11 December 2017

News Flash

संकटमोचक नितीनभाऊ!

नितीनभाऊ जनतेच्या मनातले बोलतात.

लोकसत्ता टीम | Updated: October 10, 2017 2:28 AM

सरकारला अडचणीत आणणारे अनेक जण असतात, पण संकटाच्या वेळी सावरणारे काही मोजकेच. या ‘मोजक्यां’च्या यादीत आपले नितीनभाऊ गडकरी यांचे नाव नक्कीच वरच्या क्रमांकावर असेल. पंतप्रधान मोदी नेहमी ‘मन की बात’ बोलतात, तसेच नितीनभाऊ गडकरीदेखील ‘मन की बात’ बोलतात. म्हणजेच नितीनभाऊ जनतेच्या मनातले बोलतात. सरकारी कर्मचारी आणि कामचुकार अधिकाऱ्यांना ते जेव्हा कडक शब्दांत घरचा आहेर देतात, सरकारी नियम झुगारणाऱ्या कारखान्यांवर बुलडोझर चालविण्याचा, कामचुकार अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन घरी बसविण्याचा बडगा ते दाखवितात, तेव्हा त्यांच्या तोंडून ही जनतेची ‘बात’ व्यक्त होते. अशी मन की बात ऐकून अलीकडे सामान्य जनता अधिक सुखावते, हे नितीनभाऊंनी ओळखले असावे. मोदी सरकारच्या नोटाबंदीला परवाच्या रविवारी ११ महिने पूर्ण झाले. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे उठलेले वादळ आठ दिवसांत निवळेल व सारे काही सुरळीत होईल असे तेव्हा नितीनभाऊ म्हणाले होते, हे अनेकांना आठवतही नसेल. पण नोटाबंदीनंतर धनवंतांची होणारी फरफट पाहून सामान्य जनतेच्या मनात ज्या समाधानाच्या लाटा उसळत होत्या, ती सरकारची ‘खरी कमाई’ असल्याचे बहुधा तेव्हा नितीनभाऊंनी ओळखले असावे. नोटाबंदीनंतर धनवंतांवर पडणाऱ्या छाप्यांमुळे सामान्य जनता सुखावत होती, यापेक्षा ‘अच्छे दिन’ कोणते असू शकतात?.. शेवटी जनतेला सुखी आणि समाधानी ठेवणे हेच तर कल्याणकारी राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते. पण समाधानाच्या आभासी सुखात समाज फार काळ वावरू शकत नाही. त्याला वास्तवाचे भान देणे हेही जाणत्या राज्यकर्त्यांचे काम असते. ते कामही नितीनभाऊ चोखपणे बजावतात. सत्ताधारी भाजपमधील शौरी-सिन्हांसारख्या नेत्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तोंड उघडले, तेव्हा नितीन गडकरींनी शौरी-सिन्हांच्या सुरात आपला रोखठोक सूर मिसळला. कारण जनतेची ‘मन की बात’ बोलण्याची योग्य वेळ आली होती. योग्य वेळ साधून समाजाची नाडी नेमकी पकडणारा नेताच तर खरा राजकारणी. आता जनतेच्या मनातली बात आपण ओळखली नाही, तर विरोधक ती बात बोलू लागतील आणि समाज त्यांच्यासोबत जाईल याची नेमक्या वेळी जाणीव होणारे एक सहावे इंद्रिय नितीनभाऊंना लाभले आहे. सत्ताधाऱ्याच्या आवेशात सारवासारवीचा खेळ खेळण्यापेक्षा प्रतिपक्षाच्या मैदानात जाऊन त्यांच्या खेळातील हवा काढण्यातच मजा असते. नोटाबंदीनंतर सामान्य जनतेला त्रास झाला, ही जनतेची मन की बात बोलून शौरी-सिन्हांची हवा काढून टाकणारे नितीनभाऊ हे सरकारचे संकटमोचक ठरले आहेत. उगीच लपवालपवी केली तर विश्वासार्हता टिकत नाही. मोठय़ा मनाने चुकीची कबुली देण्यात पारदर्शकता आणि मोठेपणाही असतो. नितीनभाऊंनी तरी सरकारची विश्वासार्हता टिकविण्याचेच काम पुन्हा एकदा केले आहे.

First Published on October 10, 2017 2:28 am

Web Title: nitin gadkari modi government maharashtra government narendra modi