाली आहे, हे त्या वेळी कौतुकाच्या भरात लक्षातच आले नाही. पंजाब नॅशनल बँकेने समझोतापत्रांची खैरात करण्याच्या अभूतपूर्व चतुराईतून सामान्य माणसाचा अविश्वास ओढवून घेतला असेल, तर ज्या काळात हा पराक्रम सुरू होता त्याच काळात बँकेच्या कामगिरीबद्दल तिच्या शिरपेचात पुरस्कारांचे तुरे खोवून तिचे कौतुक करणाऱ्या केंद्रीय दक्षता आयुक्तांचे कौतुक कोणत्या शब्दांत करावे, असा प्रश्न साहजिकच या देशातील जनताजनार्दनास पडला असेल. पण आता याचे आश्चर्य वाटून घेण्यात अर्थ नाही. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्याचे दक्षता आयोगास कळताच या आयोगाने आता कडक पावले टाकण्यास सुरुवातही केली आहे. या आयोगाने सोमवारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठी प्रश्नावली ठेवून हा घोटाळा कसा झाला, त्याचा जाब विचारला आहे. भ्रष्टाचारविरहित कारभारासाठी ज्या हातांनी पुरस्कार वाटले, त्याच हातांनी बँकेत उघडकीस आलेला भ्रष्टाचार खोदण्याची वेळ आलेल्या दक्षता आयोगास या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा द्यायलाच हव्यात!