18 November 2017

News Flash

‘भुक्कड’कथा!

आजकाल कुणाचे बोलणे खरे ठरले म्हणजे साखर वाटण्याच्या प्रथेचे पुण्याच्या परिसरात पुनरुज्जीवन झाले आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 6, 2017 1:27 AM

Nitin gadkari : हल्लीच्या काळात विचारांशी कटिबद्धता नसलेले अनेकजण दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विचारांशी प्रामाणिक न राहता सत्ता असलेल्या पक्षामध्ये जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी आयुष्यभर आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.

लोकांना खरे वाटेल इतक्या गंभीरपणाने खोटे बोलणे सोपे नसते. एखाद्याच मोदींना ती कला साधते. पण कधी कधी, लोकांना खोटे वाटेल एवढय़ा सहजपणाने खरे बोलणेही सोपे नसते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ती कला साधली आहे. नितीन गडकरी म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतले, भारताचे श्रावणबाळ! उत्तराखंडात चारधाम महामार्ग प्रकल्पाचा पाया रचून देशातील तमाम मातापित्यांच्या तीर्थयात्रा सुकर करणारा हा श्रावणबाळ तोंडाने मात्र चांगलाच फाटका असला तरी तो जे बोलतो ते गांभीर्याने असते आणि खरेही असते, तरीही खोटेच वाटते असे आता लोकांना अनुभवाने पटू लागले आहे. म्हणूनच त्यांच्या तोंडून व्यवस्थेच्या भुक्कडकथा ऐकताना जनतेला गुदगुल्याही होतात. स्वत:चे खाते सोडून अन्य कोणत्याही व्यवस्थेवर कोरडे ओढताना, गडकरींची जीभ जणू चाबूक हाणल्यासारखी  सटासट सुटते. राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून, सरकारने स्वस्तुतीची गीते गात सुटावे आणि गडकरी यांनी आपल्या सैलसर जिभेने त्यावर बोळे फिरवावेत हे दृश्य आता नवीन राहिलेले नाही. खास वैदर्भीय शेलकेपणाचा साजही त्यांच्या शब्दसौंदर्याला चढू लागला, की उर्वरित महाराष्ट्र त्यांची मुक्ताफळे भक्तिमय वातावरणात श्रवण करू लागतो. खरे म्हणजे, स्वपक्षाची पिसे काढणे ही राजनीती सोपी नसल्याने कुणी सहसा त्या फंदात पडत नाहीत. पण खोटे वाटावे इतक्या सहजपणाने खरे बोलण्याची कला साधल्यामुळे, गडकरींच्या खरेपणाला दीर्घायुष्य नसते. तेवढय़ापुरत्या टाळ्या वाजतात, पण नंतर त्यांनी सांगितलेल्या व्यवस्थेच्या भुक्कडपणाच्या सत्यकथांचा विनोद गाजत राहतो. परवा पुण्यात त्यांनी राज्याच्या नगरविकास खात्याची लक्तरे वेशीवर टांगली. वीस वर्षांत शहर नियोजनाची फाइलदेखील न हलविणारे हे खाते भुक्कड आणि होपलेस आहे असे गडकरी म्हणाले आणि पुणेकरांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वगातही केले. आपल्या समस्यांची एवढय़ा कनवाळूपणाने बाजू घेताना प्रसंगी स्वपक्षावरही टीकेची झोड उठविणारा नेता आजवर कुणीच कधी अनुभवलेला नसतो. पुण्याच्या जनतेला तर याआधी कधीच असा अनुभव आलेला नसल्याने, गडकरींच्या तोंडात साखर पडो असेच त्यांना त्या दिवशी वाटले असेल. आजकाल कुणाचे बोलणे खरे ठरले म्हणजे साखर वाटण्याच्या प्रथेचे पुण्याच्या परिसरात पुनरुज्जीवन झाले आहे. नगरविकास खात्याचा भुक्कडपणा जगजाहीर करून गडकरींनी पुण्याच्या समस्येविषयी कणव दाखविल्याने तेदेखील या प्रथेस पात्र ठरतात. तसेही, याआधीही गडकरींनी अनेक खात्यांना भुक्कड ठरवून टाकले होते. लक्ष्मीदर्शनापुरते काम करणारा आरटीओ विभाग भुक्कड असल्याने तो बंद केला पाहिजे, असेही मागे ते म्हणाले, तेव्हाही, गडकरींच्या तोंडात साखर पडो असेच सर्वाना वाटले असावे. थोडक्यात, गडकरी जेव्हा जेव्हा जे जे काही बोलतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडात साखर पडावी अशा सदिच्छा व्यक्त होतात. त्यांना आपल्या मार्गात यशस्वी होण्यासाठी या साखर सदिच्छांची पुंजी खूप मोलाची ठरणार आहे.

First Published on September 6, 2017 1:27 am

Web Title: nitin gadkari foundations char dham road connectivity project in uttarakhand
टॅग Nitin Gadkari