आदरणीय नितीनभाऊ गडकरी, तुम्ही सत्य लपवत आहात, हे काही बरे नाही. अगोदर तुमच्या पक्षाने देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले, तेव्हा आम्ही कमालीचे हरखून गेलो. त्या सुखस्वप्नामुळेच आमचा ‘आनंदस्तर’ उंचावून भारत हा जगातील १२२ व्या क्रमांकाचा ‘आनंदी देश’ ठरला होता. इतर १२१ देशांतील जनता भारतापेक्षाही आनंदी आहे, हे सत्य आम्ही ‘अच्छे दिन’ योजनेमुळे विसरूनही गेलो होतो. एक दिवस आमचा आनंदस्तर उंचावणारच या आशेने तो ‘दिन’ उगवण्याची प्रतीक्षा करत असताना अचानक, ‘अच्छे दिन’ हा ‘चुनावी जुमला’ होता असे सांगण्यात आले. आमचा विरस झाला असतानाच, अगदी कालपरवाच, ‘अच्छे दिन वगैरे असे प्रत्यक्षात काही नसतेच’ असेही तुम्ही म्हणालात. ‘ज्याच्याकडे मर्सिडीझ आहे, त्याला आणखी आलिशान गाडी हवी असते, दोन फ्लॅट आहेत, त्याला आणखी काही हवे असते, अशा तऱ्हेने कुणीच कधीच संतुष्ट नसल्याने अच्छे दिन असा काही प्रकार प्रत्यक्षात नसतोच,’ असेच तुम्ही जाहीर करून टाकलेत. तुमचे हे विचार आम्हाला पटले. म्हणजे, थोर राजकीय नेते जेव्हा असे वास्तववादी विचार व्यक्त करतात, तेव्हा ते पटवून घेण्याव्यतिरिक्त आमच्याकडे अन्य इलाजच नसतो. मागे एकदा एका नेत्याने, ‘गरिबी ही तर मानसिक अवस्था आहे,’ असे जाहीर केल्यानंतर तेदेखील आम्हाला पटले होते आणि गरिबी हा चिंतेचा विषय नाहीच, अशी आम्ही आमची समजूत करून घेतली होती. अर्थात, गरिबी नावाचा काही प्रकार नसेलच, तर सारेच दिन अच्छे दिन असणार असेही आम्हाला वाटू लागले तोच, आनंदस्तराचे जागतिक पाहणी अहवालही जाहीर झाले होते. वास्तवाची जाणीव झाल्यावर ते पचविण्याची शक्ती येऊन आहे त्यातच आनंद मानण्याची सवय लागून जाते. साहजिकच, आनंदस्तर उंचावण्यास या मानसिकतेची खूपच मदत होत असते. तरीही विक्रमादित्याच्या मानगुटीवर ठाण मांडून बसलेल्या वेताळाप्रमाणे, आनंदस्तर मोजण्याचा हट्ट आम्ही सोडलेला नाही, आता आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात आनंद आहे असे उमगल्यानंतर या आनंदाचा स्तर जागतिक पातळीवर किती आहे, हे मोजण्याची गरज तर नाकारता येणारच नाही. मध्य प्रदेशाने तर त्यांच्या राज्यात आनंद विभागही सुरू केला आणि आता तर जनतेचा आनंदस्तर मोजण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रमही हाती घेतला आहे. नितीनभाऊ, तुम्ही जरी काहीही सांगत असलात, तरी जनतेचा जो काही आनंदस्तर असेल, तो मोजला तर पाहिजेच, असे मध्य प्रदेश सरकारचे मत आहे, आणि हट्टी विक्रमादित्याप्रमाणे हे सरकार आयआयटी खरगपूर या संस्थेकडे त्याचा पाठपुरावाही करते आहे. मध्य प्रदेशातील आनंदस्तर मोजण्याचे काम या संस्थेने तयार केलेल्या प्रश्नावलीतून सुरू होणार असल्याने, या प्रश्नावलीत पहिलाच प्रश्न काय असावा यासाठी आमची एक सूचना आहे. नितीनभाऊ, तुम्ही म्हणता तसे, अच्छे दिन असा काही प्रकार नसेल तर, ‘आनंद ही निव्वळ मनोवस्था आहे हे पटते का,’ असा या प्रश्नावलीतील पहिला प्रश्न ठेवल्यास, मध्य प्रदेशातील जनताच सरकारला अपेक्षित उत्तरे देईल, आणि तेथील आनंदस्तर उंचावलेला दिसेल, यात शंका नाही. आनंद या मानसिक अवस्थेचा भौतिक स्थितीशी संबंध जोडून उगीचच, ‘कुठे आहेत अच्छे दिन’ वगैरे प्रश्न विचारणाऱ्यांना ती चपराक ठरेल, याची आम्हाला पुरती खात्री आहे..